PM Modi coconut water diet for Ram temple consecration : अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या भव्य सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ११ दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. यादरम्यान मोदी कडक व्रत पाळत असून जमिनीवर झोपत आहेत व केवळ नारळ पाण्याचे सेवन करत आहेत. ते अष्टांग योगातील यम नियमांचे पालन करून हे अनुष्ठान करत आहेत. पण, पंतप्रधान मोदींप्रमाणे ११ दिवस केवळ नारळ पाणी पिऊन उपवास करणे शरीरासाठी कितपत फायदेशीर आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच विषयावर ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आज आपण ११ दिवस उपवासादरम्यान नियमित केवळ नारळ पाणी पिण्याचे फायदे पाहणार आहोत…
आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, केवळ नारळ पाणी पिऊन उपवास करणे शरीरासाठी फायदेशीर आहे का असा प्रश्न बऱ्याच रुग्णांकडून विचारला जातो. निश्चितपणे नारळ पाण्यात अँटिऑक्सिडंट, रिहायड्रंट घटक आहे, याशिवाय ते शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन करते. परंतु, अधूनमधून किंवा सलग अनेक दिवस उपवास करणार असाल तर केवळ नारळ पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकत नाही. तसेच पोषणाचा एक विशेष स्त्रोत म्हणून त्यावर अवलंबून राहू शकत नाही. कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातही साखरेचे प्रमाण वाढू शकते.
‘या’ लोकांनी नारळ पाणी पिणे टाळा
याशिवाय सगळ्यांचे शरीर एकसारखे नसते. त्यामुळे उपवासादरम्यान नारळ पाणी पिणे सर्वांनाच फायदेशीर ठरू शकते असे म्हणू शकत नाही. विशेषत: मधुमेह असलेल्या लोकांना तर नारळ पाण्याचे योग्य प्रमाणातच सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांनाही नारळ पाण्याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
नारळ पाणी पिण्याचे फायदे
नारळ पाण्याचे नियमित माफक प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. या नैसर्गिक निर्जंतूक द्रवामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे अनेक महत्त्वपूर्ण घटक असतात, त्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास हातभार लागतो.
नारळ पाण्याचे सेवन पचनसंस्थेसाठीदेखील फायदेशीर असते. कारण यात शरीरात थंडावा निर्माण करणारे घटक आहे, ज्यामुळे
पचनासंबंधित आजार दूर करण्यास मदत होते. नारळ पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी, पोत सुधारण्यासाठी आणि तेजस्वी आणि ताजेतवाने दिसण्यासाठीदेखील फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यास फायदेशीर
याशिवाय एखादी व्यक्ती केवळ कमी साखरेचे प्रमाण असलेल्या नारळाच्या पाण्याचे सेवन करत असेल तर तिला शरीरातील कॅलरीची संख्या कमी करता येते. ज्यामुळे वजन कमी होते आणि प्रभावी वजन नियंत्रणात ठेवता येते, यामुळे चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही घटवता येते, कारण संशोधनात असे दिसून आले की, नारळ पाण्यात फक्त ४८ कॅलरीज असतात.
रक्तदाबासंबंधित समस्यांवरही नारळ पाणी अधिक फायदेशीर मानले जाते, कारण यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. एक कप नारळाच्या पाण्यात ६०० मिलीग्राम पोटॅशियम असते. नारळाच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट घटक ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि पेशींचे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते.
याव्यतिरिक्त त्यातील हायड्रेशन गुणधर्म शरीरासाठी एक प्रभावी हायड्रेटिंग एजंट बनवतात. तरीसुद्धा, लघवीचे प्रमाण वाढवणारे औषधी गुणधर्म लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, तसेच काळजीपूर्वक सेवन करणेही आवश्यक आहे.
संशोधनातून नारळ पाण्यातील अँटी-लिथिक गुणधर्म समोर आले आहे, जे किडनी स्टोनची समस्या दूर करण्यात मदत करतात; तसेच पोटॅशियम, क्लोराईड आणि सायट्रेटचे उत्पादन वाढवण्यासही हातभार लावतात. परंतु, लवघी संदर्भात कोणताही त्रास असल्यास नारळ पाणी पिताना डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
व्यायामानंतर नारळ पाणी पिणे उत्तम
व्यायाम केल्यानंतर रिहायड्रेटिंगसाठी नारळ पाणी उत्तम मानले जाते. जास्त घाम आणि निर्जलीकरणानंतर शरीरात एनर्जी निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक खनिजे प्रदान करण्यासाठी नारळ पाणी बेस्ट मानले जाते. इतर कोणत्याही एनर्जी ड्रिंकपेक्षा नारळ पाणी पिणे केव्हाही उत्तमच आहे.
परंतु, तुमची शारीरिक क्षमता आणि आजार लक्षात घेता नारळ पाणी पिण्याआधी तुम्ही आरोग्य आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही नारळ पाणी स्वयंपाक करताना विविध पदार्थ्यांमध्येही सहज वापरू शकता