Pickled Ginger Benefits & Recipe: वेगाने खाल्ल्यामुळे किंवा अधिक फायबरयुक्त आहारामुळे अनेकदा पचनात अडचण येऊ शकते. अपचनामुळे वायू तयार होऊन पोट फुगल्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. अशावेळी आल्याचा तुकडा चघळल्याने अन्न पचण्यात मदत होऊ शकते, हा सल्ला कदाचित आपण अनेकदा आई- आजीकडून ऐकलं असेल. आणि आता आहारतज्ज्ञ सिमरत कथुरिया यांनी आल्याची एक चविष्ट रेसिपी शेअर केली आहे ज्यामुळे पचनास मदत तर होऊच शकते पण साध्या जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा ही रेसिपी योगदान देऊ शकते. हा प्रकार काहीसा लोणच्यासारखा आहे, म्हणजे अगदी आल्याचं लोणचंच आहे म्हणालात तरी योग्य ठरेल. सुरुवातीला आपण हे लोणचं कसं बनवायचं हे पाहूया आणि मग एक एक करून त्याचे फायदे समजून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आल्याचे लोणचे कसे बनवायचे?

कृती

  • आल्याची साल काढून त्याचे बारीक उभे काप करा
  • एका भांड्यात आले, काळे मीठ, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घाला.
  • बरणी नीट हलवा.
  • लोणचे मुरू द्या.
  • आल्याचे लोणचे जेव्हा थोडे गुलाबी छटेत दिसेल तेव्हा ते खाण्यासाठी तयार आहे असे समजावे.

कथुरिया यांनी आल्याच्या लोणच्याचे सांगितलेले फायदे पाहा

  • आल्याच्या मुळांमध्ये क्षार घटक असतात जे भूक सुधारतात आणि पोषकसत्वांचे शोषण करण्यास मदत होते.
  • आल्यामधील काही सत्व पचनसंस्थेतील जळजळ कमी करू शकतात, यामुळे सूज कमी होऊ शकते.
  • आल्यामधील पाचक एंझाइम पचनास मदत करतात व गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतात.
  • पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देण्यास, मळमळ कमी करण्यास मदत करू शकते.

आल्याचे लोणचे कसे मदत करतात?

आल्याच्या लोणच्याचा पीएच स्तर कमी असतो. तसेच यातून आतड्यांसाठी आवश्यक लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया ज्याला प्रोबायोटिक म्हणून ओळखले जाते हे सुद्धा प्राप्त होऊ शकतात. सारिका कुमारी, आहारतज्ज्ञ, एचसीएल हेल्थकेअर यांनी सांगितलेले फायदे खालीलप्रमाणे,

  • रोज आल्याचे लोणचे खाल्ल्याने सर्दी, खोकला, फ्लू, सांधेदुखी आणि अपचनाची लक्षणे दूर होतात.
  • जिंगरॉल, शोगाओल्स आणि झिंगिबेरीन सारखे बायोएक्टिव्ह सत्व दाहक-विरोधी व अँटिऑक्सिडंट युक्त असतात ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
  • तोंडाची चव गेली असल्यास या लोणच्याचे सेवन तुम्हाला चव परत आणण्यासाठी मदत करू शकते. हा एका प्रकारचा टाळू क्लिन्झर ठरू शकतो.
  • या लोणच्यात तेलाचा फार वापर नसल्याने कॅलरीज कमी असतात.

किती असावे?

आपण दररोज ३ – ४ ग्रॅम (१ चमचे) लोणचे खाऊ शकता.

आल्याच्या लोणच्याने काही त्रास होऊ शकतो का?

*सारिका सांगतात की, लोणच्यातील जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. याविषयी डॉ जी कृष्ण मोहन रेड्डी, सल्लागार फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेला माहिती दिली की, लोणच्यामध्ये मिठाचा अधिक वापर केला असल्यास त्यातील सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते जे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी घातक ठरते.

*अधिक मसाल्यांचा वापर केला असल्यास यातून शुद्ध आम्ल, पित्त वाढून पोट खराब होऊ शकते. डॉ. रेड्डी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आल्याच्या लोणच्यात आंबटपणा असल्यास त्याचा दातांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे लोणच्याचे सेवन केल्यावर तोंड स्वच्छ धुवावे, शक्य झाल्यास दात घासावे, जेणेकरून त्याचा वाईट परिणाम टाळता येऊ शकतो.

हे ही वाचा<< रोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय 

लक्षात घ्या: जर आपल्याला आल्याची ऍलर्जी असेल तर मात्र आल्याचे लोणचे टाळावे. तसेच हे ही लक्षात घ्या तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्हाला ही लोणचे आवडेल की नाही यामध्ये फरक पडू शकतो. यासाठी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हा उपाय आपल्याला किती कामी येईल हे सुद्धा व्यक्तिपरत्वे बदलू शकते. तसेच केवळ या उपायावर अवलंबून न राहता आपल्या आहार व जीवनशैलीत सुद्धा महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One spoon ginger pickle with daily meal can help stomach for digestion acidity remedies how to make adrak ka achar recipe svs