Can Pregnant Women Drink Orange Juice Before Ultrasound: विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत गर्भवती महिलांना अनेक वेळा अल्ट्रासाउंड तपासणीपूर्वी पाणी पिण्यास सांगितले जाते; जेणेकरून बाळाची हालचाल होण्यास मदत होईल. पण काही लोक म्हणतात की, अल्ट्रासाउंडपूर्वी संत्र्याचा रस प्यायल्याने अधिक फायदा होतो? तुम्हालाही जर हाच प्रश्न पडला असेल, तर याबद्दल अधिक जाणून घेऊ.

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात सांगितले आहे की, गर्भवती महिलांनी अल्ट्रासाउंडच्या ३० मिनिटे आधी थोडासा संत्र्याचा रस प्यावा.

“थोडासा संत्र्याचा रस बाळाला जागं करतो, ज्यामुळे ते जास्त हालचाल करतं आणि अल्ट्रासाउंड चाचणीत ते स्पष्ट दिसतं,” अशी माहिती pregnancyguide.co या पेजवर दिली आहे.

Indianexpress.com ने ही माहिती खरी आहे का ते तपासायचं ठरवलं…

अल्ट्रासाऊंड करण्यापूर्वी संत्र्याचा रस प्यावा का? (Should pregnant women drink orange juice before an ultrasound?)

पाणी प्यायल्यानं गर्भवती महिलांचं मूत्राशय भरतं आणि त्यामुळे गर्भाशय वर सरकते आणि अल्ट्रासाउंडमध्ये बाळाचा फोटो स्पष्टपणे दिसतो, असं डॉक्टर मानसी शर्मा (स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खराडी) यांनी सांगितलं.

गर्भधारणेत अल्ट्रासाउंडपूर्वी संत्र्याचा रस प्यायचा की नाही हे स्कॅनच्या टप्प्यावर आणि कारणावर अवलंबून असतं. “पहिल्या त्रैमासिकात (१२–१४ आठवड्यांपर्यंत) याची गरज नसते; पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या त्रैमासिकात बाळ जास्त हालचाल करीत नसेल, तर थोडासा संत्र्याचा रस उपयोगी ठरतो. त्यातली साखर बाळाला थोडी ऊर्जा देते आणि त्याच्या हालचाली सुरू होतात. जेव्हा बाळ शांत असतं किंवा नीट दिसत नाही तेव्हा हे पेय अल्ट्रासाउंडदरम्यान उपयोगी पडतं,” असं डॉक्टर तृप्ती रहेजा (मुख्य सल्लागार व स्त्रीरोगतज्ज्ञ, सी. के. बिर्ला हॉस्पिटल®, दिल्ली) यांनी सांगितलं.

संत्र्याचा रस सामान्यतः हानिकारक नसतो; पण अल्ट्रासाउंडपूर्वी तो पिणं नेहमीच योग्य ठरेल असं नाही, असं डॉक्टर शर्मा म्हणाल्या. “तो आम्लयुक्त (अ‍ॅसिडिक) असतो. त्यामुळे कधी कधी त्रास होऊ शकतो; विशेषतः जर अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ होत असेल तर,” असंही त्यांनी सांगितलं.

संत्र्याच्या रसात, विशेषतः दुकानातून आणलेल्या रसात जास्त साखर असते. त्यामुळे अल्ट्रासाउंडदरम्यान बाळ अचानक हालचाल करू शकतं.

“कधी कधी यामुळे स्पष्ट फोटो मिळणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे गर्भवती महिलांनी संत्र्याच्या रसाऐवजी पाणी पिणं जास्त योग्य ठरतं. स्कॅनपूर्वी पुरेसं पाणी प्यायल्यानं पोटावर ताण येत नाही आणि तंत्रज्ञांना बाळ नीट पाहता येतं,” असं डॉक्टर शर्मा म्हणाल्या.

अल्ट्रासाऊंड करण्यापूर्वी काय प्यावे? (What to Drink Before Ultrasound)

तथापि, संत्र्याचा रस हा एकमेव पर्याय नाही – ग्लुकोजचं पाणी किंवा चॉकलेटच्या तुकड्यासारखा कोणताही गोड पदार्थ किंवा पेय समान परिणाम देऊ शकतो, असं डॉक्टर रहेजा यांनी सांगितलं.

“सामान्यतः या तपासणीसाठी संत्र्याचा रस जास्तकरून वापरला जातो. कारण- तो पचायला सोपा असतो आणि सहज मिळतो. पण, तो आवश्यक नाही आणि त्याचा जास्त प्रमाणात वापर करणं टाळावं; विशेषतः ज्यांना गर्भावस्थेत मधुमेह किंवा साखरेची संवेदनशीलता असेल त्यांनी,” असं डॉक्टर रहेजा यांनी सांगितलं.