Oily Skin Care Tips : तुम्ही जे अन्न खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्याबरोबरच त्वचेवरही होत असतो हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल, त्यामुळे डॉक्टरही तुमच्या त्वचेचा पोत लक्षात घेत तुम्हाला काय खावे किंवा काय खाऊ नये याचा सल्ला देत असतात. विशेषत: तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना विविध पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्या अनेकांना त्वचेसंबंधीत विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याच विषयावर एक डिजिटल क्रिएटर आणि क्लिनिकल डायटिशियन डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी काही मतं मांडली आहेत. डॉ. जुश्या यांच्या मते, काही खाद्यपदार्थ हे असे असतात ज्याच्या सेवनाने त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढते. मांस, मीठ, रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि साखर यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने विशेषत: त्वचा तेलकट होण्यास सुरुवात होते.
पण, या पदार्थांचा आपल्या त्वचेवर नेमका काय परिणाम होतो? या प्रश्नावर गुडगावमधील Zyla Healthcare च्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट हरलीन गिल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी कोणत्या पदार्थांच्या सेवनाने त्वचा अधिक तेलकट होते हे देखील सांगितले आहे.
त्वचा अधिक तेलकट होण्यास खालील पदार्थ ठरतात कारणीभूत
१) मीठ
मिठाच्या अधिक सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. परिणामी, तुमचे शरीर पेशी आणि त्वचेतील पाणी शोषण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वचा कोरडी, निस्तेज दिसू लागते. त्वचेवर ठिकठिकाणी बारीक सुरकुत्या आणि रेषा पडलेल्या दिसतात.
डॉ. जुश्या यांच्या मते, कोरड्या त्वचेमुळे शरीरात सीबमचे प्रमाण वाढते. सीबम हा आपल्या शरीरातील असा एक घटक आहे, जो त्वचा मॉइश्चराइझ करण्याबरोबरच त्वचेचे संरक्षण करतो. त्यामुळे सीबम हे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या नैसर्गिक तेलांपैकी एक आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा हा सीबम घटक तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे काम करतो. पण, याने त्वचा चमकदार आणि तेलकट, चिकट होते. परिणामी चेहऱ्यावरील बारीक रोमछिद्र बंद होतात आणि मुरुमांची समस्या वाढते.
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांखाली सूज दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
२) मांसाहारी पदार्थ
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट गिल यांनी सांगितले की, तुम्ही अधिक मांसाहार करता तेव्हा तुमच्या हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. अधिक मांसाहारी पदार्थ खाल्ल्यास मुरुमांची समस्या वाढू शकते. काहीवेळा एक्जिमा किंवा सोरायसिससारखे आजार होण्याचीही शक्यता असते. कारण प्रक्रिया केलेले मांसाहारी पदार्थ अधिक काळ खाण्यायोग्य राहण्यासाठी ते स्मोक्ड केले जातात किंवा अधिक मीठ लावून टिकवले जातात.
पण, अशा मांसाहारी पदार्थ्यांच्या सेवन निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो. तसेच प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असण्याबरोबर ॲडिटिव्ह्ज म्हणजेच रसायने असतात, जी पचनसंस्थेवर परिणाम करतात. अशाने तुमच्या शरीरातील कोलेजनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते, परिणामी शरीरात सीबमचे प्रमाणही वाढते.
३) रिफाइंड कार्ब्स आणि साखर
रिफाइंड कार्ब्स ज्याला प्रोसेस्ड कार्ब्स असेही म्हणतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक घातक असते. पांढरी साखर, मैदा, ब्रेड असे पदार्थ रिफाइंड कार्ब्समध्ये मोडतात. अशा पदार्थ्यांच्या सेवनाने तुमच्या आतड्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. तसेच चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास जाणवतो, असेही गिल यांनी स्पष्ट केले.
रिफाइंड कार्ब्सयुक्त पदार्थांच्या सेवनाने तुमच्या त्वचेत तेलाचे प्रमाण वाढते, अशाने चेहऱ्यावरील बारीक छिद्र बंद होतात; कारण साखर तुमच्या त्वचेच्या वृद्धत्वाला गती देऊ शकते.
या समस्या टाळण्यासाठी आहारात कोणते बदल केले पाहिजेत?
१) फळे आणि भाज्या : फळे आणि भाज्यांमधील अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करत वृद्धत्वाच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत करतात. याशिवाय बऱ्याच फळं आणि भाज्यांमध्ये कमीतकमी ७५ टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासही मदत होते.
२) मासे- सॅल्मनसारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे त्वचेचा लालसरपणा, मुरुमांची समस्या आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच सीबमचे उत्पादन नियंत्रित करतात.
३) झिंक : तुमच्या त्वचेमध्ये शरीराच्या तुलनेत अंदाजे झिंकचे प्रमाण सहा टक्के असते. पेशींच्या पडद्याचे संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेसाठी कोलेजनचे प्रमाण राखण्यासाठी झिंक एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
हेही वाचा – मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात? वाचा
४) व्हिटॅमिन-सी : ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ तुमच्या त्वचेसाठीदेखील चांगले असतात, कारण ते कोलेजनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. यामध्ये पेरू, भोपळी मिरची, संत्री, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, अननस, ब्रोकोली, केळी, ब्रसेल्स स्प्राउट्स, लिंबू, खरबूज, फुलकोबी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी यांचा समावेश आहे.
५) पॉलीफेनॉल्स : हायड्रेटेड राहण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे पॉलीफेनॉल्सयुक्त चहा. ज्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. विशेषतः ग्रीन टीच्या सेवनाने त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि शरीरातील सीबमची पातळी नियंत्रणात राहते.
तुम्ही या पदार्थांचा आहारात कशाप्रकारे समावेश करू शकता?
गिल यांच्या मते, तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे तुम्ही शरीराला किंवा त्वचेस अपायकारक गोष्टींपासून दूर ठेऊ शकता.
तुम्ही अधूनमधून बाहेरचे पदार्थही खाऊ शकता. परंतु, अशावेळी भरपूर पाणी प्या. तसेच तलकट, खारट किंवा गोड अशा बाहेरील खाद्यपदार्थ्यांपेक्षा फळं, हिरव्या ताज्या भाज्या, सर्वप्रकारच्या धान्यांचा आराहात समावेश करा.