Are Peanuts Good for Weight Loss: वजनवाढ ही सध्या सर्वच वयोगटांतील व्यक्तींसाठी एक मोठी समस्या झाली आहे. बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरतेय. सध्या तर काही लहान मुलेदेखील लठ्ठपणामुळे त्रस्त असल्याचे पाहायला मिळतेय. बैठ्या जीवनशैलीमुळे जगभरात अतिवजनाची समस्या वाढत आहे. वाढलेल्या वजनाचा दुष्परिणाम केवळ व्यक्तिमत्त्वापुरताच मर्यादित न राहाता, त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे गंभीर आजारही होऊ लागले आहेत. आहारामध्ये आपण काय खातो आणि किती प्रमाणात खातो? याला फार महत्त्व आहे. शरीराला आवश्यक स्निग्धता मिळवून देणारा पदार्थ म्हणजेच शेंगदाणा. शेंगदाण्यामुळे तुमचे वजन खरोखरच कमी होऊ शकते काय? याच विषयावर योग प्रशिक्षक सौरभ बोथरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेस माहिती दिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
सौरभ बोथरा यांच्या मते, “शेंगदाण्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर, लोह, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. दररोज याचे सेवन केल्याने शरीर आणि मन आतून मजबूत होते. आजारांपासून दूर राहण्याबरोबरच ते चांगल्या शारीरिक विकासास मदत करते. शेंगदाणे पोषक घटकांनी समृद्ध असतात. त्यातून कॅलरीजचे सेवन नियंत्रित करणे सोपे करते आणि वजन कमी करण्यास मदत होते. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात. शेंगदाणे ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे, जो चयापचय वाढवतो आणि परिणामी तुम्ही विश्रांतीच्या वेळी व एखादे काम करताना अधिक कॅलरी बर्न करतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.”
शेंगदाण्यांचे सेवन केल्यान वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो. वजन कमी करण्यात शेंगदाणे फायदेशीर ठरतात. त्यातील हाय प्रोटीन तुम्हाला एनर्जी देते. पचनक्रिया चांगली राहते. याव्यतिरिक्त शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स जसे की अल्फा, लिनोलेनिक अॅसिड असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे फक्त शेंगदाणे नाहीत, तर तुमच्यासाठी एक खजिना आहेत. योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते आपले वजन व्यवस्थापित करण्यात फायदेशीर ठरतात.
भूक नियंत्रित राहाते

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड घटक असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही हृदयविकारांपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि तुमचे हृदय निरोगी राहते. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शेंगदाणे खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते, ज्यामुळे आपल्याला जास्त खाण्यापासून प्रतिबंध होतो. त्यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात याचा नक्कीच समावेश करा. “मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास, शेंगदाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर पूरक ठरू शकतात”, असे जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी सांगितले.

कोणत्या प्रकारचे शेंगदाणे खाण्यासाठी योग्य?

  • अतिरिक्त साखर आणि मीठ असलेल्या शेंगदाण्यांऐवजी चवरहीत आणि बिनमिठाच्या शेंगदाण्यांचा आहारात समावेश करा.
  • तुम्ही शेंगदाणे उकडूनदेखील खाऊ शकता. पोहे, उपमा, चटण्या आणि घरगुती शेंगदाणा बटर यांसारख्या पदार्थांमध्ये तुम्ही शेंगदाण्यांचा समावेश करू शकता.
  • जेवणात किंवा नाश्त्यामध्ये विविध फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांसह शेंगदाणे एकत्र केल्यास पौष्टिक गुणवत्ता वाढू शकते. त्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होऊ शकते.

त्याचप्रमाणे गरज भासल्यास डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peanuts for weight loss do peanuts help lose weight know from expert pdb