मासिक पाळीदरम्यान क्रॅम्प येणे किंवा असह्य वेदना होणे ही सामान्य गोष्ट आहे. त्या कालावधीत निम्याहून अधिक महिलांना सुरुवातीच्या एक-दोन दिवसांमध्ये असह्य वेदना सहन कराव्या लागतात. ही वेदना सामान्यत: मासिक पाळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जाणवते. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती देताना स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. जागृती वर्ष्णेय यांनी स्पष्ट केले, “मासिक पाळीदरम्यान, घट्ट झालेले एंडोमेट्रियम (Endometrium) म्हणजेच गर्भाशयाचे अस्तर (Uterus sheds) दूर जाते. हे काही हार्मोन्समुळे होते. जसे की, प्रोस्टॅग्लॅंडिन्स (Prostaglandins) नावाचा घटक; जो गर्भाशयाचे आकुंचन (Uterine contraction) वेदना व जळजळ निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. या लक्षणांमुळे मासिक पाळीदरम्यान महिलांना क्रॅम्प येतात.”
प्रत्येक महिलेला मासिक पाळीदरम्यान थोडी फार वेदना होणे सामान्य गोष्ट आहे; पण जर गंभीर लक्षणे असतील, ते जास्त प्रमाणात प्रोस्टॅग्लॅंडिनची पातळी जास्त असू शकते, परिणामतः फायब्रोइज्डस(Fibroid), एंडोमेट्रिओसिस (Endometriosis ) आणि ओवेरियन सिस्ट (Ovarian Cyst) या समस्या उद्भवू शकतात.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी पेन किलर घेताना काय करावे आणि काय टाळावे याबाबत डॉ. वर्ष्णेय यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा – रोज एकाच वेळी ५० पायऱ्या चढणे कमी करू शकते हार्ट अटॅकचा धोका? तुमच्यासाठी हे उपयुक्त ठरेल का?
मासिक पाळीसाठी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पेन किलर घेणे तसे सुरक्षित आहे; पण जर तुमची लक्षणे गंभीर असतील आणि तुम्हाला रोजची कामे करणेदेखील शक्य होत नसेल, तर तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
- जर सौम्य किंवा मध्यम स्वरूपात वेदना होत असतील, तर तुम्ही नॉनस्टेरॉइडल अॅंटी-इन्फ्लेमेटरी औषध (NSAID) जसे की, मेफेनॅमिक अॅसिड आणि इबुप्रोफेन घेऊ शकता.
- NSAID मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रोस्टॅग्लॅंडिनची निर्मिती रोखते. पण, हे औषध घेण्याचे एक विशिष्ट प्रमाण निश्चित केलेले आहे. इबुप्रोफेन- २०० एमजी; तर मेफेनॅमिक- २५० एमजी या प्रमाणातच या औषधांचे सेवन करावे.
- मासिक पाळीदरम्यान आठ तासांमध्ये फक्त एक किंवा दोन गोळ्यांचेच सेवन करावे. तसेच हे औषध पोटभर जेवणानंतरच सेवन करण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. कारण- त्यामुळे नंतर gastrointestinal म्हणजे पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात.
- जर तुम्ही निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पेन किलरचे सेवन केले, तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात पेन किलरचे सेवन केल्यामुळे थकवा खूप वाढतो आणि उलटी होण्याचा त्रास वाढू शकतो. ही लक्षणे मासिक पाळीदरम्यान महिलांना आधीपासूनच जाणवत असतात
- तसेच त्यामुळे बद्धकोष्ठता, जास्त रक्तदाब किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. तसे जास्त प्रमाणात NSAIDs घेतल्यामुळे पोटात अल्सर किंवा रक्तस्राव, मूत्रपिंड आणि हृदयाशी संबंधित त्रास अशी माहीत नसलेली लक्षणेसुद्धा दिसू शकतात.
हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?
मासिक पाळीदरम्यान वेदना कमी करणारे नैसर्गिक उपाय?
१. भरपूर पाणी प्या.
२. पोट जास्त फुगणार नाही याची दक्षता घ्या.
३. दाह कमी करणारा आहार घ्या. म्हणजे टोमॅटो, बेरीज, अननस, आले, हिरव्या पालेभाज्या, बदाम व अक्रोड इ.चे सेवन करा.
४. आहारात व्हिटॅमिन डी, इ व ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
५. गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेका.
६. व्यायामामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिन्स सोडली जातात; ज्यामुळे स्नायू मोकळे होतात.