Obesity and Knee Pain Causes and Treatment स्वाती ताई, वय ५०, गेल्या काही महिन्यांपासून गुडघेदुखीने त्रस्त होत्या. वजन ८० किलोपेक्षा अधिक होतं. जिने चढताना त्रास होऊ लागला, लांब चालणे कठीण झाले आणि अगदी थोडा वेळ उभे राहिल्यावरही गुडघ्यात तीव्र वेदना जाणवू लागली. ऑर्थोपेडीक डॉक्टरानी ऑस्टिओआर्थरायटिस सुरू झाला आहे, असं निदान केलं आणि स्थूलतेने हा आजार वाढतो आहे असं ही नमूद केलं.
लठ्ठपणा आणि गुडघेदुखी यांचा थेट संबंध
ऑर्थोपेडीक डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आणि फिजिओथेरपी सुरू करण्यास सांगितले. हळूहळू जसं वजन कमी होऊ लागलं, तशा गुडघ्यातील वेदना देखील कमी झाल्या. लठ्ठपणा आणि गुडघेदुखी यांचा थेट संबंध आहे. अधिक वजनामुळे गुडघ्यावर जास्त ताण येतो, सांधे झिजतात आणि वेदना वाढतात. आता आपण या समस्येची कारणे आणि उपाय तपशीलवार बघूया.
लठ्ठपणामुळे गुडघेदुखी वाढण्याची कारणे
१. सांध्यांवर अतिरिक्त भार पडणे
शरीराचं वजन जास्त असल्यास चालताना, उभं राहिल्यावर किंवा जिने चढताना गुडघ्यांवर ३ ते ५ पट अधिक भार पडतो. उदाहरणार्थ, ८० किलो वजन असलेल्या व्यक्तीच्या गुडघ्यावर चालताना २४० ते ४०० किलोपर्यंत ताण येतो!
२. ऑस्टिओआर्थरायटिसचा (Osteoarthritis) धोका
गुढ्घ्यावर येणाऱ्या अतिरिक्त वजनामुळे गुडघ्यातील कारटीलेजची वेगाने झीज होते आणि वेदना वाढतात. कारटीलेजची वेगाने झीज झाल्याने गुडघ्याच्या आणि मांडीच्या हाडामध्ये घर्षण होते. स्थूल व्यक्तींमध्ये गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस लवकर सुरू होतो आणि अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकतो.
३. शरीरातील दाह (Inflammation)
ज्यांच्या शरीरात चरबी अतिरिक्त प्रमाणात आहे त्यांच्या शरीरात सायटोकाईन्स आणि इतर इनफ्लेमेटरी म्हणजे दाह निर्माण करणारे घटक अधिक प्रमाणात स्रवतात. यामुळे सांध्यांमध्ये होणारं इनफ्लेमेशन वाढतं आणि गुडघेदुखी तीव्र होते.
४. स्नायूंचा कमकुवतपणा आणि असंतुलन
लठ्ठपणामुळे स्नायूंवर अधिक ताण येतो. विशेषतः मांडीच्या पुढील स्नायू (क्वआड्रीसेप्स्) आणि मागील स्नायू (हॅमस्ट्रिंग) कमकुवत होतात. (हे स्नायू गुढघ्याच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात) शरीराचा भार हा स्नायू आणि हाडे यांनी समप्रमाणात घेणं अपेक्षित आहे. इथे स्नायू योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे गुडघ्यावर अधिक भार पडतो आणि वेदना वाढतात.
५. हालचाल कमी होणे
अधिक वजनामुळे चालणे, जिने चढणे, किंवा व्यायाम करणे कठीण वाटते. यामुळे सांध्यांची लवचिकता कमी होते, आणि गुडघेदुखी अधिकच वाढते.
उपाय काय ?
१. वजन नियंत्रणात ठेवणे
व्यायाम आणि आहार यांची सांगड घालून सर्वप्रथम आहे ते वजन वाढू न देण्यासाठी प्रयत्न करण. हळू हळू वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा. १०% वजन कमी केल्याने गुडघेदुखी ५०% पर्यंत कमी होते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते.
२. व्यायाम करणे
हा उपाय अतिशय महत्वाचा आहे. गुडघ्याचा ऑस्टियोआर्थरायटिस आणि स्थूलता अशी दुहेरी समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी व्यायाम हे काळजीपूर्वक निवडावे लागतात. व्यायाम असे असायला हवे ज्याने त्यांना स्थूलता निवारणात तर मदत होईलच पण त्यासोबतच गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायुंची कार्यक्षमता देखील वाढेल. या दोन्ही गोष्टी साध्य करताना या व्यायामांचा अतिरिक्त भार देखील गुडघ्यावर येता कामा नये. म्हणून फिजिओथेरपी डॉक्टर कडून योग्य व्यायाम, योग्य प्रमाणात आणि नियमितपणे करा.
३. योग्य आहार घेणे
आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आणि अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थ यांचा समावेश करा. त्यासोबत डायबिटीस, हायपर टेंशन यासारखे आजार असल्यास योग्य त्या डॉक्टरांच्या उपचारांनी त्यांना आटोक्यात ठेवा.
४. योग्य पादत्राणे आणि जीवनशैलीतील बदल
बैठी जीवनशैली स्थूलता वाढवते. खूप तास सतत बसून राहिल्याने स्नायू आणि सांध्यांचा लवचिकपणा देखील कमी होतो. त्यामुळे बैठे तास कमी करण हे अत्यंत महत्वाचं ठरतं. चांगल्या प्रतीची पादत्राणे आणि शूज हे गुडघ्यावर येणारा भर कमी करतात.
थोडक्यात, होय, लठ्ठपणामुळे गुडघेदुखी वाढते, कारण शरीराचे अधिक वजन सांध्यांवर ताण टाकते, दाह वाढवते आणि सांध्यांची झीज वेगाने होते. मात्र, फिजिओथेरपी, योग्य आहार, वजन नियंत्रण याने ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकते.