Parineeti Chopra’s weight loss routine: अभिनेत्री परिणीती चोप्राची वजन कमी करण्याची प्रक्रिया आणि त्याचा परिणाम हा सर्वांनाच थक्क करणारा होता. डेब्यूच्या चित्रपटानंतर काहीच महिन्यांनी परिणितीने आपला लुक पूर्णपणे पालटून टाकला होता. अलीकडेच एका नव्या व्हिडिओमध्ये, तिने नवा आगामी चित्रपट ‘चमकिला’ मध्ये एक पात्र साकारण्यासाठी १५ किलो वजन वाढवल्याचा खुलासा केला होता. चित्रपटाच्या शूटिंगनंतर आता पुन्हा वजन कमी करण्यासाठी ती जिममध्ये एरोबिक, फंक्शनल आणि वेट ट्रेनिंगच्या मिश्रणासह व्यायाम करत आहे. शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढवण्यासाठी स्क्वॅट्स, लंजेस आणि शोल्डर प्रेसचा तिच्या व्यायामाच्या रुटीनमध्ये समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, तिने व्यायामात वैविध्य आणण्यासाठी, कलारीपयट्टू या प्राचीन मार्शल आर्ट फॉर्मचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी कलरीपयट्टू हा जादुई व्यायाम ठरू शकतो असे समजतेय. यावर तज्ज्ञांचं मत काय हे सुद्धा जाणून घेऊया..
कलरीपयट्टू वजन कमी करण्यात कशी मदत करते?
कलारीपयट्टू मास्टर डॉ. अय्यप्पन व्ही नायर, सल्लागार, स्पोर्ट्स मेडिसिन आणि आर्थ्रोस्कोपी, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की हा ३००० वर्ष जुना मार्शल आर्ट प्रकार उच्च-तीव्रता इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) च्या समतुल्य आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामाचा हा प्रकार उच्च-तीव्रतेचे व्यायाम करताना मधील विश्रांतीच्या कालावधीत किंवा कमी-तीव्रतेच्या व्यायामाच्या दरम्यान कलारीपयट्टू सराव करता येऊ शकतो.
कलरीपयट्टूमध्ये अनेक अनुक्रम आहेत, ज्यांना ‘मायपायट्टू’ म्हणून ओळखले जाते, जे HIIT मध्ये आढळलेल्या वर्कआउटच्या तीव्रतेसारखे आहे. कॅलरी कमी होण्याचे प्रमाण देखील HIIT प्रमाणेच आहे. तसेच, यात योग, लवचिकता, स्ट्रेचिंग, शक्ती प्रशिक्षण आणि कॅलिस्थेनिक्स या घटकांचा समावेश असल्याने, कलारीपयट्टू हा एक व्यापक व्यायाम ठरतो.
डॉ. नायर यांच्या मते, आठवड्यातून किमान तीन किंवा चार वेळा कलरीपयट्टूचा सराव उत्तम वजन कमी करण्यासाठी पुरेसा आहे. कॅलरी बर्न करण्याची कार्यक्षमता इतर नियमित वर्कआउट्सपेक्षा वेगवान आहे. एक सामान्य कलारीपयट्टू प्रशिक्षण सत्र कमीत कमी एक तास सराव करतो, ज्यामध्ये हळूहळू वॉर्म-अप आणि मग स्ट्रेचेसचा समावेश असतो. कलारीपायट्टूमधील अनोखे स्ट्रेच आणि किक इतर कोणत्याही मार्शल आर्ट प्रकारात दिसत नाहीत.
कलरीपयट्टूमध्ये विविध योगासने असतात जी जलद गतीने केली जातात. त्यामुळे या प्रकाराला योगा म्हणता येणार नाही कारण योगामध्ये आसनांचा संथपणे सराव केला जातो. कलारीपयट्टूमुळे एका तासात सुमारे १००० कॅलरीज बर्न होऊ शकतात. इतकंच नव्हे तर एका सत्रानंतर काही तासांपर्यंत शरीराला फॅट्स बर्न करण्यासाठी कलारीपयट्टू सक्रिय ठेवते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणताना उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांवर सुद्धा अंकुश ठेवता येतो.
हे ही वाचा<<थंडीच्या ४ महिन्यात पालकाचे सेवन केल्यास शरीरात काय बदल होऊ शकतात? डॉक्टरांनी सांगितलं गणित
मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट मिहिरा खोपकर यांनी कलरीपयट्टूला फिटनेस आणि वजन कमी करण्याचा मार्ग म्हणून अधोरेखित केले आहे. “मानसिक आरोग्य, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य, शरीराची रचना किंबहुना, कंबर किंवा नितंबाचा घेर कमी होणे, शरीरातील फॅट्सचे प्रमाण कमी करणे आणि स्नायूंच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कलारीपयट्टू फायदेशीर ठरू शकते.