देशाच्या अनेक भागांतील नागरिक आधीच वाढलेल्या प्रदूषणाच्या पातळीने त्रस्त आहेत. त्यात दिवाळी अवघ्या काही तासांवर आल्याने प्रदूषणाची स्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांसह वयोवृद्धांना आहे. विशेषत: वयोवृद्ध लोकांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे. वृद्धांनी त्यांच्या आरोग्याचे रक्षण करता यावे यासाठी जीवनशैलीत बदल केले पाहिजेत. असे करताना त्यांनी प्रदूषणामुळे उदभवणाऱ्या लक्षणांवरही नजर ठेवली पाहिजे.
या विषयावर दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे अंतर्गत औषध सल्लागार डॉ. तुषार तायल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खराब हवामानात वयोवृद्धांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले आहे.
वायुप्रदूषणामुळे वृद्धांना कोणत्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते? त्याचा त्यांच्या शरीरावर किती गंभीर परिणाम होतो?
वाढत्या प्रदूषणामुळे अनेक रुग्णांना घसा आणि नाकाची जळजळ, डोळ्यांच्या समस्या, त्वचेची जळजळ, कोरडा खोकला आणि विषाणूजन्य संसर्ग यांसारख्या श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. वयोवृद्धांना बहुधा दमा किंवा सीओपीडीसारख्या अंतर्निहित परिस्थिती असतात आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. मग हवामानातील बदलांचा जास्त परिणाम झाल्यामुळे त्यांना खोकला, धाप लागणे, कफ यांसारख्या समस्यांचा त्रास होतो.
प्रदूषणाच्या काळात वृद्धांनी कोणती खबरदारी घ्यावी?
कोविड कालावधीत ज्या प्रकारे आपण मास्क घालणे आणि स्वच्छता राखणे यांसारखी काळजी घेत होतो त्याच प्रकारची काळजी आताही घेतली पाहिजे. त्यामुळे श्वसनाच्या समस्या टाळता येतात. वयोवृद्ध व्यक्तींनी घराबाहेर पडताना मास्क घालावा आणि पुढील आठ ते १० दिवस बाहेर जाणे शक्यतो टाळावे. त्याशिवाय वाफ घेणे आणि घरगुती उपाय जसे की, अँटिऑक्सिडंट्सयुक्त काढा प्यावा; ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकेल.
वृद्धांनी घरात कोणते व्यायामप्रकार केले पाहिजेत?
जागेवर धावणे, स्ट्रेचिंग, प्राणायाम यांसारखे घरगुती व्यायाम फुप्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्राणायाम फुप्फुसातील हवा स्वच्छ करण्यास मदत करतो आणि फुप्फुसाची क्षमता वाढवतो. हे सर्व व्यायामप्रकार त्यांनी घरीच केले पाहिजेत.
वृद्धांनी घराबाहेर पडताना कोणती खबरदारी घ्यावी?
वृद्धांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे महत्त्वाचे आहे. त्यात जर तुम्ही फ्ल्यूची लस घेतली असेल, तर दुसऱ्यांदा व्हायरल इन्फेक्शन होणे टाळता येते. गंभीर श्वसन समस्या टाळण्यासाठी फ्लूच्या हंगामात विशेषतः मास्क वापरणे महत्त्वाचे आहे.
वृद्धांनी प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
वयोवृद्धांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालेभाज्या, फळे, सुका मेवा यांसह जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असलेले पदार्थ खाण्यावर भर दिला पाहिजे. प्रदुषणास कारणीभूत ठरणारे घटक वाढल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो आणि अकाली वृद्धत्वाची समस्या वाढते.
सुक्या मेव्यात व्हिटॅमिन सी व ईसारख्या अँटिऑक्सिडंट्सचा समावेश असल्याने तणावाचा सामना करण्यास मदत होते आणि तुमच्या शरीराचे संरक्षण होते. तसेच, त्यांच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्या समाविष्ट करणेही एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.