Organic Vegetables Benefits औषधाविना उपचार या मालिकेत आपण आज समजून घेणार आहोत ते परवल, भोकर, प्लॉवर, बटाट आणि बीट या भाज्यांचे महत्त्व. यातील बटाटा हा आता जगभरात सर्वत्र सर्वाधिक वापरला जात असलेला असला तरी अद्याप भारतातील त्याचा वापर तुलनेने कमी आहे. आत समजून घेऊ की, या भाज्यांचा वापर उपचारांसाठी कसा करून घेता येऊ शकेल…
परवल
परवलाची फळे तोंडल्यासारखी असतात. उत्तरेत काशी, अलाहाबाद, दिल्ली या ठिकाणी या भाजीची फार चलती आहे. पथ्यकर भाज्यांत परवलाचा क्रमांक फार वरचा आहे. मोठ्या आजारात, जेवणावर नियंत्रण असते, लंघन चालू असते, आहार मर्यादित असतो. अशा अवस्थेतून प्रकृती सुधारण्याकरिता आहार वाढविण्याकरिता परवल भाजी खाऊन सुरुवात करावी. जेवणातील इतर पदार्थ खाण्याअगोदर परवल उकडून खावे. परवल पचायला हलके, रूचिप्रद व निर्दोष आहे. सततचे पडसे, सर्दी, ताप या विकारात परवलाची भाजी खावी, भूक लागते. हे विकार पुन्हा उद्भवत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भोकर

भोकरास ‘श्लेष्मान्तक’ म्हणजे कफ दूर करणारे फळ अशा अर्थाचे संस्कृत नाव आहे. जीर्णज्वर, जुलाब, लघवीची तिडीक, छातीत कफ होणे या विकारात नुसती भाजी म्हणून नव्हे तर औषधे म्हणून जरूर वापर करावा. भोकराची भाजी किंवा पिकलेली फळे खाऊन आतड्यांना जोम येतो. वजन वाढते. याचे लोणचेही केले जाते.

फ्लॉवर

फ्लॉवर किंवा फुलकोबी दीर्घकाळच्या आजारानंतर ताकद मिळण्याकरिता उपयुक्त आहे. फ्लॉवरमध्ये कीड असते. त्यामुळे फ्लॉवर स्वच्छ करताना कीड राहणार नाही याची काळजी घ्यायलाच पाहिजे. फ्लॉवर पचावयास जड आहे. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी, पोट दडस होते त्यांनी फ्लॉवर टाळावा. कच्चा फ्लॉवर चवीला चांगला लागतो. पण ज्यांची जीभ अगोदरच जड आहे त्यांनी कच्चा फ्लॉवर खाऊ नये. फ्लॉवर नेहमी खाल्ल्यामुळे घसा जड होतो. तहान वारंवार लागते.

बटाटा

बटाटा, पिंडाळू, गोलालू या नावाने ओळखली जाणारी ही भाजी वैश्विक, सर्व जगभर बहुसंख्य लोक खात असलेली आहे. आपल्याकडे बटाट्याचा तुलनेने ‘पर कॅपिटा’ वापर कमी आहे. बटाटा शीतल, मधुर रस गुणाचा मलावष्टंभक आहे. ताकदीकरिता बटाटा खावा. स्काव्र्ही या विकाराच्या रुग्णांकरिता बटाटा आवश्यक अन्न आहे. सालासकट बटाटा खाण्याने दात बळकट होतात. भाजल्यावर बटाटा उगाळून त्याचे गंध लावावे. फोड येत नाहीत. बटाटा स्तन्य आहे. बाळंतिणीनं दूध वाढण्याकरिता व तोंड आलेल्या रोग्यांनी बटाटा उकडून खावा. बटाट्याच्या पानात जवखार आहे. लघवी अडल्यास बटाट्याच्या पानांचा रस घ्यावा.

…तर बटाटा वर्ज्य करावा

कच्चा बटाटा दाह निर्माण करणारा आहे. बटाटा बद्धकोष्ठ वाढवतो. सतत सर्दी, शिंका यांचा त्रास असणाऱ्यांनी बटाटा खाऊ नये. बटाटा जास्त खाल्ला तर अग्नी मंद होतो. मधुमेही व रक्तात चरबी वाढलेल्या, स्थूल व्यक्तींनी बटाटा पूर्ण वर्ज्य करावा. शरीरात सर्वत्र सूज आली असताना बटाटा वर्ज्य करावा. वारंवार जुलाब, पोटदुखी तक्रार असणाऱ्यांनी बटाट्याच्या वाटेस जाऊ नये.

बीट

आपल्या महाराष्ट्रात बिटाचा वापर कमी आहे. क्वचित सलाडबरोबर किंवा इतर भाज्यांना रंग यावा म्हणून बिटाचे चार तुकडे मिसळण्याचा प्रघात आहे. बीट ही भाजी पाश्चिमात्यांची भारताला देणगी आहे. ऊस पुरेसा मिळेनासा झाला की, काही साखर कारखान्यांना साखर बनविण्याकरिता बिटाचाच आश्रय घ्यावा लागेल, असो.

बिटाचा हलवा

बीट कच्चे उकडून त्याचा रस विविध प्रकारे वापरता येतो. घशातील जळजळ, अम्लपित्त, पित्त होणे, मूळव्याध, रसक्षय, विलक्षण थकवा, हातापायांची ताकद जाणे, वजन घटणे, दिर्घकाळचा पांडू विकार या तक्रारीत बिटाचा रस किंवा कोशिंबीर जरूर खावी. कच्चे बीट तरुण माणसाने जरूर खावे. कोणतेही श्रम सहन करण्याची टिकाऊ ताकद येते. चवीकरिता शेंगदाणे, आले, कांदा यांची योजना करावी. गाजरासारखा बिटाचा हलवा किंवा शिरा उत्तम होतो. तुलनेने साखर कमी लागते. बीट वाळवून त्याचा कीस केल्यास त्यांतील शरीरास बळकटी आणणारे गुण कमी होतात. बीट नेहमी ताजेच खावे.