सँडविच, पिझ्झा, पास्ता अशा अनेक पदार्थांमध्ये वापरली जाणारी ढोबळी मिरची तुम्हाला माहीतच असेल. अनेक जण तिला शिमला मिरची, ढोबळी मिरची अशा नावांनीही ओळखतात. ही मिरची हिरव्या, पिवळ्या, लाल अशा रंगांत मिळते आणि भारतात सर्वाधिक खाल्ली जाते; पण अनेकांना ढोबळी मिरचीची भाजी आवडत नाही. लहान मुलांना (आणि काही प्रौढांना) ढोबळी मिरची आवडत नसली तरी ती अनेक आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. याच ढोबळी मिरचीच्या आरोग्यदायी फायद्याबाबत हैदराबादमधील कामिनेनी हॉस्पिटल्सच्या ज्येष्ठ आहारतज्ज्ञ एन. लक्ष्मी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
ढोबळी मिरची पावसाळ्यात एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. कारण- त्यात अनेक अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स घटक असतात; जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. संसर्गजन्य आजारांदरम्यान तुम्हाला निरोगी राहण्यासाठी ढोबळी मिरची मदत करते. पण कोणताही संसर्ग टाळण्यासाठी ढोबळी मिरची योग्य रीत्या धुऊन शिजवणे आवश्यक आहे. कारण- पावसाळ्यात ओलाव्यामुळे भाज्यांवर जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढतात.
शिमला मिरचीमध्ये ‘हे’ आहेत पौष्टिक घटक
डॉ. लक्ष्मी यांच्या मते, प्रति १०० ग्रॅम कच्च्या हिरव्या ढोबळी मिरचीत अनेक पौष्टिक घटक असतात.
१) कॅलरीज : अंदाजे २० कॅलरीज
२) कर्बोदके : सुमारे ४.६ ग्रॅम
३) आहारातील तंतुमय पदार्थ : सुमारे १.७ ग्रॅम
४) प्रथिने : अंदाजे ०.९ ग्रॅम
५) फॅट : जवळजवळ नगण्य, ०.२ ग्रॅमपेक्षा कमी
६) जीवनसत्त्वे : व्हिटॅमिन सी (एस्कॉर्बिक ॲसिड)मध्ये उच्च (सुमारे ८०- ९० मिलिग्राम आणि व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन के
७) खनिजे : पोटॅशियम, मॅग्नेशियम; तर इतर खनिजे कमी प्रमाणात असतात.
८) फायटोन्युट्रिएंट्स : कॅरोटीनॉइड्स व फ्लेव्होनॉइड्ससह विविध फायटोन्यूट्रिएंट्सनी समृद्ध.
ढोबळी मिरचीचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
१) अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध : ढोबळी मिरचीमधील व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते, शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करते; ज्यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
२) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत : ढोबळी मिरचीमधील
व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास; तसेच शरीराला संक्रमणांशी लढण्यास मदत करते.
३) वजन नियंत्रणात राहते : ढोबळी मिरचीममध्ये कॅलरीज कमी असतात. त्यात फायबर असते; ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
४)डोळ्यांचे आरोग्य सुधारते : ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनोइड्स असते; ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच वाढत्या वयात मॅक्युलर डीजनरेशनचा धोका कमी होऊ शकतो.
५) दाहकविरोधी : ढोबळी मिरचीमधील काही संयुगांमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात; जे दाहक परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
मधुमेहाचे रुग्ण ढोबळी मिरचीचे सेवन करु शकतात का?
मधुमेहाचे रुग्ण ढोबळी मिरचीचे सेवन करू शकतात का, यावर डॉ. लक्ष्मी सांगतात की, ढोबळी मिरचीमध्ये कार्बोहायड्रेट्स तुलनेने कमी असते; तसेच त्यात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ रक्तातील साखरेच्या पातळीवर कमी परिणाम होतो. संतुलित आहार योजनेचा एक भाग म्हणून मधुमेहाचे रुग्ण आहारात ढोबळी मिरचीचा समावेश करू शकतात.
गर्भवती महिलांसाठी ढोबळी मिरची फायदेशीर आहे का?
डॉ. लक्ष्मी यांच्या म्हणण्यानुसार, ढोबळी मिरची गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण- त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते; जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि लोह शोषण्यास मदत करते.
पण काही गर्भवती महिलांना ढोबळी मिरचीच्या सेवनामुळे छातीत जळजळ होऊ शकते आणि मिरचीच्या मसालेदार जाती हे प्रमाण अधिक वाढवू शकतात. म्हणून तुमचे शरीर त्यास कसे प्रतिसाद देते यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यावेळी तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात.
ढोबळी मिरची खाताना ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
ढोबळी मिरची खाण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते, असा सल्ला ज्येष्ठ आहारतज्ज्ञ देतात.
१) ॲलर्जी : ढोबळ्या मिरचीमुळे काहींना ॲलर्जी होण्याची शक्यता असते. त्यात ढोबळी मिरची खाल्ल्यानंतर खाज सुटणे, अंगावर पित्ताच्या गाठी उठणे किंवा सूज यांसारखी लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
२) साखरेचे प्रमाण : ढोबळी मिरचीमध्ये कमीत कमी नैसर्गिक साखर असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा कोणताही धोका नसतो.
३) अतिसेवन : ढोबळी मिरची जास्त खाल्ल्याने त्यातील तंतुमय पदार्थामुळे पचनास त्रास होऊ शकतो; जसे की गॅस आणि अपचन.
ढोबळी मिरचीबद्दलचे गैरसमज
डॉ. लक्ष्मी यांच्या मते, शिमला मिरचीच्या सेवनाबद्दल काही गैरसमजही आहेत. ढोबळी मिरची खूप तिखट असते, असे काहींचे मत आहे. पण डॉक्टरांच्या मते, ढोबळी मिरचीचे सर्वच प्रकार तिखट नसतात.
काही जण ढोबळी मिरची आजारांसाठी फायदेशीर असते, असे म्हणतात. पण, ढोबळी मिरची अनेक आरोग्यदायी फायदे देत असले तरी ती कोणत्याही आजारावरचा चमत्कारिक उपचार नाही. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी हा फक्त एक संतुलित आहाराचा भाग आहे.
काही जण ढोबळी मिरची पचनासाठी हानिकारक असते, असे म्हणतात; पण डॉक्टर सांगतात की, ढोबळी मिरचीतील तंतुमय पदार्थामुळे पचनास मदत होते.