Hormonal Health : किशोरवयात येण्यापूर्वी मुलींमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. या वयात मुली जो आहार घेतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करणे खूप जास्त गरजेचे आहे.
याविषयी न्युट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर सांगतात, “लहान मुले काय खातात, हे त्यांच्या शारीरिक आणि हार्मोनल आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. विशेषत: किशोरवयात येण्यापूर्वी मुलींनी चांगल्या हार्मोनल आरोग्यासाठी पोषक तत्त्वे असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे”
शालिनी सुधाकर पुढे सांगतात, ” तरुण मुलींनी चांगले हार्मोनल आरोग्य आणि नियमित निरोगी मासिक पाळी येण्यासाठी तीन महत्त्वाचे पदार्थ खाणे गरजेचे आहे.
शेवग्याच्या पानांची पावडर
शरीरातील हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यासाठी आणि हार्मोनल आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लोह महत्त्वाची भूमिका बजावते. किशोरवयात येण्यापूर्वी मुलींनी दररोज एक चमचा शेवग्याच्या पानांची पावडर खावी.
जवस
जवसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी, ई व केचे प्रमाण अधिक असते. हे पोषक घटक सर्व वयोगटांतील व्यक्तींना हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते.
अंजीर
अंजीर हे पोषक तत्त्वे पुरवणारा सर्वांत चांगला पर्याय आहे; पण अनेकदा आपण अंजीरकडे दुर्लक्ष करतो. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात त्याशिवाय अंजीर रक्त शुद्धीकरण आणि शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा वाढवण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
या संदर्भात मुंबईच्या खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगतात, “किशोरवयात येण्यापूर्वी मुलींना तीन प्रकारचा आहार त्यांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो”
१. कॅल्शियमयुक्त पदार्थ
किशोरवयात येण्यापूर्वी मुलींना हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. त्यासाठी दूध, दही व चीजसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्या मुलींना दुग्धजन्य पदार्थ खाण्याची मनाई असेल किंवा निर्बंध असेल त्यांनी कॅल्शियमची मात्रा अधिक असलेल्या हिरव्या पालेभाज्या खाव्यात. त्यात ब्रोकोली हा एक चांगला पर्याय आहे.
हेही वाचा : कागद, फॉईल किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? FSSAI ने दिली धोक्याची सूचना, तज्ज्ञांनी सांगितले पर्याय
२. लोहयुक्त पदार्थ
लोह हे शरीरातील शुद्ध किंवा निरोगी रक्तासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. मासे, मसूर आणि भरपूर प्रमाणात तृणधान्याचे सेवन करावे. त्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते.
३. फायबरयुक्त पदार्थ
फायबरयुक्त पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. डॉ. सुरभी सांगतात, “गव्हाचे ब्रेड, ब्राऊन राइस, क्विनोआ व ओट्स यांसारख्या पदार्थांचा, तसेच फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. त्यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात.”
डॉ सुरभी पुढे सांगतात, “संतुलित आहार आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतो. त्यामुळे किशोरवयात येण्यापूर्वी मुलींना त्यांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. अशा वेळी मुलींच्या चांगल्या आहारासाठी आहारतज्ज्ञ किंवा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”