तारुण्य म्हणजे गोंधळात टाकणारी; तर काहींसाठी कठीण, अशी स्थिती. तारुण्यात व्यक्तीच्या शरीराबरोबर त्याच्यात भावनिक बदलसुद्धा होत असतात आणि हे सगळं एकंदरीतच हार्मोन्समुळे होत असतं. मुलींमध्ये तारुण्य साधारणपणे आठ ते तेरा वर्षांदरम्यान आणि मुलांमध्ये नऊ ते चौदा वर्षांदरम्यान सुरू होते. पण, अलीकडील अभ्यासानुसार भारतातील मुले आता नेहमीपेक्षा खूप लवकर वयात येत आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या आकडेवारीनुसार, भारतात किमान १३ दशलक्ष मुले पौगंडावस्थेत येत आहेत. पण, लवकर वयात येताना स्वतःच्या भावनांशी जुळवून घेणे कठीण असले तरी याचा आणखी एक हानिकारक प्रभाव असू शकतो. जसे की, प्रौढांची कमी उंची, हाडे आतून पोकळ असणे, कमी आत्मसन्मान, चिंता आदी समस्या या मुलांमध्ये दिसून येतात.
तर आज आपण या लेखातून कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे, उपचार, पालकांची यावर कोणती भुमिका घ्यायची हे जाणून घेणार आहोत. दी फायनान्शियल एक्स्प्रेसशी बोलताना सहयोगी संचालक, स्त्रीरोग, मॅक्स हॉस्पिटल, गुरुग्राम आणि आरा स्पेशालिटी क्लिनिक, गुरुग्रामचे संस्थापक डॉक्टर रितू सेठी, डायरेक्टर, युरोलॉजी, रोबोटिक सर्जरी व किडनी ट्रान्सप्लांट डॉक्टर विमल दासी तर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैशाली गाझियाबाद यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
गेल्या २० वर्षांत लवकर वयात येणाऱ्या मुलांमध्ये १५ पटींनी वाढ झाल्याचे संशोधनात दिसून आले आहे. डॉक्टर विमल दासी, डॉक्टर वैशाली गाझियाबाद म्हणतात की, या गोष्टीसाठी अनेक कारणे कारणीभूत ठरू शकतात. आजकाल मुले लवकर पौगंडावस्थेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांमध्ये हार्मोनल अडथळे, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कॅलरीयुक्त अन्न न खाणे, मोबाईल बघणे, स्क्रीन टाइममध्ये वाढ झाल्यामुळे आजकाल बरीच मुले लठ्ठ होत आहेत. या अनेक कारणांमुळे मुले लवकर पौगंडावस्थेत येतात.
जीवनशैली हा एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू असला तरीही मूल लवकर वयात येणे यामागे इतर कारणेही असू शकतात. जसे की, मूत्रपिंडाच्या वरच्या भागात असणाऱ्या अधिवृक्क ग्रंथी, अंडकोष किंवा अंडाशयातील गाठी, आनुवंशिकता आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्री-शरीरामधील हार्मोन्स, तर पुरुषांच्या शरीरात अंडकोषांमध्ये असणाऱ्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स आदी अनेक कारणे असू शकतात.
डॉक्टर दासी यांच्या मते, मुलींमध्ये ही कारणे सहसा इडिओपॅथिकमुळे असतात. इडिओपॅथिक हा एक फुप्फुसांचा रोग आहे. तर, मुलांमध्ये हे सहसा अंडरलायिंग पॅथॉलॉजिकल स्थितीमुळे होते.
हेही वाचा…आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती ?
लवकर पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे आणि लवकर वयात येण्याची लक्षणे सारखीच असतात; फक्त वेळ वेगवेगळी असते. तज्ज्ञांच्या मते, मुलींमध्ये स्तनांचा विकास, मासिक पाळीची सुरुवात व काखेतील केसांची वाढ ही लक्षणे आढळतात. त्याचप्रमाणे मुलांमध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे आवाज बदलणे, चेहऱ्यात बदल, काखेतील केसांची वाढ, पुरुषाचे जननेंद्रिय व अंडकोष वाढणे, स्नायूंचा विकास होणे ही लक्षणे दिसून येतात. मुले आणि मुलींमध्ये काही सामान लक्षणेसुद्धा असतात; ज्यामध्ये पुरळ, शरीराचा वास यांचा समावेश होतो. त्यामुळे पालकांनी या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉक्टर रितू सेठी स्पष्ट करतात.
कधी कधी लवकर येणारी पौगंडावस्था हा एखाद्या गंभीर गोष्टीचा इशारादेखील असू शकतो. ब्रेन किंवा इतर ट्युमर, Gonadal यांसारख्या गंभीर आजाराच्या लक्षणांपैकी एक असू शकते. एखादे मूल पौगंडावस्थेत आले की, त्याचे कारण शोधण्यासाठी त्याला कौटुंबिक इतिहास, तपासणी व मूल्यमापन करणे आवश्यक असते, असे डॉक्टर विमल दासी स्पष्ट करतात. आवडत असलेल्या गोष्टी करण्यास टाळाटाळ करणे, तणाव येणे आदी अनेक समस्या त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
मुलांमध्ये दीर्घकाळानंतर पौगंडावस्थेचा त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. कारण- यामुळे “पुरुषांमध्ये अंडकोषाचा कर्करोग आणि स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो,” असे डॉक्टर विमल दासी म्हणतात. तसेच पौगंडावस्थेत येणे किंवा लवकर वयात येणाऱ्या मुलांचे लैंगिक शोषण होण्याची शक्यताही असते.
हेही वाचा…१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…
यावर काही उपचार आहेत का?
उपचार करण्यापूर्वी त्यामागील शरीरविज्ञान समजून घेणे महत्त्वाचे आहे. पौगंडावस्था मुख्यतः दोन प्रकारची असते.
१. सेंट्रल प्रीकोशियस प्युबर्टी (अकाली येणारे तारुण्य वा पौगंडावस्था) : यामध्ये पौगंडावस्था ग्रंथी हार्मोन्स तयार करण्यास सुरुवात करतात. म्हणजेच शरीरात वेळेच्या आधीच बदल होण्यास सुरुवात होते.
२. परिधीय प्रीकोशियस प्युबर्टी : परिधीय प्रीकोशियस ही अशी पौगंडावस्था आहे; जिला टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सद्वारे चालना मिळते. सामान्यतः ही अंडकोष, अंडाशय किंवा ग्रंथींची समस्या असते.
बहुतेक प्रकरणांमध्ये पौगंडावस्था किंवा तारुण्य टाळणे अशक्य असले तरी अशावेळी इस्ट्रोजेन किंवा टेस्टोस्टेरॉन क्रीम, लोशन किंवा इतर औषधे यांचा उपयोग केला जाऊ शकतो ; असे डॉक्टर म्हणतात. निरोगी जीवनशैली राखणे ही एक गुरुकिल्ली आहे. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये जर एखाद्याने निरोगी आहार, व्यायाम व मुलाचा बॉडी मास इंडेक्स सामान्य श्रेणीत ठेवला, तर पौगंडावस्था टाळता येऊ शकते, असे डॉक्टर रितू सेठी म्हणतात.
पालकांची भूमिका –
पौगंडावस्था मुलासाठी गोंधळात टाकणारी असू शकते. त्यामुळे पालकांनी योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक आहे. नक्की काय घडत आहे याबद्दल तुमच्या मुलाला एक साधे, सत्य स्पष्टीकरण द्या. त्यांना समजावून सांगा की, हे बदल सामान्य आहेत आणि ते प्रत्येकामध्येच घडून येत असतात; फक्त तुझ्या शरीराचा विकास जरा लवकर होऊ लागला. तसेच इतर समस्यांकडे लक्ष देणेदेखील महत्त्वाचे आहे; ज्या तुमच्या मुलावर भावनिकरीत्या परिणाम करू शकतात. तसेच मुलांच्या दिसण्याची तुलना इतर कोणाशीही करू नका, असे डॉक्टर विमल दासी यांनी बजावून सांगितले आहे.
लवकर असो किंवा उशिरा; मुलांना पौगंडावस्थेबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे. भारतासारख्या देशात, जिथे पुनरुत्पादक आणि लैंगिक आरोग्यावर फारशी चर्चा केली जात नाही. त्यामुळे मुले अविश्वसनीय स्रोतांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पौगंडावस्थेविषयी आणि त्या अवस्थेत होणाऱ्या बदलांबाबत शक्य तितक्या उघडपणे चर्चा करा. पालकांना या संवेदनशील विषयांवर चर्चा करताना लाज वाटू शकते. पण, त्यांनी मुलांना समजावून सांगावे, असे डॉक्टर रितू सेठी यांनी सांगितले. तुमच्या मुलाच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी, तुम्हाला त्या प्रश्नाची योग्य उत्तरे माहिती आहेत का याची खात्री करून घ्या. पौगंडावस्थेबद्दल बोलणे फारसे सोईचे नसल्यास, तुम्हाला काय म्हणायचे आहे याचा आधी सराव करा, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर आज आपण या लेखातून पौगंडावस्था, लवकर वयात येणाऱ्या मुले-मुली यांच्या लक्षणांबद्दल आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत व याबाबत त्यांच्याशी कसा संवाद साधला पाहिजे हे जाणून घेतले.