अनेकांच्या स्वयंपाकघरांत कांद्याचा हमखास वापर केला जातो. अगदी डाळीला फोडणी देण्यापासून वाटण बनवण्यापर्यंत कांद्याचा वापर होतो. त्यामुळे कांद्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते; पण कांद्याशिवाय कांद्याची पातही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. कांद्याची पात खायला जेवढी चवदार असते तेवढेच त्यामध्ये पौष्टिक घटक आहेत. पण, त्यात कोणत्या प्रकारचे पोषक घटक असतात? आणि ते आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे फायदेशीर असते? याविषयी मुंबईतील रेजुआ एनर्जी सेंटरचे पोषण तज्ज्ञ डॉ. निरुपमा राव यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
पोषण तज्ज्ञ डॉ. निरुपमा राव यांनी सांगितले की, कांद्याची पात जीवनसत्त्व ए, सी व के, तसेच कॅल्शियम, लोह, जस्त व पोटॅशियम यांनी समृद्ध आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इम्फ्लेमेटरी व अँटीमायक्रोबियल गुणधर्मदेखील आहेत.
कांद्याच्या किमतीतील चढ-उतार पाहता, कांद्याची पात चांगला पर्याय असू शकतो. चव थोडी वेगळी असली तरी त्यातील फ्लेवर प्रोफाइल सेमच असते, असेही डॉ. राव म्हणाले.
कांद्याच्या पातीचे आरोग्यदायी फायदे आणि पौष्टिक घटक
१०० ग्रॅम कांद्याच्या पातीत अनेक पोषक घटक असतात.
कर्बोदके- ७.३४ ग्रॅम
साखर- २.३३ ग्रॅम
प्रथिने- १.८३ ग्रॅम
एकूण फॅट्स- ०.१९ ग्रॅम
फायबर- २.६ ग्रॅम
पोटॅशियम- २७६ मिग्रॅ
कॅल्शियम- ७२ मिग्रॅ
फॉस्फरस- ३७ मिग्रॅ
मॅग्नेशियम- २० मिग्रॅ
आयर्न- १.४८ मिग्रॅ
सोडियम- १६ मिग्रॅ
झिंक- ०.८३ मिग्रॅ
कॉपर- ०.०८३ मिग्रॅ.
कांद्याच्या पातीचे आरोग्यदायी फायदे
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : कांद्याच्या पातीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराच्या सर्व उतींच्या वाढ आणि विकासासाठी फायदेशीर असते. तसेच ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत करतात.
हृदयाचे आरोग्य राखते : कांद्याच्या पातीत पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो.
स्नायुदुखीपासून आराम मिळतो : कांद्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायुदुखीपासून आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेवर उपाय : कांद्याच्या पातीमध्ये असे काही गुणधर्म असतात की, जे पचनास जड जेवण घेतल्यावर आतड्याचे आरोग्य बिघडू नये याची काळजी घेतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून कांद्याची पात खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेही कांद्याची पात खाऊ शकतात का?
कांद्याच्या पातीमध्ये असलेले सल्फर कम्पाऊंड आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात. डॉ राव यांनी स्पष्ट केले की, ते इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात याचा समावेश करू शकतात.
गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का?
कांद्याची पात गर्भवती महिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी फायदेशीर असते. त्यांच्यात कॅलरीजचे प्रमाण कमी आहे; पण जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांनी भरलेले आहेत, असेही डॉ. राव म्हणाले.
डॉ. राव यांच्या मते, कांद्याच्या पातीचे जास्त सेवन केल्याने पचनासंबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे मळमळ, सूज येणे, उलट्या होणे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ असे आजार होण्याचाही धोका वाढतो. म्हणून कांद्याच्या पातीचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.