चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार आणि व्यायामसह पुरेशी झोप तितकीच महत्वाची आहे. पुरेशी झोप झाली तर दिवसभर ताजेतवाने वाटते. मेंदूचं आरोग्य सुधारते. मानसिक आणि डोळ्यांशी संबंधित समस्या जाणवत नाहीत. मात्र पाच तासांपेक्षा कमी वेळ तुम्ही झोपत असाल ही गोष्ट तुमच्या ह्रदयासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच अनेक गंभीर आजार होऊ शकतात, असे धक्कादायक निष्कर्ष एका संशोधनातून समोर आले आहेत.
कमी झोपेचा ह्रदयविकाराचा धोका वाढण्याशी आणि अकाली मृत्यूशी संबंधित आहे. बीएमसी मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात यूके बायोबँकमधील ३००,००० हून अधिक मध्यमवयीन प्रौढांच्या आरोग्यसंबंधीत डेटाचे विश्लेषण करण्यात आले. दक्षिण डेन्मार्क युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले, या संशोधनात असे आढळून आले की, निरोगी झोपणाऱ्यांच्या तुलनेत कमी झोपणाऱ्यांमध्ये ह्रदय व रक्तवाहिन्यांसंबंधीत आजारांचा धोका वाढतोय.
विशेषत: कमी झोप घेणाऱ्या आणि श्वासोच्छवासाचे विकार असलेल्या पुरुषांचे आयुष्य सामान्य आरोग्य असलेल्या पुरुषांच्या आयुष्यापेक्षा सात वर्षांनी कमी होत आहे. तर महिलांमध्ये हेच प्रमाण सात वर्षांपेक्षा जास्त आहे, असेही अभ्यासात नमूद आहे.
अपुरी झोप, निद्रानाश , घोरणे, उशीरा झोप लागणे आणि दिवसा झोप न लागणे यासारख्या झोपेसंबंधीत समस्यांमुळे पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयाचे सामान्य आरोग्य सुमारे दोन वर्षांनी कमी होत आहे. यामुळे रोजच्या अपुऱ्या झोपेमुळे वृद्धापकाळात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे सिडनी विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासाचे वरिष्ठ लेखक इमॅन्युएल स्टामाटाकिस यांनी सांगितले.
स्लीप एपनिया हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि इतर जुनाट रोगाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. यामुळे सर्वसाधारणपणे खराब झोप हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण करू शकते, असेही स्टामाटाकिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
संशोधकांनी झोपेचे कमी, मध्यम आणि निरोगी असे तीन श्रेणीत वर्णन केले, याच झोपेच्या श्रेणीनुसार वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या परिणामांची तुलना केली. तसेच यात ह्रदय आणि रक्तवाहन्यांसंबंधीत आरोग्याचीही तुलना केली आहे.
कमी झोप असलेल्या महिलांना निरोगी झोपणाऱ्यांच्या तुलनेत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे आरोग्याशी दोन वर्षे तडजोड करावी लागते. तर पुरुषांना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ अनुभव येतो. इंटरमिजिएट स्लीपरमध्ये स्त्रियांनी जवळजवळ एक वर्षांपर्यंत हृदयविकारमुक्त आयुष्य गमावले आणि पुरुषांनी किंचित जास्त गमावले.
याचा अर्थ असा की, घोरणे आणि झोप न लागणे हे भविष्यातील संभाव्य आरोग्य समस्यांचे धोक्याचे लक्षण असू शकते. या अभ्यासाचे प्रमुख लेखक बो हुआंग यांनी म्हटले की, यूके अभ्यासातील सहभागींचे सरासरी आयुर्मान सुमारे 80 वर्षे होते. स्लीप एपनिया सारख्या वैद्यकीयदृष्ट्या निदान झालेल्या आणि झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाच्या विकारांनी सात वर्षांचे हृदयरोग मुक्त जीवन गमावले.