Home Remedies for Stomach Worms औषधाविना उपचार – वेगवेगळ्या चवींची, वेगवेगळ्या गुणधर्मांची फळं ही निसर्गाने प्राणीसृष्टीला बहाल केलेली एक महत्त्वाची देणगी आहे. ही फळं वेगवेगळ्या विकारांमध्ये गुणकारी आहेतच शिवाय आरोग्यवान होण्यासाठीही ती उपयुक्त आहेत. यातील काही फळांचे गुणविशेष आपण आज समजावून घेऊ
अननस
काही फळे एकटा-दुकटा माणूस खाऊ शकतो. केळी, द्राक्षे, संत्री, मोसंबी, चिक्कू ही अशी फळे आहेत. पण काही फळे संपूर्ण कुटुंबाला मिळून खावी लागतात. अननस, पपई, फणस, कलिंगड ही फळे एकट्या व्यक्तीला खाऊन संपविता येत नाहीत. अननस हे सायट्रस फळांच्या जातीतील राजा फळ आहे. हल्ली अननस खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. रस्त्यावर, विशेषत: मुंबई शहर व उपनगरांत उघड्यावर कापलेल्या अननसाच्या फाकी मिळतात. त्या खाव्यात किंवा न खाव्या हा खरं तर ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.

जंतांवर जालीम उपाय

अननस फार लांबट नसावा. तो गोल व रुंद असावा. अननस अरुची दूर करण्याकरिता प्रसिद्ध आहे. अननस व किंचित मिरेपूड किंवा कणभर मीठ व चवीला साखर अशा फाकी खाल्ल्या की, तोंडाला चव येते. जेवणावर वासना येते. अधिक जेवण जाते. अननसाचा आणखी गुण असा की, त्याच्यातील भरपूर पाचक रसामुळे खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन होते व वारंवार मलप्रवृत्ती टळते. आहारापासून तयार झालेल्या रसधातूचे चांगल्या दर्जाच्या रक्तात रूपांतर होते. तात्काळ रक्तवर्धन करणाऱ्या पदार्थात अननस हे अग्रक्रमाचे फळ आहे. अननसाच्या सेवनाने पोटातील सर्व प्रकारचे जंत, लहान, मोठे सुतासारखे किंवा सुतळीसारखे, चपटे, गोल पाणी होऊन नाहीसे होतात. त्याकरिता मोठ्या मात्रेने अननस खावा लागतो. अननसाच्या जोडीला पपईच्या फळाचे सेवन केले तर यकृताचे कार्य चांगलेच सुधारते. आंबा, पपई, अननस असे एकत्र उत्तम रायते जेवणाला काही वेगळीच खुमारी आणते. इथे फोडणी मात्र मेथीची हवी व जोडीला गूळ वापरावा हे सांगावयास नकोच. अननस खूप उष्ण आहे. गर्भिणीला देऊ नये. गर्भपाताची शक्यता असते. ज्यांचे तोंड येण्याची, जिभेला फोड येण्याची खोड आहे त्यांनी तसेच मधुमेही व्यक्तींनी अननस खाऊ नये.

आंबा

हा ‘फळांचा राजा’ दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर गेला आहे. तरीपण औषध म्हणून काही महाग पडणार नाही, इतके श्रेष्ठ दर्जाचे गुण आंब्यात आहेत. ज्यांना वजन वाढवायची नितांत गरज आहे. बारीक छातीच्या, खुरट्या स्तनाच्या, अशक्त, दुर्बल, ओज गमावलेल्या, शुक्राणू कमी असलेल्या सर्वांकरिता, नियमितपणे आंबा संपूर्ण सिझनभर खाणे लाभदायक ठरेल. आंबा खायचा झाला तर तास दोन-तास पाण्यात भिजत टाकावा त्यामुळे त्यातील चीक बाधत नाही. आंबा चोखून खाल्ला तर बाधत नाही. रस बाधतो. आमरसाबरोबर मिरेपूड व चांगले तूप अत्यावश्यक आहे.

आंब्याचे विविध प्रकार- दशहरा, लंगडा, पायरी, तोतापुरी, केशर, मलगोवा, रायवळ.

पांडुता, अल्पार्तव, कष्टार्तव या विकारांत आंबा अत्यंत गुणकारी आहे. क्षय विकारात महागड्या टॉनिकपेक्षा आंबा दूध किंवा तुपाबरोबर घ्यावा. आंबा खाऊन अजीर्ण झाले तर आंब्यातील कोय हा निसर्गानेच योजलेला उत्तम उतारा आहे. स्त्रियांच्या धुपणी, पांढरे जाणे या विकारात तसेच सर्वसामान्यांच्या जुलाब, अतिसार, अजीर्ण, पोटदुखी, आमांश या तक्रारीत आंब्याची कोय फारच उपयुक्त आहे. आंब्याची कोय वरचे टरफल काढून बारीक तुकडे करून वाळवावी. चूर्ण करून वापरावे. हे औषध जास्त दिवस टिकत नाही. आंब्याच्या कोयीचे बारीक तुकडे करून एक दिवस मीठ पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी वाळवावे. सुपारीसारखे चघळायला उपयोगी पडतात. आंब्याच्या अजीर्णावर आलुबुखार हाही उत्तम उतारा आहे.

आंब्याची कोवळी पाने उलटीवरचा उत्तम उपाय आहे. आंब्याच्या मोहराचे तीळ तेलात उकळून सिद्ध केलेले तेल मऊ व बळकट केश संभाराकरिता उपयुक्त आहे. मधुमेही व्यक्तींनी आंबा पूर्ण वर्ज्य करावा, सॉरी!

अंजीर

एकेकाळी अंजीर फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळत असत. आता वर्षातील सहा महिने अंजीर मिळतात. रूक्ष, कृश, स्निग्धतेचा अभाव असणारे, चिडचिड स्वभाव झालेले, अकाली वजन घटणाऱ्यांकरिता अंजीर हे वरदान आहे. अंजीर सारक आहे. विशेषत: जागरण, रात्रपाळ्या, अति चहा किंवा धूम्रपान, दारू पिणे या कारणांनी आतड्यांचा क्षोभ होत असेल तर रोज सहा ताजे अंजीर खावे. एका आठवड्यात बराच फरक पडतो. अंजीर सेवनाने आतड्यांना आतमध्ये पडलेले चर भरून येतात. रक्ती मूळव्याध विकारांत अंजीर सेवन उत्तम उपाय आहे. ताज्या अंजिराअभावी सुके अंजीर दुधात कुस्करून घ्यावे. मात्र त्यात कीड नाही याची खात्री करून घ्यावी. बालक व वृद्धांच्या मलावरोधात अंजीर उत्तम कार्य करते.

कलिंगड

एक काळ कलिंगड फक्त मार्च, फेब्रुवारीमध्ये मिळायला लागायची त्यावेळेस जी चव असायची त्या चवीची कलिंगडे ऑक्टोबरपासून सतत आठ महिने मिळूनही आता दुर्मीळ झाली आहेत. तहान कमी करणे, रसधातू वाढविणे, लघवी साफ करणे हे गुण मात्र गोड कलिंगडातच सापडणार. कलिंगड जरी कितीही गोड असले तरी अतिरेकाने खाऊ नये. जुलाब होतात.

कुपथ्य : बाळंतीण, गर्भिणी यांनी कलिंगड बिलकूल खाऊ नये. त्यांच्याकरिता कलिंगड म्हणजे ‘पॉयझन’ आहे. विशेषत: गर्भिणीने व नवजात बाळंतिणीने किमान तीन महिने कलिंगड खाऊ नये. कलिंगडाऐवजी उन्हाळ्यात टरबूज (पांढऱ्या सालीचे, पांढरट पिवळसर गर असलेले) खावे. ते उत्कृष्ट तृषाहर आहे. चांगले टॉनिक आहे.

Story img Loader