पालक मुलांना फोन देतात आणि त्यानंतर बहुतेक पालकांच्या मनातला संशयाचा किडा वळवळ करायला लागतो. आपलं पोर ऑनलाईन जगात जाऊन नक्की काय करतंय. त्याचा वापर नेमका काय आहे हे सगळे तपशील पालकांना हवे असतात. मुळात मुलांना अगदी लहान वयात मोबाईल देताच कामा नये. पण पालक देतात आणि मग मुलांच्या मोबाईलची हेरगिरी करत बसतात. अनेकदा मुलांना ते आवडत नाही. ते स्वतःचे पासवर्ड पालकांना सांगत नाहीत, संवाद हा संशयातून तयार झालेला असेल तर मुलं ऑनलाईन जगात ते काय करतायेत याचा पत्ताही पालकांना लागू देत नाहीत. त्यामुळे संशयाची नजर न ठेवता मुलांशी संवाद ठेवला तर त्या जगात काय सुरु आहे हे पालकांनी विचारलं नाही तर मुलं येऊन सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला अनेक पालक हा प्रश्न विचारतात की मुलांना मोबाईल देताना आम्ही पॅरेंटल कंट्रोल लावून दिले तर? एकच सांगते, पेरेंटल कंट्रोलला चकवायचे कसं हेही मुलांना व्यवस्थित माहित असतं. त्यामुळे मोबाईल तर द्यायचा, संशय ठेवायचा आणि पेरेंटल कंट्रोल लावायचे हे अगदीच भीषण गणित आहे. त्यापेक्षा योग्य वय होईपर्यंत स्वतःचा फोन न देणं आणि दिला की त्याविषयी बोलत राहणं हा अधिक शाश्वत पर्याय आहे.

हेही वाचा… स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांसाठी लढणारी लढवय्यी!

जी मुलं पालकांचेच मोबाईल वापरत असतात त्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या वयाला अनुरुप नसलेला कन्टेन्ट सहज त्यांच्यापर्यंत पोचतो ही वस्तुस्थिती आहे. अरुण साधू फेलोशिपचे काम करत असताना, संशोधनातून लक्षात आलं की पॉर्न मुलांपर्यंत पोहोचण्याचं पहिलं माध्यम मोठ्यांचे फोनच असतात. पालकांच्या किंवा मोठ्यांच्या फोनमधूनच अनेकदा मुलं ज्या कॉन्टेन्टचा ग्राहकच नाहीयेत तोही कन्टेन्ट ते बघायला, वाचायला, ऐकायला लागतात. म्हणूनच पेरेंटल कंट्रोल्स मुलांच्या नाही तर पालकांच्या फोनसाठी वापरणं गरजेचं आहे. जेणेकरुन मोठ्यांच्या जगाने बघितलेला कन्टेन्ट जसाच्या तसा मुलांच्या हाताशी लागणार नाही.

हेही वाचा… बहुविकलांगतेवर मात करणारी कृष्णा बंग आता वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर; माय-लेकीचा प्रेरणादायी प्रवास

आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये पेरेंटल कंट्रोल असा पर्याय असतो. तो सुरू केला की मुलांपासून ऍडल्ट कंटेंट लांब ठेवता येऊ शकतो. मोठे बघतात तो सगळा कन्टेन्ट मुलांनी बघण्या वाचण्यालायक असतोच असं नाही. पण जेव्हा मोठ्यांचे फोन लहान मुलांच्या हातात जातात तेव्हा लहानांसाठी नसलेलं मोठ्यांचं जग अचानक त्यांच्या पुढ्यात येऊन पडतं. आणि ज्या कॉन्टेन्टचा ते ग्राहकच नाहीयेत तोही कन्टेन्ट ते बघायला, वाचायला, ऐकायला लागतात.

पेरेंटल कंट्रोल्स काय करतात?

१) तुम्ही जर कुठलं फॅमिली लिंक अ‍ॅप वापरत असाल तर तुमच्या मुलांच्या वापरावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवता येतं.

२) पेरंटल कंट्रोल्स सुरू केलं की आपलं मूल आपला फोन किती वापरतंय हे समजू शकतं.

३) मुलांचा आपल्या फोनवरचा स्क्रीन टाईम किती आहे, गुगलच्या कुठल्या गोष्टी त्यांनी बघितल्या हे समजू शकतं.

४) त्यांनी कुठल्या साईट्स वापरायच्या नाहीत हे पालकांना ठरवता येतं.

५) मुलं जर पालकांचा फोन वापरत असतील तर त्यांच्या डिजिटल फूटप्रिंट्सवर लक्ष ठेवता येतं.

मुलांवर, विशेषतः लहान मुलांच्या डिजिटल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेरेंटल कंट्रोल्स वापरणं ठीक आहे पण मुळात मुलांना माध्यम शिक्षित करणं आवश्यक आहे. कारण माध्यम शिक्षण दीर्घकाळ उपयोगी पडतं. मुलांच्या वापरावर आज पेरेंटल कंट्रोल्स वापरून नियंत्रण ठेवाल पण उद्याचे काय? जेव्हा मुलं पंधरा, सोळा वर्षांची होतील, अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा काय? जर ते माध्यम शिक्षित असतील तर डिजिटल जगाचा योग्य वापर कसा करायचा याचा विचार ते करु शकतील अन्यथा नाही. त्यामुळे पेरेंटल कंट्रोल्स ही सोय असली तरी ते कायमस्वरूपी उत्तर नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parental control and usage of mobile phones by children hldc dvr
Show comments