PM Modi Eats Makhana 300 Days A Year : देशाच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची योजना जाहीर केली. त्यातच आता पंतप्रधानांनी स्वत:देखील मखाना आवडीने खात असल्याचा खुलासा केला. पंतप्रधान मोदी भागलपूरमधील एका सभेत बोलताना म्हणाले की, आता देशातील अनेक शहरांमध्ये मखाना लोकांच्या नाश्त्यातील एक प्रमुख भाग बनला आहे. वैयक्तिकरीत्या बोलताना ते म्हणाले की, मी स्वत: वर्षातील ३६५ पैकी किमान ३०० दिवस मखाना खातो. हे एक सुपरफूड आहे, जे आपण जागतिक बाजापपेठेत नेले पाहिजे. म्हणून या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने मखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर वर्षातील ३६५ दिवस मखाना खाल्ल्यास शरीरास नेमके काय फायदे मिळतात ते जाणून घेऊ…
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बीफिटवर्ल्डच्या संस्थापक व न्यूट्रिशनिस्ट, आहारतज्ज्ञ भव्य मुंजाल म्हणाल्या की, वर्षातून ३०० दिवस दररोज मखाना सेवन केल्याने शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक, असे दोन्ही लक्षणीय परिणाम होऊ शकतात. हे परिणाम सेवन करण्याच्या पद्धती, प्रमाण व एकूणच आहारातील संतुलन यांवर अवलंबून असतात.
सकारात्मक परिणाम
१) हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलचे नियमन
मखानामध्ये फ्लेव्होनॉइड्स (कॅम्पफेरॉलसारखे) आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, ज्यात दाहविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
हे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉल (HDL) सुधारते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मखानाच्या नियमित सेवनाने एथेरोस्क्लेरोसिस आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो, असेही मुंजाल म्हणाल्या.
मखाना खाण्याचे इतर अनेक फायदे
१) वजन कमी करण्यास मदत
मखानामध्ये कमी कॅलरीज व उच्च प्रमाणात फायबर असल्याने वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. चयापचय क्रिया सुधारते. वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे सतत बाहेरचे खाण्याची सवय मोडण्यास मदत होते.
२) मधुमेह नियंत्रण
मखानामधील कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे रक्तप्रवाहातून शर्करा हळूहळू बाहेर पडते. मखानाच्या सेवनामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवता येते, असे वेट लॉस एक्स्पर्ट व हेल्थ अॅस्ट्रोनॉमीच्या न्यूट्रिशनिस्ट कनिका मल्होत्रा म्हणाल्या.
३) चांगल्या झोपेचा अनुभव
मखानामध्ये मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे ताणतणावावर नियंत्रण राहते. झोप चांगली लागते.
४) पचनक्रियेच्या आरोग्यात सुधारणा
मखानात उच्च प्रमाणात फायबर असते. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येतो. हे निरोगी आतड्यांचे मायक्रोबायोम राखण्यास मदत करते.
५) सांधे आणि हाडांना मजबुती
कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरसने समृद्ध अशा मखानाचे सेवन केल्यास हाडे आणि सांधे मजबूत होतात. ही बाब ऑस्टिओपोरोसिसचा धोका असलेल्या वृद्ध व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते.
६) अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत
अँटिऑक्सिडंट्स (फ्लेव्होनॉइड्स आणि केम्पफेरॉल) मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. चेहऱ्यावरील सुरकुत्या ही वृद्धत्वाची सुरुवातीची लक्षणे असतात, ती रोखण्यास मदत होते.
७) स्मरणशक्तीला आधार
मखानामध्ये थायमिन (व्हिटॅमिन बी१) असते, जे तुमच्या स्मरणशक्तीला आधार देते. ताण आणि चिंता कमी करते, मानसिक स्पष्टता वाढवते.
८) मूत्रपिंड आणि यकृताच्या आरोग्यास फायदेशीर
मखानातील डिटॉक्सिफाईंग गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच फॅटी लिव्हर डिसीज आणि किडनी स्टोनचा धोका कमी करता येतो.
मखाना खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
१) पचनासंबंधीत समस्या
मुंजाल यांच्या मते, मखानात जास्त फायबर असल्याने त्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस व बद्धकोष्ठता होऊ शकते.
२) हायपोग्लायसेमियाचा धोका
मखाना मधुमेहासाठी फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात मखाना खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी (हायपोग्लायसेमिया) कमी होऊ शकते, असेही मुंजाल म्हणाल्या.
३) अतिसेवन आणि वजन वाढणे
मखाना तूप किंवा बटरमध्ये भाजून खाल्यास, त्यातील कॅलरीजची संख्या लक्षणीयरीत्या वाढते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
४) अॅलर्जीचा धोका
मुंजाल यांनी सांगितले की, काही व्यक्तींना मखानाच्या सेवनामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे पुरळ, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
५) इलेक्ट्रोलाइट असंतुलन
मखानातील पोटॅशियमचे उच्च प्रमाण मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी किंवा हृदयरोग असलेल्यांसाठी हानिकारक असू शकते.
६) लोहाचे प्रमाण कमी
मखान्यामध्ये फायटिक अॅसिड असते, जे लोहाच्या शोषणात अडथळा आणू शकते. त्यामुळे मखानाचे लोहयुक्त पदार्थांसह संतुलन न साधल्यास सौम्य प्रमाणात अशक्तपणा येऊ शकतो.
सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणेच संयम महत्त्वाचा आहे, असे फरिदाबाद येथील एशियन हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ डॉ. कोमल मलिक यांनी अधोरेखित केले. “बहुतेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, दिवसातून एक मुठी (सुमारे ३० ग्रॅम)पेक्षा जास्त मखाना खाणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण- मखानाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोषण असंतुलन आणि पचनाला त्रास होऊ शकतो,” असे मलिक यांनी सांगितले.
आहारात मखानाचा समावेश करण्यासाठी सोप्या टिप्स
मलिक यांनी शेअर केले की,
१) भूक कमी करण्यासाठी मखाना तुपात भाजून खा.
२) खिरीसारख्या पारंपरिक गोड पदार्थांमध्ये मखानाचा समावेश करा.
३) सॅलडमध्ये भाजलेला मखाना घालून खाऊ शकता.
४) मखाना ट्रेल मिक्स आणि प्रोटीन बारमध्ये मिसळून खा.
५) स्मूदीमध्येही मखाना मिसळून खाऊ शकता.