Organs Death Time: जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर अंत्यसंस्कार केले जातात किंवा दफन केले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील काही अवयव हे काही तास जिवंत राहतात. व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी सर्व अवयव हे एकदम निकामी होत नाहीत, काही अवयवांचे कार्य हे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही मिनिटे किंवा काही तासांपर्यंत सुरू असते. पण, मृत्यूनंतर कोणते अवयव किती मिनिटे किंवा तास जिवंत असतात याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली ती आपण जाणून घेऊ..
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात टप्प्याटप्प्याने बदल होत असतात. हृदयाची धडधड थांबते, ऑक्सिजन न मिळाल्याने शरीरातील अवयव आणि पेशी निकामी होतात. ऊती वेगाने मरतात. नोएडामधील यथार्थ हॉस्पिटल एक्स्टेंशनच्या पॅथॉलॉजीचे संचालक आणि एचओडी यांच्या मते, मृत्यूनंतर विघटन होण्याची प्रक्रिया जवळजवळ लगेच सुरू होते. काही मिनिटांच्या आत पूर्णपणे ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या मेंदूच्या पेशींचे कार्य सामान्यतः ३ ते ७ मिनिटांच्या आत पूर्णपणे बंद होते. यकृत अधिक लवचिक असल्याने मृत्यूनंतर एक तासापर्यंत त्याचे चयापचय कार्य चालू राहू शकते. यादरम्यान रक्त जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीराचा रंग बदलतो, ज्याला लिव्हर मॉर्टिस असे म्हणतात.
मृत्यूनंतर एका तासाच्या आत फिका पडतो त्वचेचा रंग
मृत्यूनंतर एका तासाच्या आत त्वचेचा रंग फिका पडतो, स्नायू लवचिकता गमावतात. २ ते ६ तासांनंतर स्नायू ताठ, कडक होऊ लागतात. हे एटीपी (एडिनोसिन ट्रायफॉस्फेट) ची पातळी कमी झाल्यामुळे होते, ज्यामुळे स्नायू आकुंचन पावतात. यात पापण्या आणि जबड्यांसारखे लहान स्नायू प्रथम प्रभावित होतात, त्यानंतर मोठे स्नायू कडक होऊ लागतात. १२ तासांनी संपूर्ण शरीरातील अवयवांना एक ताठरपणा येतो. त्याच वेळी पोटातील पाचक एंजाइम ऑटोलिसिस नावाच्या प्रक्रियेत ऊतींचे विघटन सुरू असते.
माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे मात्र सहा तासांपर्यंत जिवंत राहू शकतात, त्यामुळे मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला डोळे दान करायचेच असल्यास २४ तासांच्या आत डोळे दान करणे शक्य होते. मृत्यूनंतर व्यक्तीच्या शरीरात असे बदल होत असतात. जर २४ तासांनंतरही त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाही तर हे बदल पुढील अनेक दिवस चालू राहतात.
मृत्यूनंतर कोणते अवयव किती तास किंवा मिनिटांनी निष्क्रिय होतात? जाणून घ्या
मृत्यूनंतर काही मिनिटांमध्ये निष्क्रिय होणारे अवयव
१) हृदय : धडधडणे लगेच थांबते.
२) फुफ्फुस : श्वास घेणे थांबवते, ज्यामुळे संपूर्ण शरीराचा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.
३) मेंदू : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशी ३ ते ७ मिनिटांत मरतात.
४) रक्त : रक्ताभिसरणाच्या कमतरतेमुळे रक्त एकाजागी जमा होण्यास आणि स्थिर होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीराचा रंग फिका पडतो.
Read More Health News : …म्हणून धोनी महिनाभर शाकाहारी झाला; मांसाहारी व्यक्तीने आहारात बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो
मृत्यूनंतर एक तासांच्या आत निष्क्रिय होणारे अवयव
१) त्वचा : रक्ताभिसरण प्रक्रिया थांबल्यामुळे त्वचेचा रंग बदलू लागतो.
२) स्नायू : लवचिकता कमी होते आणि तासाभरात स्नायू कडक होण्यास सुरुवात होते.
३) यकृत : जवळपास एक तासाने यकृताचे चयापचय कार्य थांबते.
मृत्यूनंतर २ ते ६ तासांनंतर निष्क्रिय होणारे अवयव
१) डोळे : मृत्यूनंतर डोळे सहा तासांपर्यंत जिवंत राहतात.
२) स्नायू : स्नायू कडक होण्यास सुरुवात होते. विशेषतः पापण्या आणि जबड्यांसारखे लहान स्नायू अधिक कडक होऊ लागतात.
मृत्यूनंतर ६ ते १२ तासांमध्ये निष्क्रिय होणारे अवयव
१) स्नायू : ६ ते १२ तासांमध्ये शरीरातील संपूर्ण स्नायू ताठ होतात. यातही मोठे अवयव म्हणजे हात, पाय अधिक ताठ होतात.
२) पाचक प्रणाली : पोटातील पाचक एंजाइम ऑटोलिसिस नावाच्या प्रक्रियेत ऊतींचे विघटन होत असते.
हे बदल तापमान, शरीराची रचना आणि मृत्यूचे कारण यासारख्या बाह्य घटकांच्या आधारावर बदलणारे असतात.