Can Spicy Food Cause Acne: तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्याल? पिंपल, पुरळ, असे त्रास होऊ नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी याविषयी माहिती देणारे असंख्य व्हिडीओ, पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ही माहिती अनेकदा स्वयंघोषित स्किनकेअर तज्ज्ञांकडून शेअर केली जाते त्यामुळे यात तथ्य किती असेल याची ग्वाही देणं कठीण ठरतं. तर काही वेळा माहिती खरी असली तरी प्रत्येकाच्या त्वचेप्रकाराला ते सगळे निकष लागू होतीलच असे नाही, त्यामुळे कोणत्याही स्किनकेअर घोटाळ्याला बळी पडण्यापेक्षा स्वतःच्या त्वचेची चाचणी करणे अत्यावश्यक असते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. आज आपण अशाच एका ऑनलाईन चर्चेतील दाव्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. हा दावा म्हणजे तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पुरळ, मुरूम किंवा पिंपल वाढू शकतात. डॉ शाझिया झैदी, कन्सल्टंट-डर्मेटोलॉजी, मेट्रो हॉस्पिटल, नोएडा, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला याविषयी दिलेले सविस्तर उत्तर पाहूया..
असे मानले जाते की मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात जळजळ होऊ शकते, त्वचेला उष्णता सहन न झाल्याने मुरुमांच्या रूपात उष्णता बाहेर पडते. नक्कीच काही खाद्यपदार्थ त्वचेच्या आरोग्यावर प्रभाव टाकू शकतात पण मुरुमांचे प्रमाण वाढण्यासाठी केवळ खाद्यपदार्थांनाच दोष देणे हे इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे केलेले दुर्लक्ष ठरेल.
पिंपल्ससाठी कोणते हार्मोन्स ठरतात कारण?
पुरळ, मुरूम ही सर्व वयोगटातील लोकांना भेडसावणारी समस्या आहे. यामागील प्रमुख कारण असते हार्मोन्सचे असंतुलन. एंड्रोजेनसारखे हार्मोन्स त्वचेतील सेबमचे उत्पादन वाढवतात. त्वचेची छिद्रे बंद करून बॅक्टरीयाच्या वाढीस कारणीभूत ठरतात व त्यातून पुढे मुरुमांचा त्रास वाढत जातो. विशेषतः पौगंडावस्था किंवा तरुणपणी हार्मोन्समधील चढउतार अधिक असतात यावेळी असे त्रास जास्त प्रमाणात जाणवतात.
मसालेदार पदार्थ आणि पुरळ यांच्यातील संबंध समजून घेऊया, काही व्यक्तींना मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच काही वेळ जळजळ जाणवू शकते. परंतु केवळ या पदार्थांमधील मसाला मुरुमांना वाढवत नाही तर त्याऐवजी, इतर घटक जसे की वैयक्तिक संवेदनशीलता, आधीच अस्तित्वात असलेल्या त्वचेची स्थिती किंवा एकूण आहार या प्रतिक्रियांमध्ये योगदान देऊ शकतात.
तिखट पदार्थांची त्वचेला मदत होते का?
आजवर झालेली संशोधने असे सूचित करतात की काही मसाल्यांमध्ये, काही संयुगे असतात ज्यात दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असू शकतात. विरोधाभासाने, हे गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तथापि, त्वचेच्या आरोग्यावर मसालेदार पदार्थांचा प्रभाव प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगवेगळा असतो जी गोष्ट एका व्यक्तीसाठी कार्य करते ती सर्वत्र लागू होऊ शकत नाही.
उदाहरणार्थ, मिरची खाल्ल्याने तुम्हाला घाम येऊ शकतो. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल निर्माण करण्यास सुरुवात होऊ शकते. आणि तेलाच्या जास्त उत्पादनामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुमांना चालना मिळते. काही मसालेदार पदार्थांमध्ये लाइकोपीन असू शकतात जे तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात आणि तुमच्या शरीरातील पीएच पातळी कमी करू शकतात. तर कधीकधी दुग्धजन्य पदार्थांमुळे इन्सुलिनमध्ये वाढ होते, परिणामी जळजळ, लालसरपणा, सूज आणि त्वचेची छिद्रे बंद होणे हे त्रास वाढू शकतात.
नितळ त्वचेसाठी नेमकं आवश्यक काय?
केवळ मसालेदार पदार्थांवर लक्ष केंद्रित केल्याने त्वचेच्या स्थितीवर परिणाम करणाऱ्या व्यापक आहारातील घटकांकडे दुर्लक्ष होते. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये अशा संतुलित आहारामुळे त्वचेच्या संपूर्ण आरोग्याला आवश्यक पोषक घटक मिळतात. दुसरीकडे, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा जास्त वापर, साखरेचे प्रमाण आणि अस्वास्थ्यकर चरबी, जळजळ वाढवू शकते आणि मुरुमांच्या विकासास हातभार लावू शकते.
हे ही वाचा<< तुमचं वजन खरंच जास्त आहे की फक्त काट्यावरच? कंबरेची मुख्य भूमिका ओळखा, घाबरण्यापेक्षा वापरा ‘हा’ निकष
तुम्हाला जर नितळ त्वचा हवी असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घेणे आणि हार्मोनल असंतुलन दूर करणे महत्वाचे आहे. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या त्वचेवर मुरुमांची वाढ होण्यासाठी विशिष्ट ट्रिगर ओळखू शकता व त्यानुसार स्किनकेअर रुटीन तयात करू शकता. कोणत्याही खाद्यपदार्थाला दोष देण्याऐवजी आपण संतुलित आहार, योग्य हायड्रेशन आणि स्वच्छता याच्या एकत्रित प्रभावाने नितळ त्वचा मिळवता येऊ शकते.