Protein Foods Benefits : निरोगी राहण्यासाठी शरीरास योग्य त्या प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता भासते. जास्त व्यायाम आणि मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. त्यामुळे स्नायू, हाडे व केसांना अधिक मजबुती मिळते. इतकेच नाही, तर त्यामुळे वजन कमी करण्यास आणि त्वचा संतुलित राहण्यास मदत मिळते. एंझाइम आणि हार्मोन्ससाठी प्रोटीनची गरज असते.
याबाबत चेन्नईतील प्राग्मॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य आहारतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. आहारतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी सांगितले की, निरोगी आरोग्यासाठी आपल्याला प्राथिनांची फार आवश्यकता असते. कारण- प्रथिनांशिवाय शरीरात सर्व आवश्यक अमिनो आम्लांची निर्मिती होऊ शकत नाही.
तुमच्या शरीरास किती प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता आहे, हे वजन, वय, क्रियाकलाप क्षमतेची पातळी आणि आरोग्यासाठी असलेली गरज यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. लहान मुले, प्रौढ व वयस्कर व्यक्ती यांना वय व शारीरिक क्षमता यांनुसार प्रथिनांची वेगवेगळी गरज भासू शकते. सामान्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक व्यक्तीला तिच्या १ किलोग्रॅम शरीराच्या वजनामागे ०.८ ते १.२ ग्रॅम प्रथिनांची गरज असते, असे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल म्हणाल्या.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुम्ही तुमच्या आहारातून प्रथिने वगळली, तर काय होईल?
यावर आहारतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाले की, प्रोटीन नसलेला आहार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्याची शिफारस केली जात नाही. कारण- प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी अनेक कारणांसाठी महत्त्वाचे असते. फक्त स्नायूंसाठीच नाही, तर आपल्या शरीरातील एंझाइम्स आणि हार्मोन्ससाठीही प्रथिनांची गरज असते. शरीरास पोषण देण्यासह जगण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. रक्तातील हिमोग्लोबिनमध्येही ‘ग्लोबिन’ असते, जे एक प्रकारचे प्रोटीन आहे आणि ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.
मुलांची वाढ आणि विकासासाठी प्रथिनांची अत्यंत गरज असते. गर्भधारणेसह आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रथिने महत्वाची भूमिका बजावते. विशेषतः विकसनशील देशांमध्ये मुलांमधील लहान मुलांच्या शरीरात अनेकदा प्रथिनांची कमतरता दिसून येते.
जेव्हा तुम्ही प्रथिनयुक्त आहार खाणे पूर्णपणे बंद करता, ज्याचा सल्ला कधीही दिला जात नाही, तेव्हा शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात ते जाणून घेऊ…
१. स्नायूंचे नुकसान : अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सात दिवस प्रथिनयुक्त आहार न खाल्ल्याने स्नायूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा परिणाम वयोवृद्धांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतो.
२. चयापचय क्रिया मंदावणे : चयापचय क्रिया स्थिर ठेवण्यासाठी स्नायू मजबूत असणे महत्त्वाचे असते. अपुऱ्या प्रथिनांच्या सेवनामुळे स्नायू कमकुवत होतात आणि चयापचय क्रिया मंदावते आणि वजन वाढू शकते.
३. रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम : रोगप्रतिकार शक्ती खालावल्याने आजारी पडण्याचा धोका अनेकदा वाढतो.
४. खाण्याच्या लालसेत वाढ : प्रथिनांच्या अपुऱ्या सेवनामुळे तुमची खाण्याची लालसा वाढते. कारण- तुम्हाला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळत नाहीत. साहजिकच त्यामुळे जेवणानंतरही पोट भरल्यासारखे वाटत नाही.
५. त्वचा आणि केसांचे नुकसान : प्रथिने हे त्वचा आणि केसांच्या संरचनेचा अविभाज्य भाग आहेत. पुरेशा प्रथिनांअभावी तुमची नखे ठिसूळ होऊ शकतात, त्वचा निस्तेज होऊ शकते आणि केस गळूही शकतात.
६. हाडांच्या ताकदीवर परिणाम : प्रथिनांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि अस्थिभंगाचा धोका वाढतो.
प्रथिनांचे योग्य प्रमाणात सेवन करण्यासाठी तुमच्या आहारात विविध प्रकारचे प्रथिनयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. चिकन, मटण, मासे यांसारखे मांसाहारी पदार्थ प्रथिनांचा सर्वांत मोठा स्रोत आहेत. त्याशिवाय शेंगदाणे, मसूर, टोफू व क्विनोआ यांसारख्या शाकाहारी पदार्थांमधूनही तुम्हाला तितक्याच प्रमाणात प्रथिने मिळतात. आहारात विविध प्रकारचे प्रथिनयुक्त पदार्थ समाविष्ट केल्याने तुम्हाला शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या अमिनो आम्ले मोठ्या प्रमाणात मिळू शकतात.