Non-Invasive Treatment For Brain Tumours Unveiled : कर्करोग, हृदयरोग याप्रमाणे मेंदूशी निगडीत असलेला ब्रेन ट्युमर हा सर्वात गंभीर आजार मानला जातो. परंतु, अनेकांना हा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावर लक्षात येतो. यामुळे ट्युमरवर उपचार करणे काही वेळा डॉक्टरांसाठीही मोठे आव्हानात्मक असते. मात्र, आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे ही अडचण सुकर झाली आहे. ब्रेन ट्युमर अवघ्या २० मिनिटांत बरा करणारी एक मशीन आली आहे. Zap X असे या मशीनचे नाव असून जे ब्रेन ट्युमरवर अचूकपणे उपचार करू शकते. दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने पहिल्या ZAP-X मशीनचे अनावरण केले आहे.
विशेष म्हणजे यामुळे रुग्णालयात दाखल न करता अवघ्या अर्ध्या तासात ट्युमरवर उपचार करणे शक्य होणार आहे. अर्ध्या तासानंतर रुग्ण त्याच्या घरी किंवा कार्यालयात परत जाऊन काम करू शकतो. परंतु, ही उपचार पद्धती कोणासाठी फायदेशीर असेल आणि त्याचा खर्च किती असेल जाणून घेऊ…
या मशीनच्या मदतीने उच्च तीव्रतेचे फोकस केलेले रेडिएशन फक्त ब्रेन ट्युमरपर्यंत पोहोचवले जातात, ज्यामुळे आजूबाजूच्या ऊतींचे नुकसान होत नाही. यामुळे ट्युमर नष्ट होतो आणि नंतर नैसर्गिकरित्या विरघळून जातो.
यावर स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिन, न्यूरोसर्जरी विभागातील प्राध्यापक आणि झॅप सर्जिकलचे संस्थापक आणि सीईओ, डॉ. जॉन एडलर म्हणाले की, रेडिओ सर्जरी ही सर्वात सामान्य प्रक्रिया आहे, जी यूएसमध्ये न्यूरोसर्जन करतात; परंतु जागतिक स्तरावर १० पैकी फक्त एका रुग्णाला प्रवेश मिळतो. या मशीनची रचना उर्वरित जगाला लक्षात घेऊन करण्यात आली आहे. भारतात जवळपास एक दशलक्ष लोकांना या थेरपीचा फायदा होऊ शकतो.
पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा मशीनचे काय फायदे आहेत?
या मशीनमुळे ब्रेन ट्युमरच्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची किंवा भूल देण्याची गरजच लागत नाही. याशिवाय उपचारानंतर रुग्णाची आरोग्य स्थिती सुधारण्यासही मदत होते, जी शस्त्रक्रियेनंतर सुधारणे सहसा शक्य होत नाही.
रुग्णावर ३० मिनिटांपासून जास्तीत जास्त एक तास ३० मिनिटांच्या एकाच सत्रात उपचार केले जातात. डॉक्टरांच्या मते, जेव्हा ट्युमर खूप मोठा असतो किंवा मेंदूतील महत्त्वाच्या संरचनेच्या जवळ असतो, तेव्हाच अनेक सत्रांचे नियोजन केले जाते, ज्यासाठी अधिकचा वेळ लागू शकतो.
या मशीनमुळे ट्युमर ज्या जागी आहे तेवढ्याच जागी योग्य उपचार करता येतात. यामुळे मेंदूतील सर्व गंभीर संरचनांना कोणताही धोका निर्माण होत नाही. ज्यामध्ये मेंदूचे स्टेम, डोळे, ऑप्टिक नसा आणि शारीरिक कार्ये नियंत्रित करणारे भाग यांचा समावेश आहे.
या मशीनद्वारे सर्व प्रकारच्या ट्युमरवर उपचार करता येत नाही. मोठे ट्युमर किंवा ज्यांचे मेटास्टेसिस ट्युमर आहे त्यांना या मशीनद्वारे उपचार करणे काही वेळा शक्य होणार नाही. यातून 3X3X3 सेमीपेक्षा कमी ट्युमर असलेल्या रुग्णांवरच उपचार करता येतील.
ज्या रुग्णांच्या मेंदूमध्ये खोलवर गाठ असल्याचे निदान झाले आहे, जी मेंदूतील महत्त्वाच्या संरचनेच्या जवळ आहे किंवा मेंदूत लहान ट्युमर आहे, अशा रुग्णांसाठी शस्त्रक्रियेपेक्षा ही उपचार पद्धती फायदेशीर असेल.
या मशीनच्या साहाय्याने केवळ ट्युमरवरच नाही, तर मेंदूतील खोल जखमांवर किंवा धमनीसंबंधित आजारांवरही उपचार करू शकता येतात.
किती खर्च येईल?
रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, Zap-X वर उपचारांचा खर्च पारंपरिक शस्त्रक्रियेच्या बरोबरीचा असेल, पण शस्त्रक्रियेनंतर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. परदेशात यासाठी सुमारे $4000 इतका खर्च येतो. म्हणजे भारतीय रुपयात जवळपास ३३१०५८ रुपये इतका खर्च येतो
कर्करोग किंवा इतर रेडिओ सर्जरी मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओ थेरपीपेक्षा हे कसे वेगळे आहे?
रेडिओ थेरपी कर्करोगावर उपचार करण्यासाठी रेडिएशनच्या शक्तीचा उपयोग करते, परंतु ती अधिक पसरलेली असते आणि ट्युमरचे मेटास्टेसिस झालेल्या परिस्थितीत उपयुक्त असते. डॉ. एडलर यांनी सांगितले की, “रेडिओ थेरपी ही सूर्यप्रकाशासारखी असते, त्याचा प्रभाव कमी असतो आणि एक्सपोजरची वेळ जास्त असते. रेडिओसर्जरी आणि Zap-X सारखे आहे, यात एका विशिष्ट बिंदूवर रेडिएशन केंद्रित करण्यासाठी भिंग वापरण्यासारखे तंत्र वापरले जाते. पण, दोन्हीची तीव्रता खूप वेगळी आहे.
सायबरनाइफ आणि गॅमाकनाइफसारख्या इतर रेडिओ थेरपीदेखील हेच तंत्र वापरतात; परंतु ही मशीन केवळ मेंदूच्या उपचारांसाठी तयार केलेले नाही.