ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (OSA) म्हणजे असा आजार; ज्यामध्ये झोपेत रुग्णाचा श्वासोच्छवास अचानक बंद होतो, अचानक सुरळीत होतो किंवा झोपेत अस्वस्थ वाटते. हा झोपेशी संबंधित आजार आहे; ज्यामध्ये बहुतेक रुग्णांना याची माहिती असते. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो. ज्याप्रमाणे घोरणाऱ्या व्यक्तीला आपण घोरतोय हे लक्षात येत नाही, त्याचप्रमाणे स्लीप अ‍ॅप्नियाच्या रुग्णालाही झोपेत श्वास थांबल्याचे लक्षात येत नाही. झोपेच्या वेळी श्वासोच्छवास थांबण्याची समस्या काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकते. अशा प्रकारे स्लीप अॅप्नियाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी CPAP मशीन म्हणजे पॉझिटिव्ह एअर प्रेशर मशीन फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. याच विषयावर फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्युटचे कार्डिओथोरॅसिक अ‍ॅण्ड व्हॅस्क्युलर सर्जरी (CTVS) संचालक व प्रमुख डॉ. उदगथ धीर यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि श्वसनासंबंधित स्लीप अॅप्निया असलेल्या लोकांनी दररोज चार किंवा त्याहून अधिक तास सतत पॉझिटिव्ह एअर प्रेशर (CPAP) मशीन वापरल्यास हृदय किंवा सेरेब्रोव्हस्क्युलर इव्हेंटचा मोठा धोका कमी होतो.

CPAP मशीन कशी काम करते?

CPAP मशीनचा कॉम्प्रेसर दबावयुक्त हवेचा सतत प्रवाह तयार करतो. त्यानंतर एअर फिल्टरद्वारे शुद्ध हवा नळीद्वारे रुग्णाच्या नाक किंवा तोंडाजवळील मास्कपर्यंत पोहोचवली जाते. या मशीनमुळे झोपेत कोणताही व्यत्यय न येता, तुमच्या फुप्फुसांना भरपूर शुद्ध ऑक्सिजन मिळतो.

जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, श्वसनात अडथळा आणणाऱ्या स्लीप अ‍ॅप्निया आजारामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला धोका निर्माण होतो. या स्थितीमुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्डिओथोरॅसिक अ‍ॅण्ड व्हॅस्क्युलर सर्जरी (CTVS) संचालक व प्रमुख डॉ. उदगथ धीर यांनी सांगितले की, माझे जवळपास १० ते १५ टक्के स्लीप अॅप्नियाग्रस्त रुग्ण आहेत, ते सर्व झोपेच्या वेळी योग्य ऑक्सिजनसह सुरक्षित असले पाहिजेत.

OSA म्हणजे काय?

स्लीप अ‍ॅप्निया असलेल्या व्यक्तींना लठ्ठपणामुळे किंवा मानेच्या भागात काही क्लॅमिंगमुळे शरीरात ऑक्सिजनची योग्य पातळी राखण्यात अडचण येते. परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. पण जेव्हा मेंदूला हा कमी झालेला ऑक्सिजन प्रवाह ओळखतो, तेव्हा तो हृदयाला रिफ्लेक्स सिग्नल पाठवतो; ज्यामुळे रक्तप्रवाह, रक्तदाब व हृदयाची गती वाढते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांचा धोका वाढतो.

झोपताना CPAP मशीनचा वापर करून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम कमी करू शकतो?

एकदा स्लीप अ‍ॅप्नियाचे निदान झाले की, झोपेच्या अभ्यासादरम्यान आपण ऑक्सिजन संपृक्तता पातळी कमी झाल्याचे निरीक्षण करू शकतो. जेव्हा ऑक्सिजनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते, तेव्हा CPAP मशीन वापरू शकतो. ही मशीन संरक्षण म्हणून काम करते. त्यामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात आणि ऑक्सिजनच्या प्रवाहातील सातत्य सुनिश्चित होते. परिणामी रुग्ण रात्री न उठता, खोकल्याशिवाय आरामदायी झोप घेऊ शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित लक्षणे कमी होतात.

लठ्ठ आणि गळ्याभोवती अतिरिक्त चरबी असलेल्या रुग्णांसाठी CPAP मशीन हा एक चांगला उपाय आहे. कारण- अशा रुग्णांना अपुऱ्या झोपेमुळे सतत उच्च रक्तदाब होऊ शकतो. रक्तदाब नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात रुग्ण सतत वेगवेगळी औषधे घेतो. अगदी दिवसातून चार वेळा अशा औषधांचे सेवन करतो. शिवाय, सहा ते आठ तासांची झोप घेत असतानाही हे रुग्ण वारंवार सकाळी तंद्री आणि सुस्ती जाणवत असल्याची तक्रार करतात; पण त्यावर उपाय म्हणून CPAP मशीन खूप फायदेशीर मानली जाते.

हृदयासाठी झोप किती महत्त्वाची आहे?

जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा शरीराच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. शरीराची पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला सहा ते आठ तासांची शांत झोप गरजेची असते. चांगली झोप फक्त हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीसाठीच नाही तर फुप्फुस आणि इतर महत्त्वाच्या अवयवांसाठीही फायदेशीर आहे. त्यात ऑक्सिजन एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कारण- तो शरीरातील प्रत्येक पेशीसाठी आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसेल, तर कार्बन डायॉक्साइडची पातळी वाढू शकते; ज्यामुळे प्रत्येक अवयवावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protect heart sleeping device can we protect our heart while sleeping with positive air pressure machine device sjr
Show comments