Health Benefits Of Oats : अनेक जण नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करणे पसंत करतात. फिटनेसकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणारे लोक ओट्सचे सेवन करण्यास प्राधान्य देतात. त्याशिवाय हल्ली वजन नियंत्रणात ठेवण्यापासून शरीर फिट ठेवण्यासाठीही दैनंदिन आहाराऐवजी ओट्सचे सेवन केले जाते. नुसते ओट्स खाऊन कंटाळा येत असल्याने त्यापासून हल्ली वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. दरम्यान, हृदयाच्या आरोग्य सांभाळण्यापासून वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत ओट्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातील पौष्टिक घटकांमुळे तुम्ही संतुलित आणि निरोगी आयुष्य जगू शकता. परंतु, रोज १०० ग्रॅम ओट्स खाल्ल्याने शरीरास कोणते फायदे मिळतात याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या संस्थापक-संचालिका व जनरल फिजिशियन डॉ. शुचिन बजाज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. बजाज यांच्या मते, १०० ग्रॅम ओट्समध्ये कोणते पोषक घटक असतात, ते जाणून घेऊ…
– कॅलरीज : ३८९ kcal
– कार्बोहायड्रेट्स : ६६.२७ ग्रॅम
– फायबर : १०.६ ग्रॅम
– साखर : ०.९९ ग्रॅम
– प्रथिने : १६.८९ ग्रॅम
– फॅट्स : ६.९ ग्रॅम
– जीवनसत्त्वे आणि खनिजे
ओट्समध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात जीवनसत्त्व बी, बी-२, बी-३, बी-५, बी-६ यांसह लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, तांबे, मॅंगनीज व सेलेनियम असते.
ओट्सचे आरोग्यदायी फायदे
१) हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास साह्य : ओट्समध्ये भरपूर प्रमाणात बीटा-ग्लुकन्स असतात; जे एक प्रकारचे विरघळणारे फायबर आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते; जी बाब हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास साह्यभूत ठरते.
२) रक्तातील साखरेवर नियंत्रण : ओट्समधील विरघळणारे फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांसाठी हा योग्य पर्याय मानला जातो.
३) पचनसंस्थेसाठी उपयुक्त : ओट्स खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅसची समस्यांपासून दूर राहता येते.
४) वजन कमी करणे शक्य : ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखे वाटून, भूक आवाक्यात राहते. परिणामी वजनावर नियंत्रण राहून ते कमी करणे शक्य होते.
५) चयापचयासाठी मदत : ओट्समध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यातील जीवनसत्त्व बी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि चयापचयासाठी मदत करते.
६) रोगप्रतिकारशक्तीत वाढ : ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असते; ज्यामध्ये अॅव्हेनॅन्थ्रामाइड्स, तसेच अँटिइन्फामेंटेरी घटक आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही आजारांपासून दूर राह शकता.
मधुमेहग्रस्त व्यक्ती ओट्सचे सेवन करू शकते का?
मधुमेहग्रस्त व्यक्ती ओट्सचे सेवन करू शकतात. कारण- त्यात ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी कमी असते. तसेच त्यातील फायबर हा घटक रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो.
गर्भवती महिला ओट्स खाऊ शकतात का?
ओट्समध्ये जीवनसत्त्व बी आणि लोह हे घटक गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. बजाज सांगतात.
ओट्सचे सेवन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या
- ग्लूटेन सेंसिटिव्ह असलेल्या व्यक्तींनी ग्लूटेन-फ्री ओट्स निवडले पाहिजेत.
- ओट्समध्ये नैसर्गिक साखर असते, परंतु एकूण साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असते.
- अतिसेवनामुळे जास्त कॅलरीजचे सेवन होऊ शकते, म्हणून ते प्रमाणात खाणे महत्वाचे आहे.