Moringa Leaves Health Benefits : निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पौष्टिक घटकांचे सेवन करणे आवश्यक असते. विविध प्रकारच्या भाज्या, फळं आणि खाद्यपदार्थांमधून हे पौष्टिक घटक आपल्याला मिळत असतात. विविध प्रकारच्या पालेभाज्यांमध्येसुद्धा शरीरास आवश्यक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे अनेकदा आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या पालेभाज्यांमध्ये शेवग्याच्या पानांची भाजी हा अनेक पौष्टिक घटकांचा एक चांगला स्त्रोत आहे, पण अनेक जण ती खाण्यास टाळाटाळ करतात. पण, आज तुम्हाला या भाजीचे असे काही फायदे सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही ही भाजी जेव्हा कधी बनवली जाईल तेव्हा आवर्जून खाल. दरम्यान, सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. संजय कुमार यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना १०० ग्रॅम शेवगाच्या पानांचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.
शेवग्याची पानं रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यापासून ते अँटिऑक्सिडंट्सचा मुख्य स्त्रोत आहे. मेथीच्या भाजीप्रमाणे तयार केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या पानांच्या भाजीत आरोग्याच्या विविध पैलूंवर सकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता आहे.
जाणून घ्या शेवग्याची भाजी खाण्याचे फायदे
डॉ. कुमार यांनी १०० ग्रॅम शेवग्याच्या पानांच्या भाजीत कोणते पोषक घटक असतात हे सांगितले आहे.
- कॅलरीज: ६४ kcal
- कर्बोदकांमधे: ८.२८ ग्रॅम
- आहारातील फायबर: २.० ग्रॅम
- साखर: ०.६६ ग्रॅम
- प्रथिने: ९.४० ग्रॅम
- चरबी: १.४० ग्रॅम
- व्हिटॅमिन सी
- व्हिटॅमिन ए
- व्हिटॅमिन के
- व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 आणि B5 सह)
- कॅल्शियम
- फॉस्फरस
- लोह
- पोटॅशियम
- मॅग्नेशियम
- तांबे
- मॅंगनीज
- अँटिऑक्सिडंट्स : शेवग्याच्या पानांमध्ये क्वेर्सेटिन, क्लोरोजेनिक ॲसिड आणि बीटा-कॅरोटीनसह विविध अँटीऑक्सिडंट्स असतात.
शेवग्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे
१) रोगप्रतिकारकशक्ती वाढते : शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करता येते.
२) पचनासंबंधित आजारावर गुणकारी : शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनासंबंधित समस्यांपासून दूर राहता येते, तसेच शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात.
३) डोळ्यांचे आरोग्य सुधारते : शेवग्याच्या पानांमधील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी दोष दूर होतात आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यात मदत होते.
४) स्मृती आणि मेंदूच्या आरोग्यास फायदेशीर : शेवग्याची पानं अँटिऑक्सिडंट्स कार्यास समर्थन देतात आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव टाकतात.
५) यकृताचे कार्य सुधारते : काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, शेवग्याच्या पानांमुळे यकृताचे कार्य सुधारते आणि यकृताचे नुकसान कमी करता येते.
हेही वाचा : नाइट शिफ्ट करून सतत तणाव, थकवा जाणवतोय? मग डॉक्टरांचे ‘हे’ उपाय फॉलो करा अन् गंभीर आजारांपासून राहा दूर
मधुमेहाचे रुग्ण शेवग्याच्या पानांची भाजी खाऊ शकतात का?
शेवग्याच्या पानांमध्ये कमी ग्लायसेमिक आणि फायबर असते, जे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जाते.
शेवग्याच्या पानांमधील विरघळणारे फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते, असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
गर्भवती महिला खाऊ शकतात का?
शेवग्याची पानं गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोह यासारखे आवश्यक पोषक प्रदान करतात. पण, ती योग्य प्रमाणात खाण्याचा सल्ला डॉ. कुमार यांनी दिला आहे.
शेवग्याच्या पानांची भाजी खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
१) कोणत्याही प्रकाराची ॲलर्जी असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी खाणे शक्यतो टाळा.
२) यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन त्याचे प्रमाणातच सेवन करा.
३) शेवग्याच्या पानांच्या भाजीचे अतिसेवन केल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण होऊ शकते; त्यामुळे योग्य प्रमाणातच सेवन करा.
‘हे’ गैरसमज करा दूर
१) शेवग्याच्या पानांमुळे मधुमेह बरा होतो
- मधुमेहाच्या रुग्णांनी शेवग्याच्या पानांची भाजी खाणे फायदेशीर असते, परंतु त्यामुळे मधुमेह बरा होऊ शकत नाही.
२) शेवग्याच्या पानांच्या सेवनामुळे कर्करोग बरा होऊ शकतो का?
- शेवग्याच्या पानांच्या भाजीत अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु यामुळे कर्करोग टाळू किंवा बरा करू शकत नाहीत.