Benefits Of 100 gram Peppermint: जगभरातील एक प्रसिद्ध मसाल्याचा पदार्थ म्हणजे पुदिना, भारतातल्या घरोघरी बनणाऱ्या चटण्यांमध्ये या पुदिन्याला विशेष महत्त्व आहे. पाणीपुरीच्या पाण्यापासून ते काही चिकन- मटणाच्या रेसिपीपर्यंत पुदिन्याचा वापर हा भरभरून केला जातो. फक्त खाण्यासाठीच नाही तर पुदिना घातलेले पाणी ते पुदिन्याचा अर्क असणारे तेल विविध स्वरूपात पुदिना शरीर व मनाला डिटॉक्स करण्याचं काम करतो. अवघ्या १०० ग्रॅम पुदिन्यामध्ये असे नेमके कोणते पोषक घटक असतात व त्यांचा आपल्या शरीराला कसा फायदा होऊ शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी संवाद साधताना पुदिन्याच्या पानाच्या सेवनाचे फायदे व खाण्यासंबंधित काही नियम सांगितले आहेत.
१०० ग्रॅम पुदिन्याच्या पानांमध्ये काय दडलंय?
- कॅलरीज: 70 kcal
- कार्ब्स : 14.79 ग्रॅम
- फायबर: 8 ग्रॅम
- साखर: 0.2 ग्रॅम
- प्रथिने: 3.75 ग्रॅम
- फॅट्स : 0.94 ग्रॅम
पुदिन्याचे फायदे
- पचनप्रक्रियेला मिळतो वेग: पुदिना हा जळजळीवर उत्तम उपाय ठरू शकतो. यामुळे अपचनाच्या समस्या दूर होऊन इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारखे त्रास सुद्धा कमी होऊ शकतात.
- श्वसन समस्या: पुदिन्यातील मेन्थॉल सर्दी- खोकला, श्वासोच्छवासाच्या अडचणींना कमी करण्यास मदत करू शकतो.
- डोकेदुखीपासून आराम: पुदिन्याचे तेल (पेपरमिंट ऑइल) आपल्या गुणधर्मांमुळे डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम देऊ शकते. यामुळे स्नायूंवरील ताण कमी होऊन डोकं शांत होऊ शकतं.
- तणाव कमी करणे: पुदिन्याच्या सुगंधामुळे तणाव कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
- पुदिन्यामध्ये बॅक्टरीयाशी लढण्याची क्षमता असते त्यामुळे विविध संसर्गांमध्ये पुदिन्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
मधुमेह असलेल्या व्यक्ती पुदिन्याचे सेवन करू शकतात का?
सिंघवाल यांनी नमूद केले की, मधुमेह असलेल्या व्यक्ती पुदिन्याचे सेवन करू शकतात. त्यात साखरेचे प्रमाण नगण्य आहे आणि ते पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो.
गर्भवती महिलांसाठी पुदिना फायदेशीर आहे का?
सिंघवाल सांगतात की, पुदिन्याचा चहा सामान्यत: गर्भधारणेदरम्यान सुरक्षित मानला जातो आणि मळमळ कमी करण्यास मदत करतो, गर्भवती महिलांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे. पुदिन्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
हे ही वाचा<< ४ वर्षाच्या लेकाचा खून करण्याचं धाडस सूचनाने का केलं? पालकांना मुलांचा इतका राग का येऊ शकतो, पाहा लक्षणे व उपाय
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- तुम्हाला पुदीना किंवा मेन्थॉलची ऍलर्जी असल्यास सावध रहा.
- अतिसेवनामुळे छातीत जळजळ किंवा पाचन समस्या उद्भवू शकतात.
- पुदिन्यामुळे पचनाच्या संबंधित त्रास कमी होऊ शकतात पण सर्वच लक्षणांमध्ये हे एकमेव उत्तर आहे असे सांगता येणार नाही.
- पुदिन्यामध्ये अँटी मायक्रोबियल (प्रतिजैविक) गुणधर्म असतात पण संसर्ग दूर करण्यासाठी सुचवल्या जाणाऱ्या अँटिबायोटिकला हा पर्याय ठरू शकत नाही.