जर तुम्ही संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी जेवण केले आणि लवकर झोपला तर ते तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायी ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परीक्षा पे चर्चा २०२५’च्या पॉडकास्टमध्ये बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्यासाठी सूर्यास्तापूर्वी जेवणाचे फायदे सांगितले. “एका शेतकऱ्याप्रमाणे, चांगल्या आरोग्यासाठी संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत जेवण करा. आजार नसणे म्हणजे आपण निरोगी आहोत असे नाही. झोप पोषणावरदेखील अवलंबून असते. वैद्यकीय शास्त्रदेखील झोपेवर लक्ष केंद्रित करते,” असे मोदी म्हणाले.

संशोधन काय सांगते?

सोशल मीडियावर सध्या फिरत असलेल्या २०२३ च्या संशोधन अभ्यासानुसार, “संध्याकाळी ७ वाजेपूर्वी जेवण केल्याने आयुष्यमान ३५ टक्क्यांनी वाढते. फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेला दुसरा अभ्यास, जो इटलीच्या ला’अक्विला प्रदेशात जिथे ९० आणि १०० वयोगटातील अनेक लोक राहतात यांच्यावर करण्यात आला होता. या अभ्यासात आढळून आले की, “स्थानिक लोक त्यांच्या दीर्घायुष्याचे श्रेय दोन मुख्य सवयींना देतात; रात्रीचे जेवण लवकर करणे आणि कमी कॅलरीयुक्त आहाराचे पालन करणे.

पोषण आणि झोपेमधील यांच्यामध्ये काय संबध आहे?

सायंकाळी ७ पूर्वी कमी प्रमाणात आहार घेण्याचे मोठे फायदे आहेत याबाबत वाढत्या पुराव्यांचा हवाला देऊन, चांगल्या आरोग्यासाठी तज्ज्ञ संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी कमी जेवण करण्याचा सल्ला देतात.

यामुळे पचन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते. पोट फुगणे टाळले जाते आणि पोटाच्या आतील भागात होणारा त्रास कमी करण्यासदेखील मदत होते. हलके आणि मसालेदार नसलेले पदार्थ खा,” असे मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे संचालक आणि वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ. मेघराज इंगळे म्हणाले.

डॉ. इंगळे यांच्या मते, “हे रक्तातील साखर नियंत्रण, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि चयापचय सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.”

“तुम्ही हळूहळू जेवा आणि अन्न चांगले चावून खा, यामुळे तुमच्या पचनसंस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या खाण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो,” असे डॉ. इंगळे म्हणाले.

संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी जेवण केल्याने आयुष्यमान ३५ टक्के वाढते हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही, परंतु पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती संधान सांगतात, “संशोधनातून असे दिसून येते की लवकर जेवण आणि वेळेचे बंधन असलेले जेवण दीर्घायुष्यासाठी फायदेशीर ठरू शकते.”

संध्याकाळी लवकर जेवण केल्याने तुमच्या खाण्याच्या पद्धती तुमच्या शरीराच्या नैसर्गिक चक्रांशी जुळतात, ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि चयापचय सिंड्रोमचा धोका कमी होतो, असे संधान सांगतात.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader