दातांच्या उपचारांमध्ये सर्वाधिक वेगळ्या स्वरुपाची उपचारपद्धती कुठली असेल तर ती दंतव्यंगोपचार पद्धती आहे. अगदी नावही बघा किती आगळेवेगळे आहे. दंतव्यंगोपचार म्हटले तर चटकन उच्चारताही येत नाही आणि समजत ही नाही. दात सरळ करणे किंवा दाताला तार लावणे म्हटले की लगेच समजते. युवकांना ‘ऑर्थो’ट्रिटमेंट हा शॉर्ट फार्म समजण्याकरिता पुरेसा ठरतो. चला तर आपण आज या आगळ्या-वेगळ्या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊया.

दात पुढे असणे, दातांमध्ये फट असणे, वाकडे तिकडे दात असणे किंवा काही दात ओठांच्या बाहेर असणे, हसताना खूप जास्त दात दिसणे, काही वेळा हसतांना हिरड्या दिसणे, बोलतांना-हसतांना दात न दिसणे, हनुवटी खूपच छोटी असणे, अतिरिक्त दात असणे, काही दात मिसिंग असणे, खूप छोटे किंवा खूप मोठे दात असणे, वरचे पुढचे दोन दात मागे व त्या बाजूचे दात पुढे असणे, दात बंद केल्यानंतर पुढच्या भागामध्ये दातात फट किंवा जास्त जागा शिल्लक राहणे, (ओपन बाईट), दात खूप जास्त खोलपर्यंत बंद होणे, (डीप बाईट), वरचे दात मागे व खालचे दात पुढे बंद होणे (क्रॉस बाईट), जीभ खूप जास्त मोठी व जाड असणे, ओठाचा पुढच्या व खालच्या बाजूचा पडदा (फ्रिनम) जास्त खाली जोडलेला असणे, इत्यादी अनेक प्रकारांत आपल्याला दंतव्यंगोपचार वा ऑर्थोडॉटीक्स या उपचार पद्धतीत पहायला मिळतात.

आणखी वाचा: Health Special: अवास्तव वेदनेची प्रतिक्रिया

आपल्या चेहऱ्याला ‘व्यक्तिमत्वाला आहे ते दात चांगले दिसतात त्यावर आपण ठरवतो की आपल्याला ही उपचार पद्धती घ्यायची की नाही. एकदा आपल्या वाटले की, आपल्या दातात काही दोष आहे व त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात काही न्यूनता जाणवते वा आपला आत्मविश्वास कमी होतो तर निश्चितच आधुनिक उपचार पद्धतीमुळे आपले व्यक्तिमत्व जास्त आकर्षक व लोभस करू शकतो.

या पुढच्या टप्प्यात आपण आपल्या नेहमीच्या दातांच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातो. आपले फॅमिली डेंटिस्ट आपल्याला तपासल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारतात. जसे झोपताना तोंड उघडे राहते की बंद, घोरण्याची सवय आहे की नाही, दात चावण्याची काही सवय आहे का, अंगठा चोखणे, दात ‘खाणे, ओठ चावणे, नखं कुरतडणे, जीभ सतत ओठांवर फिरवणे इत्यादी सवयी ते विचारतात. त्यानंतर आपल्या दातांची ठेवण ते बारकाईने तपासतात, दात जेवणासाठी आपण बंद करतो त्यावेळी त्यांची पोझिशन ते चेक करतात, ओठांचा पडदा, हनुवटीची ठेवण, जीभेचा आकार, दातांची साईज, दातांची संख्या, अक्कलदाढीची ठेवण, हिरड्यांची रचना इत्यादी सर्व तपासल्यानंतर ते आपली मेडिकल हिस्ट्री घेतात.

आणखी वाचा: Health Special: ‘संस्कृत सूप’ करी आरोग्याचे रक्षण

काही आजार किंवा औषधोपचार चालू आहेत का याची चौकशी करतात. यानंतर काम म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर आपल्याला साधारण खर्चाचा अंदाज देतात. किती काळ ही ट्रिटमेंट चालेल यासंबंधी माहिती देतात. दंतव्यंगोपचार किंवा तार लावणे ही प्रक्रिया साधारणतः १८ महीने ने २४ महिन्यांपर्यंत घ्यावी लागते. अपवादात्मक परिस्थितीत १२ महिने किंवा ३० महिन्यांपर्यंतही ती जावू शकते. (काही वेळा आपली १-२ व्हिजिट्स मिस झाल्यानंतर त्यानेही हा काळ वाढतो.)

साधारणतः दंतव्यंगोपचार या उपचार पद्धतीत दोन प्रकारे उपचार केले जातात. पहिली पद्धत रिमुव्हेबल प्लेट्स किंवा काढण्याघालण्याची तार, यात तुम्हाला दिवसातून काही वेळ या प्लेट्स किंवा तारा काढण्याची परवानगी असते. दातांवर कमी ताण देऊन जर दात चांगले होणार असतील तर या पद्धतीचा वापर केला जातो. या उपचार पद्धतीचे काही तोटे आहेत. ते म्हणजे रुग्ण स्वतः प्लेट्स किंवा तार काढू शकत असल्यामुळे बऱ्याचदा रुग्ण ते वापरत नाही किंवा फार कमी वेळ वापरतात. त्यामुळे अपेक्षित परिणाम होत नाही. यामुळे इलाज चांगला झाला नाही अशी त्याची समज होऊ शकते. शिवाय वेळ व पैसे दोन्ही वाया जातात. बरेच रुग्ण रात्री या प्लेट्स वापरणे गरजेचे असतानाही रात्री काढून ठेवतात. त्यामुळेही अपेक्षित यश या उपचार पद्धतीत येत नाही. त्यामुळे फिक्स तार लावणे हाच खात्रीलायक उपाय आहे. अशी मान्यता बऱ्याच दंतचिकित्सकांची असते. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य दंतचिकित्सक ही उपचार पद्धती सहसा करत नाहीत किंवा त्यांनी करू नये कारण ऑर्थोडॉंटीक्स (Orthodontics) ही एक सुपर स्पेशालिटी शाखा आहे. म्हणजेच सामान्य डेंटिस्ट B.D.S. असतात. तर Orthodontics म्हणजे तारांची ट्रीटमेंट करणारा व शाखेमध्ये MDS म्हणजेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेला ‘सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर असतो. B.D.S नंतर ३ वर्षांचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम असतो.

हे आपणाला माहीत असायला हवे. त्यामुळेच जेव्हा आपण तार बसविण्याची उपचार पद्धती करण्यासाठी आपल्या फॅमिली डेंटिस्टकडे जातो. तेव्हा शक्यतो सर्वच डेंटिस्ट त्यांच्या क्लिनिकमध्ये व्हिजिटिंग ऑर्थोडॉंटीक्स बोलावतात. त्यांच्याकडून आपली ही उपचार पद्धती करून घेतात. हे सर्व रुग्णाला चांगला उपचार मिळावा या हेतूने ते करीत असतात. त्यामुळे आपणही चांगली सेवा मिळण्यासाठी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना सहकार्य केलं पाहिजे. साधारणतः महिन्यातून एकदा असे डॉक्टर प्रत्येक डेंटिस्टकडे येत असतात. काही वेळा महिन्यातून दोनदा ही येतात. आपल्या सोयीप्रमाणे वेळेप्रमाणे व डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार आपण या वेळा जमवून घेतल्या पाहिजेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खर्चाचा !

सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला असेल की साधारण दोन वर्षे चालणाऱ्या या उपचार पद्धतीचा खर्च किती असणार ? खरं म्हणजे ज्या अर्थी ही उपचार पद्धती दोन वर्ष चालते त्या अर्थी याचा खर्च जास्तच असणार हे आपण गृहीत धरून चालतो. शिवाय ही एक प्रकारची कॉस्मेटिक उपचार पद्धती आहे म्हणजेच ही काही जीवनावश्यक उपचार पद्धती नाही. तर सौदर्यवर्धक उपचार पद्धती आहे.म्हणजे आपण ही घेतली नाही तरी आपण चांगले राहू शकतो. खाऊपिऊ शकतो व चांगले जगू शकतो परंतु आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडावेत, आपण आहे त्यापेक्षा जास्त आकर्षक दिसावे, चांगले दिसावे म्हणून आपण ही उपचार पद्धती स्वीकारतो. त्यामुळे आपली यासाठी खर्च करायची तयारी असतेच शिवाय एक अतिशय नाजूक व हळवा भाग आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आहे, ‘तो म्हणजे स्त्रियांचे सौंदर्यशास्त्र’ यात नाईलाजाने चेहऱ्याची ठेवण व दातांची रचना यालाही नको इतके महत्त्व आहे. अगदी अंधश्रद्धा इतक्या टोकाच्या आहे की मुलींच्या दातांना फट असतील किंवा त्यांचे दात पुढे असते तर तिला मंगळ आहे. असे समजून तिचे लग्न होण्याला या मंगळाने फार अमंगळ भूमिका बजावली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा काही पालक मुलगी लग्नाची वयाची झाली की अशा उपचार पद्धतीकडे वळतात. कर्ज काढून मुलींचे लग्न करणाऱ्या बापाला अशा या उपचार पद्धतीचा अदृश्य फटका हा बसतोच.

या उपचार पद्धतीच्या खर्चाची सुरुवात ही साधारणतः २५०००/- रुपयांपासून होते. ते काही ठिकाणी हा खर्च लाखभर (१,००,०००/-) रुपयांपर्यंत ही जातो. नवीन आधुनिक पध्दतीत तर २/३ लाख सुध्दा लागतात. अर्थात यात वेगवेगळ्या पद्धतीचे नियम व उत्पादने वापरले जातात. साधारणतः आपण दातांना बाहेरून तारा लावतो. त्या जर मेटल किंवा स्टीलच्या असतील तर खर्च कमी असतो. परंतु या मेटल किंवा स्टीलच्या तारा दिसायला जरा अनाकर्षक असतात. शिवाय त्यांची स्वच्छता जास्त ठेवावी लागते. तुम्ही जर योग्य वयात तुमची तपासणी करून घेतली तर हा खर्च कमी होतो. साधारणतः १० – १२ वर्षांपासून आपले दात वाकडे-तिकडे असतील तर दातांच्या डॉक्टरांना दाखवायला हवे. काही अनिष्ट सवय आपल्याला असेल तर वेळीच डॉक्टर ती तपासून दुरुस्त करू शकतात. शक्यतो ज्या लहान मुलांच्या दातांमध्ये दुधाच्या फटी किंवा गॅप असतात त्यांचे पर्मनंट दात चांगले येतात. दुधाचे दात २० असतात तर कायमचे दात ३२ असतात. त्यामुळे दातांमध्ये जागा असल्यास कायमचे दात ती जागा व्यापून घेतात व दात चांगले येतात. याखेरीज योग्य वयात साधारणतः १४ ते १५ यावर्षी जेव्हा तुमचे सर्व दुधाचे दात पडतात व कायमचे पक्के दात येतात त्यावेळी आपणाला ही उपचार पद्धतीची गरज असेल. आपण ती त्यावेळेसच चालू केली तर लहान वयात दातांची हालचाल ही हाड कोवळे असल्यामुळे सहज होते. यात अजून एक फायदा असा आहे की लहान वयात मेटल किंवा स्टीलच्या तारा ज्या कमी खर्चिक आहेत त्या बसविल्या तरी आपण किशोरवयीन असल्यामुळे दिसल्यावर इतके आपले लक्ष जात नाही. शिवाय उच्च महाविद्यालय शिक्षण घेण्या अगोदरच म्हणजेच प्रौढ होण्याअगोदर आपला उपचार पूर्ण होतो. पैसे कमी लागतात .

त्यानंतर कॉस्मेटिक ब्रेसेस नावाचे उत्पादन बरेच लोक स्वीकारताना दिसतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात दातांच्या रंगांचे म्हणजेच सिरॅमिक (व्हाईट ब्रेसेस) तारा वापरल्या जातात. या तारा काही अंतरावरून दिसूनही येत नाहीत. त्या इतक्या चांगल्या प्रकारे लावल्या जातात. याचा खर्च ३५,०००/- ते ४५०००/- पर्यंत येतो. हा खर्च जास्त असल्यामुळे पेशंट व डॉक्टर एकमेकांना समजून घेत काही रक्कम जमा करून बाकीची रक्कम प्रत्येक महिन्याला किंवा व्हिजिटला जमा करतात. यामुळे पेशंटच्या अंगावर एकत्रित खर्चाचा ताण येत नाही.

अर्थात काही पेशंट्स असेही असतात की ज्यांना ही बाहेरचे दिसणारी सिरॅमिक व्हाईट ब्रेसेसही दिसायला नको असतात व त्यासाठी त्यांची हवी तेवढी खर्च करण्याची तयारी असते. काही सिने कलाकार, टीव्ही कलाकार, नाट्यकलाकार, शिक्षक, अध्यापक, उद्योगपती, व्यवसायिक, डॉक्टर, वकील, सीए, बिल्डर, वक्ते, ट्रेनर, जे सतत लोकांच्या संपर्कात असतात, पब्लिक फिगर असतात, ज्यांना सतत बोलावे लागते, अशा लोकांना आपले स्वरूप हे एक भांडवल स्वरूपात सादर करावयाचे असते असे पेशंट्स या उपचार पद्धतीकडे एक गुंतवणूक म्हणून पाहतात. कारण जितके आकर्षक ते दिसतात, बोलतात, राहतात, हसतात तितकी त्यांची फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू अधिक असते असे त्यांना वाटते. त्यामुळे लाखोंचा खर्च येऊनही अशा लोकांसाठी हल्ली “इनव्हिजीबल ” ऑर्थोडॉंटीक्स म्हणजे पारदर्शक न दिसणाऱ्या ॲक्रेलिक मटेरियलच्या उपचार पद्धती वापरल्या जातात. प्रचंड मार्केटिंग व जागरूकतेमुळे आजकल सर्व नवतरूणांना हीच ट्रीटमेंट योग्य वाटते. अर्थात याचा अपेक्षित परिणाम मिळायला वेळ लागू शकतो.

या उपायांशिवाय काही वेळा मायो फंक्शनल ही आणि एक उपचार पद्धती ही या क्षेत्रामध्ये वापरल्या जातात. यामध्ये तुमच्या हनुवटीवर (चिन कॅप) बाह्य उपचार केले जातात. हेडगेअर किंवा टाळूच्या आतल्या भागात काही उपकरणे वापरूनही तुमच्या दातांमध्ये बदल केले जातात. ही पद्धत फार कमी वेळा वापरली जाते. काही वेळा ‘क्रॉस बाईट’ नीट करण्यासाठी काही उपकरणे वापरावे लागतात.

अशा अनेक प्रकारे तुम्ही आहे त्यापेक्षा स्मार्ट दिसावे यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. जितकी तुमची साथ व सहकार्य अधिक तितके उपचार व परिणाम उत्कृष्ट येतात हे मात्र नक्की. शेवटी तुम्ही हसतांना किती गोड हसून समोरच्याचे स्वागत करता हे महत्त्वाचे. तुम्ही केलेले एखाद्याचे स्वागत , भेटणाऱ्या त्या व्यक्तीच्या आयुष्यभर लक्षात रहावे इतके ते हास्य गोड हवे.

Story img Loader