How Much Sugar One Biscuit Pack Contains: नको नको, गोडाची बिस्किटं नकोच, वजन वाढणार, साखर वाढणार सगळेच त्रास! त्यापेक्षा जरा चटपटीत बिस्किटं असतील तर द्या ती खाऊ, किंवा होलव्हीटची बिस्किटं खाऊ. असं म्हणून खायला उघडलेल्या बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते याचा अंदाज देणारा आजचा हा लेख आहे. बिस्किटं, गोड असो खारट असो किंवा अगदी मसालेदार असो ती बनवताना वापरल्या जाणाऱ्या पदार्थांनुसार त्यात काही प्रमाणात का होईना साखर असतेच. जर तुम्ही रोज बिस्किटं किंवा कुकीज खात असाल तर हीच साखर तुमच्यासाठी घातक ठरू शकते. असं आम्ही नाही तर तज्ज्ञ स्वतः सांगतायत.
क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, बंगळुरू, एचआरबीआरच्या मुख्य क्लिनिकल पोषणतज्ज्ञ अभिलाषा व्ही, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “बिस्किट जास्त दिवस टिकण्यासाठी, चव व पोत सुधारण्यासाठी कामी येणारी साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराचं नुकसान करू शकते.”
बिस्किटांमध्ये जोडलेल्या साखरेचे प्रमाण प्रकार आणि ब्रँडच्यानुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकते. तज्ज्ञ सांगतात की, कुकीज सारख्या गोड बिस्किटांमध्ये सामान्यत: डायजेस्टिव्ह किंवा क्रॅकर्ससारख्या बिस्किटांपेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते. सरासरी, एका गोड बिस्किटात दोन ते आठ ग्रॅम किंवा त्याहून अधिक साखर असू शकते. ही साखर पीठ किंवा फळांसारख्या घटकांमधील नैसर्गिक साखरेपेक्षा वेगळी असते.
साध्या किंवा चटपटीत बिस्किटांमध्ये अनेकदा साखर कमीत कमी असते किंवा साखर नसतेच, त्याऐवजी संपूर्ण धान्य किंवा मसाल्यांसारख्या घटकांनी नैसर्गिक पद्धतीने चव आणली जाते.
साखरेचे आरोग्यावर परिणाम
संगीता तिवारी, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, आर्टेमिस लाइट, न्यू फ्रेंड्स कॉलनी (NFC), न्यू फ्रेंड्स कॉलनी, दिल्ली यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “जास्त साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, हृदयरोग आणि दातांच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. नियमितपणे साखर खाल्ल्यास किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे ऊर्जेमध्ये चढउतार होऊ शकतो. कालांतराने वाईट परिणाम लक्षात येत असूनही अनेकदा साखरयुक्त पदार्थांच्या सेवनाची लालसा वाढू शकते. जास्त साखरेचे सेवन केल्याने शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील होऊ शकतो, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका वाढू शकतो. साखरेचे अतिसेवन दात किडणे आणि पोकळी निर्माण करणे अशाही समस्यांचे कारण ठरू शकते. “
बिस्किटांची निवड करताना काय लक्षात घ्याल?
बिस्किटांची निवड करताना ग्राहकांनी पोषण लेबल्सकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी, एकूण साखरेचे प्रमाण व प्रति सर्व्हिंग एकूण साखरेचे प्रमाण तपासा. साधारण सर्व ब्रॅण्डची तुलना करा. साखर व साखरेसारखे घटक सुद्धा विचारात घ्या. जसे की, ‘साखर’, ‘केन शुगर’, ‘कॉर्न सिरप’ . मधासारख्या नैसर्गिक पर्यायांनी गोड बनवलेल्या बिस्किटांचे सेवन करा. ‘साखर नसलेले किंवा कमी साखर असलेले’ , ब्रँड्स निवडा. कोणताही ब्रँड निवडलात तरी पोर्शन कंट्रोलची सवय लावून घ्या. बिस्किटांचे सेवन प्रमाणात कराच व जोडीने फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य असलेला संतुलित आहार घ्या.