Gauhar Khan Pregnancy Fitness Secrets : बॉलीवूड अभिनेत्री गौहर खानने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली आहे. याआधी गौहरला एक मुलगा आहे आणि आता ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. दरम्यान, गौहरने एका रेड एफएम पॉडकास्टदरम्यान गरोदरपणानंतर तिने वजन कसे कमी केले आणि स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवले याविषयीचा खुलासा केला.
तिने गर्भधारणेनंतर फिट राहण्यावरून झालेल्या टीकेचा कशा प्रकारे सामना केला याविषयीदेखील मत मांडले. गौहर म्हणाली की, पहिल्या गरोदरपणानंतर मी महागडे जिम ट्रेनिंग आणि कडक डाएट प्लॅन फॉलो करण्याऐवजी फिट राहण्यासाठी स्वत:ला काय करता येईल यावर भर दिला. या काळात तिला बरेच लोक कशाला एवढं वजन कमी केलंसं, कशाला एवढं काम करून दाखवतेय, दुसऱ्या महिलांच्या बाबतीत जरा विचार कर, त्या या गोष्टी करू शकत नाहीत, तुझ्याकडे काय गं महागडे जिम ट्रेनर्स असतील, अशा कमेंट्स करायचे. त्यावर तिने उत्तर दिले की, नाही, माझ्याकडे महागडे जिम ट्रेनर नाहीत, मी कोणताही कडक डाएट प्लॅन फॉलो करीत नाही; पण मी या काळात काय खाल्ले पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर भर दिला. त्यासाठी मी तोंडावर ताबा ठेवला. माझ्या शरीराला आता कशाची गरज आहे याचा मी विचार केला.
या काळात तिने शरीराला काय गरजेचे आहे, सामाजिक अपेक्षा आणि फिटनेस ध्येय साध्य करण्यासाठी काय करू शकतो यावर भर दिला.
दरम्यान, गौहर खानच्या गरोदरपणानंतरच्या फिटनेस सीक्रेटविषयी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ‘टोन ३० पिलेट्स’मधील फिटनेस कन्सल्टंट व पायलेट्स ट्रेनर डॉ. वाजल्ला श्रावणी म्हणाल्या की, फिटनेस ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. पण, गौहर खानच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास तुम्हाला फिट राहायचे असेल, तर तुमच्या शरीरास काय आवश्यक आहे याचा विचार करावा लागेल. तसेच, स्वप्रेरणा आणि समावेशकता महत्त्वाची आहे. फिटनेस ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिसण्यापेक्षा आरोग्याला प्राधान्य द्यावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फिटनेसचा परिपूर्ण प्रवास सुरू करू शकता. त्यासाठी आधी स्वत:ला समजून घेतले पाहिजे. संतुलित आहार आणि जीवनपद्धती फॉलो केली पाहिजे.
दरम्यान, डॉ. श्रावणी यांनी वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस रुटीन फॉलो करण्यासाठी सांगितलेले काही महत्त्वपूर्ण टप्पे खालीलप्रमाणे :
१) विश्वसनीय स्रोतांचा सल्ला घ्या : द जर्नल ऑफ न्यूट्रिशन किंवा अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासांसारख्या पुराव्यावर आधारित संसाधनांवर विश्वास ठेवा. वैज्ञानिक आधार नसलेल्या सोशल मीडिया ट्रेंडवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि त्यातून फिटनेस टिप्स घेऊन काहीही करायला जाऊ नका.
२) शरीराला समजून घ्या : कॅलरीज, मॅक्रोन्यूट्रिएंट्स व क्रियाकलाप पातळीसाठी आणि तुमच्या अद्वितीय गरजा निश्चित करण्यासाठी आधी स्वत:च्या शरीराला समजून घ्या.
3) दीर्घकाळ परिणामकारक आहार आणि व्यायाम पद्धती निवडा : फिट राहण्यासाठी दीर्घकाळ परिणामकारक ठरेल असा आहार आणि व्यायामप्रकारांचा शोध घ्या. उदाहरणार्थ, अति आहाराऐवजी संतुलित आहार निवडा. त्यानंतर हळूहळू त्याची सवय करा.
४) व्यावसायिक मार्गदर्शन घ्या : गौहर वैयक्तिक संशोधनावर भर देते; परंतु तुम्ही आहारतज्ज्ञ किंवा फिटनेस प्रशिक्षकाचा सल्ला घेतल्यास योग्य ते मार्गदर्शन मिळू शकते.
५) चाचणी आणि अनुकूलन : व्यायाम, आहार पद्धती आणि एकूण जीवनपद्धतीत लहान, सुरक्षित बदल करीत राहा, ज्याला शरीर कसे प्रतिसाद देते याचे निरीक्षण करा. एखादी पद्धत शरीराची ऊर्जेची पातळी, वजन व मानसिक आरोग्य यांवर कसा परिणाम करते याचा अभ्यास करा.
फिटनेस ध्येय साध्य करण्यासाठी स्वप्रेरणा गरजेची
डॉ. श्रावणी सांगतात की, स्व-प्रेरणा ही फिटनेस रुटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे, विशेषतः जे स्वत:चा फिटनेस प्लॅन फॉलो करतात, त्यांच्यासाठी हे गरजेचे आहे. फिटनेस रुटीन सुरू करण्याआधी स्वत:चे एक स्पष्ट ध्येय निश्चित करा, जे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते. जसे की, सहनशक्ती सुधारणे किंवा ताण-तणाव कमी करणे. त्यामुळे तुम्हाला फिट राहायचे म्हणजे काय करायचे हे स्पष्ट होईल.
स्वत:ला ‘का’ असा प्रश्न विचारायला शिका, म्हणजे मी हे का करतेय. त्यामुळे तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अधिक उत्साही असल्यासारखे वाटू शकते, आरोग्यासंबंधित धोके कमी करता येऊ शकतात आणि तसा एक आत्मविश्वास निर्माण करता येतो. तसेच आंतरिक प्रेरणा मजबूत होतात. तुम्ही फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या फिटनेस अॅप्स, ऑनलाइन व्हिडीओ आणि सामुदायिक कार्यक्रमांसारख्या मोफत संसाधनांचा वापर करून जास्त खर्च न करताही मार्गदर्शन मिळू शकता.
आयुष्यातील अनेक छोट्या गोष्टी ठरवा, त्या पूर्ण करा आणि त्याचा आनंद साजरा करायला शिका. जसे की, सलग एक आठवडा व्यायाम करण्याचा निश्चय करा, ज्यामुळे तुम्हाला सवय लागेल. फिटनेसबाबत लवचिकता ठेवा. त्यामुळे तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे यावर तुम्ही विचार करू शकता आणि वेळेनुसार बदल करीत तसे शरीरास जुळवून घेऊ शकता.