Oral Sex Fueling Throat Cancer : यूके आणि यूएसमध्ये असुरक्षित ओरल सेक्स हा घशाच्या कर्करोगासाठी एक प्रमुख धोकादायक घटक ठरत आहे, असा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. ‘गर्भाशयमुखाचा कर्करोग’ हा या दोन देशांमध्ये कर्करोगाचा सर्वात जास्त नोंदलेला प्रकार होता, तर ‘घशाचा कर्करोग’ हा गेल्या दोन दशकांमध्ये झपाट्याने वाढल्यामुळे त्याला ‘महामारी’ असे संबोधले जात आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

असुरक्षित ओरल सेक्समुळे पसरू शकतो HPV व्हायरस

बर्मिंगहॅम विद्यापीठातील डॉ. हिशाम मेहन्ना यांनी ‘द कॉन्व्हर्सेशन जर्नल’मध्ये लिहिले आहे की, “घशाचा कर्करोग होण्यामागील अनेक कारणांपैकी एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papilloma virus) हादेखील आहे, जो गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे.” HPV हा एक सामान्य विषाणू आहे. त्याचा आधीच संसर्ग असलेल्या व्यक्तीसोबत योनीमार्गे, गुदद्वारामार्गे, असुरक्षित ओरल सेक्स केल्यामुळे तो पसरू शकतो.

ओरल सेक्समुळे ऑरोफॅरिंजियल कॅन्सरच्या प्रमाणात झाली वाढ

अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ‘असुरक्षित ओरल सेक्समुळे ऑरोफॅरिंजियल कॅन्सर नावाच्या विशिष्ट प्रकारच्या घशाच्या कर्करोगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ज्यामुळे टॉन्सिल्स आणि घशाच्या मागील भागावर परिणाम होतो

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, एचपीव्ही-संबंधित ऑरोफॅरिंजियल कॅन्सर (घशाच्या कर्करोगाचा एक प्रकार) २०१५ ते २०१९ या काळात महिलांमध्ये १.३ टक्के आणि पुरुषांमध्ये २.८ टक्क्यांनी वाढला आहे.

घशाच्या कर्करोगाला महामारी म्हटले जाते

“गेल्या दोन दशकांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये घशाच्या कर्करोगात झपाट्याने वाढ झाली आहे, काहींनी याला महामारी म्हटले आहे,” असे डॉ. मेहन्ना यांनी ‘द कॉन्व्हर्सेशन’मध्ये लिहिले आहे

ऑरोफॅरिंजियल कर्करोग होण्याचे ठरते कारण

मागील अभ्यासांनी सूचित केले आहे की, एचपीव्ही संसर्ग हा ‘घशाचा कर्करोग’ विकसित होण्यासाठी सर्वात मोठा धोकादायक घटक आहे. एचपीव्ही संसर्गाबद्दल बोलताना, डॉ. मेहन्ना यांनी लिहिले आहे, “एचपीव्ही लैंगिकरीत्या संक्रमित होतो. ऑरोफॅरिंजियल कर्करोगासाठी, एकापेक्षा जास्त पार्टनर्ससोबत असुरक्षित ओरल सेक्स करणे हा मुख्य जोखीम घटक ठरतो.

ते पुढे म्हणाले की, “एकापेक्षा जास्त पार्टनर्ससोबत असुरक्षित ओरल सेक्स पार्टनर असलेल्यांना, असुरक्षित ओरल सेक्स न करणार्‍यांपेक्षा ऑरोफॅरिंजियल कर्करोग होण्याची शक्यता ८.५ पट जास्त असते.”

यूकेमध्ये दरवर्षी सुमारे ८,३०० लोकांत घशाच्या कर्करोगाचे निदान

यूकेच्या आरोग्य संस्था, नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, “यूकेमध्ये दरवर्षी सुमारे ८,३०० लोकांना घशाच्या कर्करोगाचे निदान होते, ज्याचे प्रमाण निदान झालेल्या ५० कर्करोगांपैकी एक होते.

डॉ. मेहन्ना यांनी स्पष्ट केले की, यामुळे घशाच्या मागील बाजूस किंवा टॉन्सिल्सजवळ एचपीव्ही संसर्ग होऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये हे संक्रमण स्वतःहून निघून जाते, परंतु काही वेळा कायम राहून कर्करोग होऊ शकतो.

HPV साठी एक लस आहे, जी गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी ८० टक्के प्रभावी आहे आणि विकसित देशांतील अनेक भागांमध्ये उपलब्ध आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)

Story img Loader