बॉलीवूड स्टार प्रियांका चोप्राने नुकतेच तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट ‘द ब्लफ’चे चित्रीकरण पूर्ण केले. अभिनेत्रीने तिच्या कामाच्या पडद्यामागील अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. यावेळी प्रियांकाने तिला झालेल्या दुखापती आणि बरेच तास काम करण्यामुळे येणाऱ्या तणावाबद्दलची माहिती दिली.

‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत चोप्राने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सामना केलेल्या आव्हानांबाबत आणि भूमिका पार पाडण्यासाठी शरीर किती त्रास सहन करू शकते याबाबतची माहिती दिली. म्हणजेच एखादी भूमिका पार पाडण्यासाठी कलाकारांना बरेच तास शूटिंग करावे लागते, अवघड अॅक्शन सीन्स करावे लागतात, अवघड डान्स करावा लागतो किंवा जड पोशाख परिधान करावे लागतात. अभिनेत्री म्हणून प्रियांकाने या सर्व गोष्टींचा सामना कसा केला हे सांगताना ती म्हणाली, “या सर्व प्रक्रियांचा मला नेहमीच आनंद वाटतो. मला शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे लागते. देहबोली बदलून, भावना व्यक्त करण्यासाठी शरीराचा वापर करावा लागतो. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तसतसे तुम्हाला या गोष्टी करताना फरक नक्कीच जाणवतो आणि विशीमध्ये जितक्या सहज तुमचे शरीर बरे होते, त्याच्या तुलनेत वय वाढल्यानंतर तितक्याच वेगाने शरीर लवकर बरे होत नाही. मग शरीर बरे होण्यासाठी वेळ लागतो.”

कामाच्या तासांबद्दल सांगताना प्रियांका म्हणाली, “माझे कामाचे दिवस खरोखर खूप धावपाळीचे होते; परंतु त्याचबरोबर हाच दिनक्रम नियमित होता. मी मे महिन्यापासून ‘द ब्लफ’साठी चित्रीकरणाकरिता आठवड्यातून सहा दिवस काम करीत होते. जेव्हा आम्ही रात्री शूटिंग करत नसू तेव्हा मी बहुतेकदा पहाटे साडेचार ते पाचदरम्यान उठत असे. मी १२ तास काम केले, घरी आल्यावर रात्रीचे जेवण करून काही वेळ माझ्या मुलीबरोबर खेळले. माझ्या आईबरोबर किंवा इतर कामांत व्यग्र असायचे आणि शेवटी झोपी जायचे. मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा हाच दिनक्रम सुरू होता.”

हेही वाचा – फॅटी लिव्हर आजाराकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

१२ तास कामाचे दिवस शरीरावर कसे परिणाम करतात

यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सरस प्रसाद यांच्या मते, अपुरी झोप हा सर्वांत तत्काळ परिणामांपैकी एक आहे. जास्त काम करण्यामुळे झोपेचा वेळ कमी होतो. त्यामुळे संज्ञानात्मक कार्य म्हणजेच मेंदूची विचार करण्याची आणि आकलन क्षमता बिघडते. तसेच मेंदूची प्रतिसाद देण्याची क्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्तीही कमी होते. जेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही, तेव्हा खूप जास्त थकवा जाणवतो आणि स्नायू कमकुवत होतात; ज्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

बराच कालावधी जास्त वेळ काम करण्यामुले ताण येत असेल, तर व्यक्तीच्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते. त्यामुळे चिंता, नैराश्य आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका वाढतो. कालांतराने मानसिक थकवा येऊन, निर्णयक्षमता, लक्ष केंद्रित करणे यांवर विपरीत परिणाम होतो आणि भावनिक स्थिरताही कमी होते. वैयक्तिक वेळेचा अभावदेखील काम आणि आयुष्य यांच्यातील समतोत बिघडवण्यास कारणीभूत ठरतो; ज्यामुळे नातेसंबंध ताणले जातात आणि एकूण जीवनातील समाधान कमी होते.

हेही वाचा – केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात

जास्त काम करण्याचे दीर्घकालीन परिणाम

दिवसातील १२ तास काम करणे अनिश्चित काळासाठी सुरू राहिल्यास तुमच्या शरीरात दीर्घकालीन आरोग्य समस्या वाढण्याचा धोका आहे. डॉ. राकेश गुप्ता (इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे अंतर्गत औषध तज्ज्ञ) यांच्या म्हणण्यानुसार- दाहकता वाढण्याचा धोका असतो; जो भावनिक, मानसिक व शारीरिक थकवा यांद्वारे दिसून येतो. जास्त काम केल्याने हृदयविकार, मधुमेह व नैराश्य यांसारखे दीर्घकाळ टिकून राहणारे आजारही होऊ शकतात. त्याशिवाय झोपेच्या वेळापत्रकामध्ये अडथळा निर्माण झाल्याने झोपेचे विकार आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल (पोटाच्या) समस्या होऊ शकतात.


हेही वाचा – इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

अभ्यासातून असे समोर आले आहे, “बराच काळापर्यंत जास्त तास काम केल्याने कामामध्ये चुका किंवा कामाच्या ठिकाणी अपघात होऊ शकतात आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जास्त कामाच्या तासांचा संबंध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग आणि कामाच्या ठिकाणी अपघात होण्याच्या धोक्याशी असल्याचे सांगितले आहे.