Healthy Eating: भारतामधील विविध राज्यांमधील अनेक पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. जे आता फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक भागांत प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे पालक पनीर. पालक आणि पनीर या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? पालक पनीरची भाजी निरोगी अन्न संयोजन नाही, पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी त्यांच्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, असे काही संयोजन आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी घातक मानले जातात.
“निरोगी खाणे म्हणजे फक्त योग्य अन्नपदार्थ खाणे असे नाही. याचा अर्थ, योग्य संयोजन असलेले योग्य अन्नपदार्थ खाणे,” अग्रवाल म्हणाले की, असे काही संयोजन आहेत, जे एकत्र खाल्ले तर “एकमेकांचे पोषक शोषण रोखतात.”
कॅल्शियम आणि लोह हे असेच एक मिश्रण आहे. तज्ज्ञांच्या मते पालकमध्ये भरपूर लोह असते आणि पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर असते. “जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र खाल्ले जातात तेव्हा कॅल्शियम लोहाचे पोषक शोषण रोखते, त्यामुळे लोहाच्या जास्तीत जास्त वापरासाठी पालक पनीरच्या जागी पालक-बटाटा किंवा पालक-मक्याची भाजी खा” असे त्यांनी सांगितले.
पोषणतज्ज्ञ आणि DtF च्या संस्थापक सोनिया बक्षी यांनी सहमती दर्शवली आणि त्यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला सांगितले की, कॅल्शियम एकत्र घेतल्यास लोहाचे शोषण रोखते, कारण “कॅल्शियम आणि लोह दोन्ही एकाच रिसेप्टर्ससाठी स्पर्धा करतात आणि म्हणूनच दूध, चहा, कॉफी किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांसह लोह पूरक आहार घेऊ नये. याच कारणासाठी जेवणाबरोबर चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. मसूर आणि सोयाबीनमध्ये भरपूर लोह असते आणि म्हणूनच दही हे छोले, राजमा आणि डाळ यांच्याबरोबर घेऊ नये. त्यामुळे भरपूर लोह असलेली पालक पनीरबरोबर खाऊ नये,” असे त्यांनी सांगितले.
फिटनेस आणि पौष्टिक शास्त्रज्ञ आणि फूड दरझीचे सह-संस्थापक डॉ. सिद्धांत भार्गव, यांनी सांगितले की, पालक-पनीर खरोखरच आरोग्यदायी जेवण नाही. काही पदार्थ एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. ते एकमेकांची पोषण शोषण क्षमता मर्यादित करतात. कॅल्शियम आणि लोह हे असेच एक मिश्रण आहे. पालक-पनीरमध्ये, पनीरमध्ये असलेले कॅल्शियम हेम आणि नॉन-हेम लोहाचे शोषण मर्यादित करते,” असे त्यांनी सांगितले.