पावसाळ्यामधील अनारोग्याला कारण होणारे अग्नीमांद्य हे केवळ पचन-संस्थानाच्या नव्हे तर वास्तवात सर्व शरीरगत आजारांनाही कारणीभूत होऊ शकते.अग्नी (भूक,पचनशक्ती व चयापचय) मंद असतानाही पचायला जड असा पौष्टीक आहार सेवन करणे, पोटाला तडस लागेपर्यंत जेवण, आहाराच्या तोडीचा व्यायाम शरीराला न मिळणे,घाम निघेल असे परिश्रम न करणे,जड अन्न सेवन करून लगेच झोपणे, आहारसेवन करताना अन्नाचा विचार न करता अन्य गोष्टींचा विचार करणे,अन्नसेवनानंतर मानसिक ताण होईल असे व्यवहार करणे, दिवसा झोपणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागलेली नसताना अन्नसेवन करणे आणि आधी सेवन केलेले अन्न पचलेले नसतानाही पुन्हा अन्नसेवन करणे या कारणांमुळे अन्नाचे अर्धवट पचन होते.
अर्धवट पचलेल्या या आहारापासुन आहार-रस तयार तर होतो,मात्र तो संपूर्णपणे न पचलेला (अपक्व) असतो,ज्याला आयुर्वेदाने ‘आम’ असे नाव दिले आहे. (अष्टाङ्गहृदय १.१३.२५) आधुनिक जीवनशैलीजन्य कॅन्सरपासुन ह्र्दयरोगांपर्यंत विविध आजारांचे कारण असलेला असा हा आम तयार होण्याची सर्वाधिक शक्यता पावसाळ्यात असते.कारण वर सांगितलेली बरीचशी कारणे पावसाळ्यामध्ये बाहुल्याने आपल्याला लागू होतात.
आणखी वाचा: Health Special: ढगाळ वातावरणात खाणं का टाळावं?
आम म्हणजे नेमके काय?
संपूर्ण महाराष्ट्रामधील निदान तीन-चार करोड जनता तरी श्रावणामध्ये वेगवेगळ्या व्रतवैकल्याच्या निमित्ताने उपवास करीत असते.असे असूनही उपवास करण्यामागे धार्मिक कारणांशिवाय आरोग्य कारणेही आहेत,याची अनेकांना कल्पना नसते.शरीरामध्ये तयार होणार्या आमाचे पचन करणे , हे लंघन म्हणजे उपवासामागील मुख्य उद्दिष्ट आहे.सर्वप्रथम आम म्हणजे काय ते समजून घेऊ.सेवन केलेल्या अन्नावर पचन-संस्थानामध्ये पाचक रसांच्या विविध प्रक्रिया होऊन त्यापासुन आहार-रस तयार होतो.या अन्न-रसाचे आतड्यामार्फ़त शोषण होऊन तो सर्व शरीर-धातुंना पोषण देतो.काही कारणांमुळे जर अन्नावर पचनाच्या प्रक्रिया व्यवस्थित झाल्या नाहीत तर अन्नाचे पचन अर्धवट होऊन कच्चा आहार-रस तयार होतो, ,ज्याला आयुर्वेदाने ‘आम’ म्हटले आहे,कच्चा (न पचलेला) या अर्थाने.
आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात एसी आरोग्याला धोकादायक?
भांड्यामध्ये डाळ-तांदूळ आणि पाणी ठेवून ते मिश्रण उकळवून खिचडी तयार करताना एक अवस्था येते,जेव्हा डाळ व तांदूळ शिजलेले तर असतात,त्यांचा टणकपणा निघून गेलेला असतो,मात्र ते व्यवस्थित पचून सेवनासाठी योग्य बनलेले नसतात,अर्थात कच्चे असतात.अशाच प्रकारे आपण सेवन केलेल्या आहारावर शरीरातील विविध पाचक स्त्रावांच्या प्रक्रिया तर होतात,अन्नकणांचे विघटनही होते,मात्र त्या सर्व प्रक्रियांमध्ये काहीतरी कमी राहिल्याने अन्नकणांचे विघटन व्यवस्थित न होऊन ते किंचित स्थूल आकाराचे तयार होतात,अपेक्षेप्रमाणे सूक्ष्म बनत नाहीत.अशा अन्नकणांनीयुक्त आहाररस हा कच्चा असतो.
संपूर्ण पचन न झालेल्या या आहाररसाला कच्चा या अर्थाने “आम” असे म्हणतात.कच्चा असला तरी ह्या आमरसाचे आतड्यामार्फ़त शोषण होते व तो शरीर-धातुंपर्यंत पोहोचतोही.मात्र या आमरसामध्ये शरीर-धातुंचे (शरीरकोषांचे)पर्याप्त पोषण करण्याची क्षमता नसते. (धात्वग्निदौर्बल्यादधातुस्थितोऽपक्वोऽन्नरसः धात्वग्निभिरपाकादामः׀ डल्हण – सुश्रुतसंहिता १.१५.३२) त्यामुळे धातुंना पोषण मिळते,तेही अर्धवट स्वरुपाचे.अशा आमरसावर पोसले जाणारे शरीरधातु (शरीरघटक) हे सकस-निरोगी बनत नाहीत,किंबहुना दुर्बल -कमजोर बनतात.
अशा दुर्बल शरीराच्या अवयवांना अतिरिक्त कामाचा ताण पडला वा इजा,जंतुसंसर्ग,वगैरे प्रकारे काही त्रास झाला तर त्यांना तो सहन होत येत नाही आणि ते विकृतींनी ग्रस्त होतात. सकस आहार घेणार्या व आहारविधींचे नियम अनुसरणार्या व्यक्तीचे शरीर व शरीरधातु सुद्धा सकस-सक्षम असतात. मात्र आमरसावर पोसलेल्या शरीराचे अवयव निकस असल्याने लहान-मोठ्या आजारांना बळी पडण्याची दाट शक्यता असते. असे शरीर सहसा या नाही तर त्या रोगाला बळी पडते.
या आमावरचा उपचार,शरीरामध्ये आम तयार होऊ न देण्याचा आणी झालाच असेल व रोगांना कारणीभूत झालेला असेल तर त्यावरचा उपाय म्हणजे लंघन अर्थात अन्नसेवनाचा त्याग,ज्याला पुर्वजांनी उपवास म्हणून आपल्या समोर आणले.