Poonam Pandey Dies Cervical Cancer Signs & Reasons: अभिनेत्री आणि रिॲलिटी शो स्टार पूनम पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने आज सकाळी तिचे निधन झाल्याचे जाहीर केले. ३२ वर्षांच्या पूनमचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला असे समजतेय. पूनम पांडे हिची मॅनेजर निकिता हिने इंडियन एक्स्प्रेसकडे निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली. निकिताच्या माहितीनुसार, “पूनमचे उत्तर प्रदेशातील तिच्या निवासस्थानी शांततेत निधन झाले.” ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक ठरली कारण काहीच दिवसांपूर्वी काहींनी पूनमला मुंबईत पाहिले होते तर तिच्या सोशल मीडिया स्टोरीजमध्ये ती गोव्यात पार्टी करत असल्याचे सुद्धा दिसून आले होते. पूनमच्या मृत्यूनंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आज आपण डॉ मनीष माचावे, सल्लागार प्रसूती तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ आणि स्त्रीरोग एंडोस्कोपिक सर्जन, रुबी हॉल क्लिनिक, पुणे, यांच्याकडून गर्भशयाच्या मुखाच्या कर्करोगाची कारणे व लक्षणे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. माचवे यांनी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती देत सांगितले की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये शरीरातील पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात. हा आजार लसीकरणाद्वारे टाळता येण्यासारखा आणि लवकर निदान झाल्यास उपचार करण्यायोग्य असूनही, या आजारामुळे प्रभावित रुग्णांची व मृतांची संख्या चिंताजनक आहे. विशेषतः ३० व वरील वयाच्या टप्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग का होतो?

डॉ माचवे सांगतात की, “गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्राथमिक कारण मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) चा सततचा संसर्ग आहे. लैंगिक क्रियांद्वारे प्रसारित होणारा एचपीव्ही हा एक असा विषाणू आहे, जो लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या अर्ध्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात कधीतरी प्रवेश करतो. त्यातील काही टक्के व्यक्तींमध्ये पुढे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग विकसित होऊ शकतो. तर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या जोखमीला कारणीभूत असलेल्या इतर घटकांमध्ये लवकर विवाह, एकाधिक गर्भधारणा आणि लसीकरण आणि तपासणी यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा अभाव यांचा समावेश होतो. “

तर, डॉ थेजस्विनी जे, सल्लागार – प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, ई-सिटी, बंगळुरू यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, कमी वयातील लैंगिक क्रिया, असुरक्षित लैंगिक संबंध आणि तंबाखू/मद्य सेवन यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका आणखी वाढू शकतो.

“गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत प्रमुख आव्हानांपैकी एक म्हणजे महिलांमध्ये जागरूकता नसणे. पुष्कळ स्त्रिया पॅप स्मीअर चाचणीसाठी येत नाहीत. ही चाचणी गर्भधारणा होऊ शकणाऱ्या वयाच्या टप्यात असलेल्या स्त्रियांसाठी आवश्यक असते. दर १ ते ३ वर्षांनी ही चाचणी करण्याची शिफारस केली जाते. एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून, जेव्हा जेव्हा लैंगिकदृष्ट्या सक्रिय रूग्ण आम्हाला भेट देतात तेव्हा आम्ही त्यांना पॅप स्मीअर चाचणीसह स्क्रीनिंग करण्याचा सल्ला देतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जागरूकता वाढवणे महत्त्वपूर्ण आहे.”

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

डॉ माचावे यांनी सांगितल्याप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे खालीलप्रमाणे

  • सतत रक्तस्त्राव, मासिक पाळी दरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर स्पॉटिंग.
  • नेहमीपेक्षा दाट आणि जास्त काळ मासिक रक्तस्त्राव.
  • पातळ, दुर्गंधीयुक्त योनि स्राव
  • संभोग करताना ओटीपोटात वेदना (कर्करोगाच्या प्रगत टप्यात याचे प्रमाण अधिक असते कारण ऊतींचे नुकसान वाढत असते)
  • लघवी करताना वेदना किंवा लघवीत रक्त येणे.
  • स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी होणे.
  • थकवा.
  • पायांना सूज येणे.
  • पाठदुखी किंवा पाय दुखणे.
  • प्रगत अवस्थेत लघवी किंवा आतड्याची हालचाल नियंत्रित करण्यात अडचण.

हे ही वाचा<< पूनम पांडेचं ‘सर्व्हीकल कॅन्सर’मुळे निधन! गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले १० मुद्दे

दरम्यान, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा गंभीर मुद्दा बनत आहे. अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये सुद्धा या मुद्द्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उल्लेख केला असून, केंद्र सरकार यासाठी योजनात्मक पाऊले उचलण्याच्या तयारीत असल्याचे नमूद केले होते. केंद्र सरकारने याच रोगासाठी ९ ते १४ वर्षांच्या मुलींना लस देण्यासंदर्भात सुद्धा घोषणा केली होती.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey dies due to cervical cancer signs in body how to identify cancer begining does hpv spread via sexual relation svs
Show comments