मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचा एच ५ एन १ हा विषाणू आढळल्याचे प्रयोगशाळा तपासणी वरून निश्चित झाले आणि राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूची चर्चा सुरु झाली. इन्फ्ल्युएंझा विषाणूचे नैसर्गिक घर म्हणजे पाणपक्षी. बदक आणि त्यासारखे पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो. या पाणपक्ष्यामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आतड्याला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ यजमान नंतर या मूळ यजमानाकडून हा विषाणू मध्यस्थ यजमानाकडे म्हणजे कोंबड्या किंवा डुक्कर यांच्याकडे या विषाणूचा प्रवास होतो आणि तेथून मग तो माणसाकडे येतो.
१८७८ मध्ये बर्ड फ्लू हा आजार प्रथमतः शेतावर पाळल्या जाणाऱ्या काही पक्ष्यांमध्ये आढळला. १९५९ ते १९९५ मध्ये पोल्ट्री मधील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळण्याच्या पंधरा घटना जगभरात नोंदवण्यात आल्या तर १९९६ ते २००८ या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या अकरा घटना घडल्या. १९९० नंतर जगभरातील पोल्ट्री मधील पक्ष्यांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले त्यामुळे स्वाभाविकच बर्ड फ्लू उद्रेकाचे प्रमाणही वाढले. १९९६ मध्ये चीनमध्ये प्रथमतः इन्फ्लुएंझा ए एच५ एन १ विषाणू एका पक्ष्याच्या शरीरातून वेगळा करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये माणसांमध्ये ही बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले. आतापर्यंत जगभरात बर्ड फ्लूची लागण झालेल्या माणसांची संख्या सातशेच्या आसपास आहे.
हेही वाचा : Health Special: ‘अजिलिटी ट्रेनिंग’ प्रत्येकासाठी का महत्त्वाचं?
जंगली पक्ष्यांमध्येदेखील बर्ड फ्लू आढळतो तथापि त्यामुळे ते आजारी पडताना दिसत नाहीत मात्र पक्ष्यांमध्ये हा विषाणू वेगाने पसरताना दिसतो आणि कोंबड्या, बदके किंवा इतर पाळीव पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू घडून येतात. संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या लाळेतून किंवा नाकातील स्त्रावातून आणि विष्ठेतून हे विषाणू बाहेर पडतात. या स्त्रावाचा किंवा विष्ठेचा संपर्क आल्याने इतर पक्ष्यांमध्येही हा आजार पसरत जातो.
भारतातील अनेक राज्यात बर्ड फ्लू आजाराची लागण विविध पक्ष्यांमध्ये होताना आपण पाहतो. अनेक प्रदेशात बदके, कोंबड्या, कावळे स्थलांतरित पक्षी यामध्ये प्रामुख्याने या आजाराची लागण अधूनमधून दिसून येते. नुकताच प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर येथील कोंबडयांमध्ये एच५एन१ या विषाणूची लागण झालेली आहे.
हेही वाचा : मिठाचे ‘हे’ पर्याय उच्च रक्तदाब ४० टक्क्यांनी करतील कमी? जाणून घ्या कोणी सेवन करावे, कोणी नाही?
सध्या हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये आहे. भारतात आजवर एकही बर्ड फ्लूचा रुग्ण माणसांमध्ये आढळलेला नाही. हा विषाणू माणसांमध्ये वेगाने पसरताना दिसत नाही. त्यामुळे बर्ड फ्लूच्या अनुषंगाने आपण घाबरून जाण्याची गरज नसली तरी याबाबत आपण काय काळजी घ्यावी हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी पुढील खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे.
पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा.
पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.
कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.
कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.
पूर्ण शिजवलेले मांसच खा.
आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळवणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Health Special: टीबीच्या रुग्णांसाठी AI कसं उपयोगी ठरु शकतं?
हे करू नका.
१. कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.
२. अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
३. आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका.
४. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.
आपल्या भागात कुठेही एखादा पक्षी अथवा कोंबड्या मरून पडताना दिसल्या तर त्यांची विल्हेवाट कशी लावावी, यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी स्थलांतरित पक्षी येतात. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील उजनी जलाशय किंवा विदर्भातील नवे बांध आणि पेंच जलाशय ही याची काही उदाहरणे. या पक्ष्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमा होतात. बर्ड फ्ल्यूचा धोका लक्षात घेता या पद्धतीचे पर्यटन देखील आपण टाळणे योग्य राहील.
हेही वाचा : Health Special: कुंकू किंवा बिंदीची ॲलर्जी आल्यास काय कराल?
एकूण काय प्राणी, पक्षी, पर्यावरण आणि माणूस या सगळ्यांचे आरोग्य हे एकमेकाशी बांधलेले आहे. यालाच आपण ‘वन हेल्थ’ असे म्हणतो. हे लक्षात घेऊन आपण आपल्या पर्यावरणाची आणि आपल्या घरातील पाळीव प्राणी पक्ष्यांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती’, अशी भावगीते आपण किती आवडीने गातो परंतु पाखरांसोबत नेहमीच केवळ गोड आठवणी नसतात, कधी कधी बर्ड फ्लू सारखा विषाणू देखील असतो हे लक्षात ठेवणे बरे. बर्ड फ्लू माणसाला फारसा होत नसला तरी काळजी घेणे कधीही चांगले, तेव्हा भीती नको पण काळजी मात्र नक्कीच घ्यायला हवी.