निरोगी आहार शरीराचे कार्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक असतो. परंतु अनेकजण बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. परंतु या वाईट आहाराचा परिणाम आपल्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसून येतो. आहारात काहीही विचार न करता खाल्ल्याने पचन संस्थेवर परिणाम तर होतोच पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. काही लोक खाण्या-पिण्याच्या त्याच चुकीच्या सवयी फॉलो करतात. यात काही लोक दररोज सकाळचा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणातही तेच- तेच पदार्थ खाणे पसंत करतात. लोकांना नाश्त्यात ढोकळा खायला आवडते असे अनेकदा पाहायला मिळते. विशेषत: गुजराती लोक आठवड्यातून तीन ते चार दिवस ढोकळ्याचे सेवन करतात. पण ढोकळ्याचे रोज सेवन केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अहमदाबादमधील झायडस हॉस्पिटल्समधील मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के. भारद्वाज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
आहारतज्ज्ञ श्रुती के. भारद्वाज यांच्या मते, ढोकळा हा आंबवलेले तांदूळ आणि चण्याच्या पिठापासून बनवला जाणारा एक भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. ढोकळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सर्वप्रथम म्हणजे यात प्रथिने, कर्बोदके आहेत. त्यात होणारी किण्वन प्रक्रिया पोषक घटकांची जैवउपलब्धता वाढवते.
भारद्वाज पुढे म्हणाले की, त्याव्यतिरिक्त ढोकळ्यामध्ये निरोगी कार्बोहायड्रेट्स असतात. तांदूळ आणि चण्याच्या पिठाचा समावेश केल्याने आहारातील फायबरचा चांगला डोस मिळतो, पचनास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राहायला मदत होते.
त्याशिवाय ढोकळा हे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे पॉवर हाऊस आहे; ज्यामध्ये ब जीवनसत्त्व, लोह व पोटॅशियम यांचा समावेश आहे. ते विविध शारीरिक कार्यांमध्ये योगदान देतात. भारद्वाज यांच्या मते, किण्वन प्रक्रियेतून प्रो-बायोटिक्सदेखील तयार होतात; जे आतड्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या समर्थनासाठी फायदेशीर असतात.
ढोकळा हा तळण्याऐवजी वाफवून केला जात असल्याने तो अनेक स्नॅक्ससाठी आरोग्यदायी पर्याय आहे; ज्यामुळे अतिरिक्त चरबीचे सेवन कमी होते. हलका-फुलका आणि फुगीर पोत असलेला ढोकळा पचनासाठी योग्य असतो, तसेच ज्यांना पचनासंबंधीत त्रास असेल त्यांच्यासाठीही ढोकळा फायदेशीर मानल जातो.
पण, आठवड्यातून तीन वेळा ढोकळा खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारखी लक्षणे जाणवू शकतात, असे हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी सांगितले.
“अन्नाचे आंबवलेले स्वरूप पचन झाल्यावर लॅक्टिक अॅसिड सोडू शकते; ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल साइड इफेक्ट्स होऊ शकतात. ढोकळा जर प्रमाणात खाल्ला, तर त्यात भरपूर प्रथिने असतात. तेलाचा न वापर करता तो वाफेवर बनवला जात असल्याने त्यात अनेक पोषक मूल्य असतात. त्यामुळे त्याचे मुख्य अन्न म्हणून सेवन न करता, तो अधूनमधून नाश्ता म्हणून खाऊ शकता, असे डॉ. गुडे म्हणाले.
मधुमेहाच्या रुग्णांनी ढोकळा बनवताना तांदळाच्या पिठाचा वापरणे करणे टाळावे. त्यापेक्षा तुम्ही बेसन किंवा डाळीपासून ढोकळा बनवू शकता, असे आहारतज्ज्ञ भारद्वाज म्हणाल्या.