पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (पीआयडी) हा आजार महिलांच्या पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करतो. असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे हा आजार पसरतो. यात लैंगिक संक्रमित जीवाणू तुमच्या योनीतून तुमच्या गर्भाशयात, गर्भाशय ग्रीवा, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयात पसरतात आणि हा आजार बळावतो. या आजारामुळे महिलांची प्रजनन क्षमता नष्ट होऊ शकते. म्हणून या आजाराचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छतापूर्ण लैंगिक संबंध ठेवले पाहिजे. तसेच तुम्हाला गर्भधारणेचा त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. यावर प्रिस्टिन केअरच्या सह-संस्थापक आणि पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा पीआयडीच्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गरिमा साहनी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे,
डॉ. गरिमा साहनी यांच्या मते गोनोरिया आणि क्लॅमिडीया यांसारख्या लैंगिक संक्रमित संसर्गामुळे (STI) हा आजार होतो. यावर उत्तर अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग क्लिनिकमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, उपचारांअभावी क्लॅमिडीयल संसर्ग असलेल्यांपैकी सुमारे १० टक्के आणि गोनोरिया संसर्ग असलेल्यांपैकी ४० टक्के लोकांना पीआयडीचे संक्रमण होत आहे.
पीआयडीची कारणे आणि लक्षणे
पीआयडी संक्रमित रुग्णांमध्ये अनेकदा कोणतीही लक्षणे नसतात किंवा काही वेळा गंभीर लक्षणं दिसून येतात. यामध्ये ओटीपोटात वेदना, योनीतून असामान्य स्त्राव, लघवी करताना वेदना होणे, अनियमित मासिक रक्तस्त्राव आणि ताप अशी लक्षणे दिसून येतात. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजवर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाला अकाली वंध्यत्व, क्रोनिक पेल्विक वेदना आणि एक्टोपिक गर्भधारणा (गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा) यांसारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते, जी अनेकदा जीवघेणी ठरू शकते, असे डॉ. साहनी यांनी नमूद केले.
काही स्त्रियांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे रोगाचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे कठीण होते. परिणामी जोपर्यंत तुम्हाला गर्भधारणा होण्यात अडचण येत नाही किंवा तीव्र ओटीपोटात वेदना होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पीआयडी आहे हे समजू शकत नाही. यूएस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, पीआयडीचा इतिहास असलेल्या आठपैकी एका महिलेला गरोदर राहण्यात अडचणी येतात.
यावर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हटले की, ज्या स्त्रिया लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेत, विशेषत: ज्यांचे अनेक लैंगिक भागीदार आहेत किंवा ज्यांना एसटीआयचा इतिहास आहे, त्यांना पीआयडीचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे.
याव्यतिरिक्त किशोरवयीन आणि तरुण प्रौढ त्यांच्या जोखमीच्या लैंगिक संबंधांमुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
पीआयडी प्रतिबंध आणि उपचार
डॉ. साहनी यांनी सांगितले की, सुरक्षित सेक्सचा लैंगिक संबंध ठेवून तुम्ही पीआयडीला प्रतिबंध करू शकता. यामध्ये लैंगिक संबंधांच्यावेळी कंडोमचा योग्यप्रकारे वापर करणे गरजेचे आहे. शिवाय, पीआयडीचा धोका कमी करण्यासाठी नियमित STI चाचण्या करून त्यावर त्वरित उपचार करणे महत्वाचे आहे.
या आजारामुळे काही वेळा योनीतील अवयवांचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते आणि संक्रमणाचा धोका वाढू शकतो. पण, या आजाराचे वेळीच निदान झाल्यास औषधांच्या मदतीने उपचार करता येतात, असेही डॉक्टर म्हणाल्या.
लवकर निदान झाल्यास पीआयडीवर प्रतिजैविकांच्या मिश्रणाने उपचार करता येईल, पण रुग्णाने वेळेवर औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. यातील गंभीर प्रकरणांमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि इंट्राव्हेनस अँटीबायोटिक्स आवश्यक असू शकतात. जर आतील अवयवांचे नुकसान होऊन गुंतागुंत निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासू शकते.