थंडी सुरु झाली हे समजण्याची एक साधी परीक्षा म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. सभोवतालच्या वातावरणामध्ये जोवर गारवा जाणवत नाही, तोवर आपण समजतो की अजून थंडी आलेली नाही. मात्र दिवसा थंडी नसली तरी रात्री थंडी पडायला लागलेली असते किंवा लवकरच ती येणार असते. थंडीच्या आगमनाची चाहूल देणारे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे कोरडी त्वचा. आपली त्वचा कोरडी पडू लागली, त्वचेवर थोडं जरी खाजवलं तर पांढरट रेषा उमटत असेल तर समजावे थंडी सुरु होत आहे. थंडीमधील त्वचेच्या या कोरडेपणावर करावयाचा दिनचर्येमधील एक अत्यावश्यक उपचार म्हणजे अभ्यंग.
अभ्यंग म्हणजे शरीराला तेल मालिश करणे. बोली भाषेत सांगायचे तर तेलाने अंगाला मसाज. दुर्दैवाने आज अभ्यंग हा फक्त दिवाळीपुरताच एक सण-आचार म्हणून उरला आहे. वास्तवात आयुर्वेदाने अभ्यंग हा नित्य दिनचर्येमधील एक विधी सांगितलेला आहे. आजच्या धावपळीच्या दिवसांमध्ये नित्य अभ्यंग शक्य नसला तरी निदान सुट्टीच्या दिवशी तरी तेलाने शरीराला अभ्यंग करावा. मात्र इतर ऋतूंपेक्षा अभ्यंगाची सर्वाधिक गरज असते ती हेमंत व शिशिर या थंड ऋतुंमध्ये. दीपावलीच्या दिवशी करावयाचा अभ्यंग विधी हा दिवाळीपासून संपूर्ण थंडीमध्ये नियमितपणे अभ्यंग करावा, याची आठवण करुन देण्यासाठी आहे. हिवाळ्यातील थंड-कोरड्या वातावरणाचा विचार करुन पूर्वजांनी ही योजना करुन ठेवली आहे.
हेही वाचा >>> Health Special : तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावं?
थंडीमधील थंड-कोरड्या हवेचा व त्या हवेचा शरीरावर होणार्या विपरित परिणामांचा विचार करुन थंडीत अभ्यंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्वचा कोरडी पडणे. त्वचेच्या कोरडेपणामुळे त्वचेला येणारी खाज, एखादा त्वचा विकार सुरु होणे, किंवा असल्यास थंडीत बळावणे, गुदभाग कोरडा पडणे व त्यामुळे तिथे कातर्या पडणे(फ़िशर्स), थंडीमुळे व हालचालींच्या अभावामुळे स्नायू व नसा दुखणे-वळणे, तळपाय-तळव्यांना मुंग्या येणे, सांधे दुखणे-सुजणे,हाडे दुखणे-वळणे या तक्रारी थंडीमुळे होऊच नयेत म्हणून अभ्यंग निश्चितच उपयुक्त आहे. नित्यनेमाने अभ्यंग करणार्याला थंडीत हे आजार त्रास देणार नाहीत.
हेही वाचा >>> Health Special : लहान मुलांना दात येतात तेव्हा काय खायला द्यावं?
दुर्दैवाने आज मात्र हिवाळा सुरु होऊन या तक्रारी सुरु झाल्या म्हणजे लोक कोल्ड्-क्रीम, मॉईश्चरायजर वगैरे विकत घ्यायला धावतात, ज्याचा प्रत्यक्षात उपयोग तात्पुरत्या स्वरुपाचा होतो. शिवाय त्यामधील घातक केमिकल्सचा त्वचेला धोका संभवतो तो वेगळा.याउलट अभ्यंग करणे त्वचेबरोबरच संपूर्ण अंगाला आरोग्यदायी ठरते. रोज अभ्यंग करणे शक्य नसेल तर निदान आठवड्यातून एक-दोन वेळा अभ्यंग केलात तरी वर सांगितलेल्या तक्रारी होणार नाहीत आणि त्वचाही सुंदर -मुलायम होईल. आयुर्वेदाने विशेषकरुन वातनाशक अशा तेलांनी अभ्यंग करणे योग्य असा सल्ला दिलेला आहे. हिवाळ्यामधील थंड व कोरड्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडते. आयुर्वेदानुसार त्वचा हे वाताचे प्रमुख स्थान आहे. त्वचेचा कोरडेपणा वाताचा कोरडेपणा वाढवतो, ज्याच्या परिणामी त्वचेच्या निकट असणार्या स्नायू,नसा, सांधे यांवर परिणाम होऊन त्यांचे वातविकार थंडीमध्ये बळावतात. त्वचा कोरडी होऊ न देण्याचा आणि संबंधित वात विकृती टाळण्याचा सहजसोपा उपाय म्हणजे तेलाने त्वचेवर अभ्यंग आणि वातविरोधी म्हणून शास्त्राने उष्ण व स्निग्ध गुणांची वातघ्न तेले वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. जसे-महानारायण तेल, महामाष तेल, तीळ तेल, गोडे तेल (थंडीत खोबरेल तेल वात-कफ प्रकॄतीच्या लोकांना वर्ज्य).