तरुण, आनंदी व प्रफुल्ल मन राखण्यासाठी मनाची मशागत करणं आवश्यक आहे हे आपण गेल्या भागात बघितलं. मनाची मशागत करायची म्हणजे काय, मनाचं कार्य नक्की कसं चालतं, मनावर चांगले संस्कार करायचे म्हणजे काय करायचं हे आपण आता बघणार आहोत. गौतम बुद्धांनी मनाबाबत मार्मिक भाष्य करताना खूप छान सांगितलंय की, “मनावर राज्य करा अन्यथा मन तुमच्यावर राज्य करेल”. म्हणजे मनावर आपला ताबा हवा, आपल्या विकासासाठी उपयुक्त ठरेल असं मनानं वागायला हवं. तर, मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याला थोडी शिस्त लावायला लागते. आणि मन हे गुलाम असतं. आपण म्हणतो ना की आपण सवयीचे गुलाम असतो. म्हणजे काय तर आपल्या मनाला, शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लागली की त्या त्या वेळी ती गोष्ट लागतेच, नाही मिळाली की अस्वस्थ व्हायला होतं. सकाळी उठल्यावर प्रातर्विधी करायच्या आधी चहा प्यायची सवय असेल, नी एखाद्या दिवशी चहा नाही मिळाला तर किती पंचाईत होते याचा अनुभव तुम्हाला असेलच. तर आपण जर सवयीचे गुलाम असतोच, तर ही चांगल्या सवयी, चांगली शिस्त मनाला लावून अशा गोष्टींचं गुलाम होणं केव्हाही चांगलं ज्या आपल्याला चिरकाळ आनंद देतील, काही ना काही लाभ देतील.

आणखी वाचा: Mental Health Special: आयुष्य म्हणजे त्रासच, पण सुटका शक्य आहे!

Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…

अशी एक शिस्त किंवा सवय मनाला लावायची तिचं मानसशास्त्रीय नाव आहे Delaying Gratification किंवा उपभोग विलंबन. आपण दोन उदाहरणं बघू. परीक्षा तोंडावर आलेली असते नी काही विद्यार्थी पुस्तकात इतकं तोंड घालून बसतात की परीक्षेच्या दिवशी सुपरवायझरना सांगायला लागतं की चला पेपरची वेळ झाली आता पुस्तकं ठेवा. तहान लागल्यावर विहीर खणायला घेणं ही समर्पक म्हणही आपल्याकडे आहे. तर काही विद्यार्थी हे निवांत असतात, ते मनातल्या मनात उजळणी करत असतात, त्यांच्या हातात पुस्तकं नसतात वा ते चिंतेतही नसतात. त्यांनी खूप आधीच तयारी केलेली असते, ते निश्चिंत असतात.

दुसरं एक उदाहरण म्हणजे, लांबच्या प्रवासाचं प्लॅनिंग झालेलं असतं, कार घेऊन जायचंही ठरलेलं असतं. नी प्रवासाला निघायला काही तास उरलेले असतात नी घरचा कर्ता व्यक्ती किंवा गाडी चालवणारा जो असेल तो सांगतो की तुम्ही तयार रहा, मी आलोच. कुठे जातोय विचारल्यावर तो सांगतो, अरे वायपर खराब झालाय, कूलंटही बहुतेक भरायचंय नी मला वाटतं एकदा बॅटरीही चेक केलेली बरी. तुला ही कामं आधी करता येत नाहीत का, ऐनवेळी हे कसं आठवलं वगैरे वगैरे सांगत कुटुंबीय त्याला हैराण करतात… ही आणि यासारखी अनेक उदाहरणं आपण रोज आजुबाजुला घडताना बघतो. नंतरचा मोठा त्रास वाचण्यासाठी आत्ता थोडा त्रास सहन करणं, आत्ताची मजा किंवा निवांतपणा थोडा बाजुला ठेवून पुढचा विचार करणं म्हणजे उपभोग विलंबन किंवा Delaying Gratification. आनंद आणि दु:ख किंवा त्रास यांचं नियोजन करणारी ही शिस्त किंवा कला आहे. उद्या जर आपल्याला भरपूर आनंद उपभोगायचा असेल तर आज थोडे कष्ट घेणं भाग आहे हा तसा वरवर साधा वाटणारा पण अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. ऐन तारुण्यात कामधंदा असताना मस्तीत जगणाऱ्यांनी निवृत्तीनंतरचा, कमाई बंद झाल्यानंतरचा विचार व नियोजन केलं नसेल तर त्यांचे काय हाल होतात हे ही आपण बघतोच. आपण अनेक जण बघतो ज्यांना सगळं यश वैभव पटापट हवं असतं. भरपूर पगाराची नोकरी, महागडी गाडी, मोठ्ठा फ्लॅट वगैरे वगैरे सगळं झटपट हवं असतं, जे व्यावहारिक जगात शक्य नसतं. उपभोग विलंबनाची शिस्त अंगी नसेल, तर स्व-नियंत्रण व स्व-शिस्तीचा अभाव असतो, ज्यामुळे अशा व्यक्ती सारखे जॉब बदल, उन्नती होत नाही म्हणून कंपनीला व सहकाऱ्यांना शिव्या घाल, कुटुंब सहकार्य करत नसल्याचं सांगत त्यांना दोष दे अशा दुष्टचक्रात अडकतात. उपभोग विलंबनाचा वापर न केल्यास काय आपत्ती ओढवू शकते याचे हे दाखलेच आहे.

तर ही उपभोग विलंबनाची शिस्त किंवा कला साधारणपणे लहानपणीच मुलं शिकतात किंवा त्यांना ती शिकवावी लागते. गृहपाठ पूर्ण केला तरच टिव्ही किंवा मोबाइल बघायला मिळेल. आमटी-भात, भाजी-पोळी किंवा तत्सम महत्त्वाचा आहार घेतला तरच स्वीट डिश, आइसक्रीम किंवा तत्सम गोडधोड मिळेल. कुठला ना कुठला व्यायाम केला, नियमित अभ्यास केला, संगीत-चित्रकला अशासारख्या विषयांमध्ये प्रयत्न केला तरच सिनेमा, सहली किंवा नवीन वस्तू खरेदी करता येतील. यासारख्या गोष्टी जागरुकपणे मूल सात आठ वर्षांचं असल्यापासून केल्या तर साधारणपणे १५-१६ वर्षांच्या सुमारास मुलं ही कला किंवा शिस्त आपसूक शिकतात. अनेक मुलांमध्ये तर ही कला उपजत असते. अशी मुलं पटकन गृहपाठ करून टाकतात, मग खेळायला मोकळी होतात. न आवडणारी भाजी आधी खाऊन टाकतात, म्हणजे नंतर आवडतं अन्न खाऊन त्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत ठेवतात. ज्या मुलांमध्ये ही शिस्त उपजत नसते, त्यांच्या बाबतीत मात्र त्यांच्या पालकांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न करायला हवा की आपलं मूल उपभोग विलंबनाची कला कशी अंगीकारेल. आत्ता दोन मिनिटांचा आनंद आणि नंतर दोन तासांचा त्रास यापेक्षा आत्ता दोन मिनिटांचा त्रास व नंतर दोन तासांचा आनंद याची निवड करणं म्हणजे उपभोग विलंबन.

अनेक तरूण-तरुणी तुम्हाला दिसतील हातात पैसे आल्यावर मोबाइल, फॅशनेबल कपड्यांवर उधळतील, पण करीअरसाठी अत्यंत आवश्यक शिक्षण, कोर्स करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतील. अशीही तुम्हाला अनेक माणसं दिसतील जी प्रवासाची तारीख वेळ सगळं नक्की झालं, तरी लगेच रिझर्व्हेशन, बुकिंग वगैरे न करता उगाच अन्य टाइमपास करत राहतील, नी ऐनवेळी त्यांना रिझर्व्हेशन मिळत नाही, बुकिंगची बोंब होते न आपल्याबरोबर इतरांचीही ते होरपळ करतात. या किंवा अशा प्रकारच्या त्रासात असलेल्या व्यक्ती कदाचित उपभोग विलंबनाच्या शिस्तीपासून वंचित असतात.

ही शिस्त लहानपणी तुमच्या अंगी भिनली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. पण तुमच्या किंवा तुमच्या परिचितांच्या अंगी ही कला नसेल तरी हरकत नाही, तुम्ही ही कला आत्मसात करायचा प्रयत्न करा. प्रत्येकवेळी काहीही नियोजन किंवा काम करताना विचार करा, या क्षणी मी जे करणार आहे, त्याचा नंतर फायदा होणारे का, कसा होणारे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. गाडी पार्क करतानाच तुम्ही विचार करता का, की गाडी काढताना मला अजिबात त्रास होणार नाही अशी पार्क केलीय का. की दिसली जागा तशी पार्क केली, नी जेव्हा काढायची वेळ आली तेव्हा प्रचंड त्रास भोगावा लागला. आपल्या ताटातल्या अन्नातलं जे नावडतं आहे ते आपण सगळ्यात शेवटी खाऊन जेवणाचा शेवट निरस, दु:खद करतोय की ते आधी पटकन खाऊन नंतर निवांतपणे आवडत्या जेवणाचा आस्वाद घेतोय. इतक्या लहान लहान गोष्टींमधून जर आपण ही शिस्त अंगी बाणवली तर मनाच्या मशागतीसाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरेल. जर अगदी लहान सहान बाबींमध्ये हे तत्त्व तुम्ही अंमलात आणू शकत असाल तर निश्चिंती बाळगा अगदी निवृत्तीनंतरचं प्लानिंगसुद्धा तुम्ही नक्की करू शकाल. वयाच्या उमेदीतच तुम्हाला आर्थिक नियोजनाचं महत्त्व लक्षात येईल. वृद्धापकाळ चांगला घालवायचा असेल, तर त्यासाठी आत्ता उधळपट्टी न करता, आत्ताचा थोडा आनंद बाजुला ठेवून दु:ख सोसू, ज्यायोगे नंतरचा काळ सुखात घालवता येईल ही जाणीव अंतर्मनात भिनते. आणि हे एकदा मनानं स्वीकारलं की आत्ताचा काळही दु:खाचा राहत नाही, कारण तो त्रास भोगत असताना मनाला माहिती असतं की हे उद्याच्या सुखासाठी चाललंय, ज्यामुळे तो त्रास वाटत नाही. उपभोग विलंबनाच्या शिस्तीमुळे असं सुदृढ व सशक्त मन प्राप्त करणं शक्य आहे जे आत्ताचा तसेच भविष्यातला काळही आनंद व समाधानात व्यतित करण्यासाठी सहाय्यक ठरतो. अर्थात, त्यासाठी उपभोग विलंबनासोबतच मनाची चांगली मशागत करणाऱ्या आणखी काही गोष्टीही आवश्यक आहेत, त्या बघू पुढच्या भागांमध्ये. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून किंवा ई-मेलवर नक्की सांगा…

contact@loksatta.com