Pomegranate Health Benefits for All Agesऔषधाविना उपचार या मालिकेत सध्या आपण विविध फळे आणि त्यांचा उपचारासाठी वापर कसा करता येऊ शकेल याची माहिती घेत आहोत. या मालिकेत आज समजून घेणार आहोत डाळिंब आणि ताडगोळ्याचे विशेष
डाळिंब
ढोलका, भावनगरी, गणेश, पांढरे दाण्याचे डाळिंब अशी डाळिंबाची विविध नावे आहेत. डाळिंब लालचुटूक दाण्याचे आकर्षक रंगाचे असूनही आंबा, केळी, द्राक्षे, संत्री, मोसंबी, बोरे यासारखे मोठ्या प्रमाणावर वापरात नाही. त्याला कारण दाणे चोखून खाण्याचा आळस किंवा त्याची वाढलेली किंमत असावी. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे गोड चवीचे डाळिंब पित्त कमी करते. आंबट चवीचे डाळिंब पित्त वाढवत नाही पण कमीही करत नाही. मात्र कफ करून वाताचे अनुलोमन करते. सर्व प्रकारची डाळिंबे ही हृदयास हितकर, स्निग्ध, फाजील कफ वाढू न देणारी व त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणारी असतात. मलप्रवृत्तीस आवर घालून अग्निवर्धक व रुची उत्पन्न करण्यास डाळिंबाच्या रसात किंवा दाण्यांचा उपयोग होतो.
आंबट डाळिंबातही दुर्गुण नसतात
आयुर्वेदात प्रत्येक रसाच्या पदार्थात अपवादात्मक द्रव्ये सांगितली आहेत. डाळिंब आंबट रसाचे वर्गात असले तरी त्या आंबट रसाचे दुर्गुण नाहीत. उष्णता वाढविणे, रक्तपित्ताचे विकार निर्माण करणे, चक्कर, कंडू, पांडूता, धावरे, गळवे, तहान, शोष हे विकार डाळिंब उत्पन्न न करता उलट या विकारात डाळिंब फायदेशीर पथ्याचे आहे. डाळिंबाचे फूल, डाळिंबाची साल, वाळलेले दाणे व मूळ यांचा औषधात उपयोग आहे. डाळिंब हे कधीही तुरट किंवा आंबट वापरू नये. डाळिंबाचा दाणा मऊ व भरपूर रसाचा असावा. रंगाने पांढरा असला तरी चालेल.
अनारदाणा
डाळिंबाच्या वाळलेल्या दाण्यांना अनारदाणा नावाने बाजारात ओळखतात. अनारदाण्याची चटणी चव उत्पन्न करते. सोबत फक्त मिठाची गरज असते. थोडाफार अधिक आहार झाला तर सुकवलेले डाळिंब दाणे सुपारीसारखे खावेत. स्त्रियांच्या अत्यार्तव विकारात तसेच रक्ती आव विकारात अनारदाणा उपयुक्त आहे.
सर्दी- खोकल्यावर उपयुक्त
टेपवर्म किंवा लांबलचक जंत विकारात डाळिंबाच्या मुळाच्या सालीचा उपयोग होतो. डाळिंबाच्या सुकलेल्या फळाचे चूर्ण, श्वेतप्रदर, धुपणी, राजयक्ष्मा, शोष, थुंकीतून रक्त पडणे या तक्रारींवर उपयुक्त आहे. डाळिंबाची साल लहान बालकांच्या बाळगुटीतील एक अत्यावश्यक औषध आहे. लहानग्यांचा कफ, सर्दी, खोकला वारंवार उद्भवू शकणाऱ्या तक्रारींवर डाळिंबसाल फार उपयुक्त आहे. याच सालीचे चूर्ण वृद्धांच्या खोकल्यावर लवंग चूर्णाबरोबर व मधाबरोबर द्याावे. त्यामुळे ढास थांबते. वृद्ध माणसांनी डाळिंबसाल व खडीसाखरेचा खडा चिघळावा. खोकला कमी होतो.
कृश व्यक्तींसाठी डाळिंब
डाळिंबाचा सर्वात उपयुक्त भाग त्याचा ताजा रस हा आहे. डाळिंबाचा रस व मध हे मिश्रण म्हणजे जुनाट संग्रहणी, अतिसार, जुलाब, कॉलरा, पांडुता, क्षय, जुनाट पित्तप्रधान खोकला, थुंकीतून, कफातून रक्त पडणे या विकारात फारच उपयुक्त आहे. कृश व्यक्तींनी मधाऐवजी तुपाबरोबर डाळिंब रस घ्यावा. भोजनानंतर मलप्रवृत्ती होत असेल तर जेवण थोडे कमी करावे. नंतर डाळिंब दाणे खावे व सुंठ पाणी प्यावे. किंवा जेवणानंतर डाळिंब रस, सुंठ चूर्ण मिसळून घ्यावा. अल्पमोली बहुगुणी खोकला चूर्णात डाळिंबाची साल हे प्रमुख घटकद्रव्ये आहे. सोबत मिरी, टाकणखार लाही, बेहडा, ज्येष्ठमध अशी घटकद्रव्ये आहेत. स्वरभंग विकारात तसेच शोष पडणे, अम्लपित्त होणे, नागीण या विकारात गोड डाळिंबाचा रस उत्तम काम करतो. पित्तामुळे गर्भिणीच्या उलट्यांवर डाळिंबाचे नुसते दाणे चघळून खाणे पथ्यकर आहे.
ताडफळ
ताडगोळे किंवा ताडफळ मुंबईत जास्त खाल्ले जाते. उन्हातान्हात हिंडण्याचा ज्यांना त्रास होतो. हॉटेलमधील तिखट पदार्थाने जळजळ, तहान, डोळ्यांची आग, आमाशयाचा दाह, हातापायांची भगभग या विकारात ताडफळे नियमित खावी. जून ताडफळे खाऊ नयेत. आतड्यांतील रूक्षता, रूक्ष त्वचा, वारंवार गळवे होणे, रसक्षय, चिडचिड, शब्द सहन न होणे, थोड्याशाही कामाने थकवा, उष्णतेशी सतत संपर्क याकरिता ताडफळे नियमित खावी. स्थूल व्यक्तींनी निर्धोकपणे खावी. ताडफळ मूत्रल आहे. चरबी वाढू देत नाही. शरीरात रसधातू वाढविण्याचे कार्य करते. मधुमेही मंडळींनी ताडफळे जरूर खावीत.
उपयुक्त ताडगूळ
रूक्ष व शिथिल त्वचेकरिता ताडगूळ फारच उपयोगी आहे. अग्निमांद्य या विकारामुळे शरीर सुकत चालले असता ताडगूळ खावा. शरीर सुधारू लागते. याशिवाय ज्यांना ताजी निरा मिळते, त्यांनी सकाळी एक ग्लास निरा प्यावी. प्रकृती खुटखुटीत होते. सर्दी, खोकला, दमा या विकारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी ताडफळे खाऊ नये. ताडफळांवर गार पाणी तर बिलकूल पिऊ नये.