Piles in Women : मूळव्याधी ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. गुदमार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात, ज्याला इंग्रजीत Hemorrhoidal Veins म्हणतात. चुकीचा आहार घेतल्यामुळे या रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्या फुगतात. ज्यामुळे आपल्याला शौचाला बसल्यावर जळजळ किंवा वेदना होतात. अनेकदा रक्तस्त्रावसुद्धा होतो, यालाच मूळव्याध असे म्हणतात.
फक्त पुरुषच नाही, तर स्त्रियांनासुद्धा मूळव्याधीचा त्रास होतो. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने हाऊस ऑफ डॉक्टरच्या संस्थापक डॉ. नीता मोदी यांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली.
कारणे
जंक फूड, मसालेदार जेवण, बद्धकोष्ठता, जास्त वजन उचलणे, गर्भधारणा, व्यायाम न करणे, तणाव इत्यादी कारणांमुळे महिलांना मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.
लक्षणे
महिलांमध्ये मूळव्याधीची लक्षणे सांगताना डॉ. मोदी सांगतात, “ज्यांना मूळव्याधीचा त्रास होतो त्यांना तीव्र वेदना होतात. गुदमार्गातून रक्तस्त्राव होतो किंवा जळजळ भासते. यापैकी कोणतीही लक्षणे दिसताच महिलांनी त्वरित उपचार घ्यावा.
हेही वाचा : तुम्हाला कधी सकाळी उठल्यानंतर Anxiety जाणवते का? वाचा, काय आहेत त्याची कारणे?
उपचार
- मूळव्याधीचे लक्षण दिसताच महिलांनी सुरुवातीला औषधोपचार घेणे आवश्यक आहे. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करावा.
- मल सॉफ्टनरमुळे मल सहज बाहेर येते आणि त्यामुळे वेदना कमी होतात.
- कॉर्टीकोस्टेरॉइड क्रीम जळजळ, वेदना आणि खाज कमी करण्यास मदत करतात. पण लक्षात घ्या, या औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या.
- मूळव्याध असलेल्या महिलांनी खुर्चीवर बसताना उशीचा वापर करावा. याशिवाय त्यांनी नियमित व्यायाम आणि स्ट्रेचिंग करावा.
- आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फायबरयुक्त आहार घ्या. याशिवाय बिन्स, ब्रोकोली, धान्ये, केळी, बदाम, ओट्स, संत्री, कॉर्न, चणे, सफरचंद, पालक, इत्यादी गोष्टी आहारात आवर्जून घ्याव्यात.
- भरपूर पाणी प्यावे. जंक फूड, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळा. यामुळे मूळव्याधीचा त्रास वाढू शकतो.
- तणावसुद्धा मूळव्याधीला आमंत्रण देतो. त्यामुळे नियमित योगा किंवा ध्यान करून तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा.
- दिवसातून दोन वेळा टपात शेक मिळेल इतके गरम पाणी घ्या आणि १० ते १५ मिनिटे गुदाशयाच्या भागाला मिळू शेक द्या यामुळे मूळव्याधदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतील.