Rakul Preet Singh Diet : अनेक सेलिब्रिटी निरोगी आरोग्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारतात. त्यासाठी नियमित पौष्टिक आणि संतुलित आहार घेतात. बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसुद्धा शिस्तबद्ध जीवनशैली जगते. प्रसिद्ध यूट्युबर रणवीर अलाहाबादियाबरोबर बोलताना तिने तिच्या डाएटविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रकुल प्रीत सिंगचा डाएट

रकुल प्रीत सिंग सांगते, “मी सकाळी सर्वांत आधी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करते. त्यानंतर मी दालचिनीचे पाणी किंवा हळदीचे पाणी पिते. मग भिजवलेले पाच बदाम व एक अक्रोड खाते आणि तूप टाकून कॉफी (Ghee coffee) पिते.”

रकुल प्रीत सिंग प्रोटीनयुक्त आहार घेते. ती सांगते, “मी सकाळी पोट भरून नाश्ता करते; जसे की, पोहे किंवा मोड आलेली कडधान्ये किंवा अंडे.” ती पुढे सांगते “दुपारच्या जेवणात मी भात किंवा ज्वारीची रोटी आणि काही मासे किंवा चिकन हे प्रोटीन म्हणून खाते. संध्याकाळी ४.३० ते ५ पर्यंत मी नाश्त्यामध्ये प्रोटीन- चिया सीड्स, फळे आणि दही किंवा शूटवर असताना पीनट बटर, टोस्ट आणि नट्स खाते.”

तिने पुढे सांगितले की, ती रात्रीच्या आहारात कर्बोदके, प्रोटीन घेते आणि ७ वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करते.

हेही वाचा : दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….

u

रकुल प्रीत सिंग लवकर जेवण करते. तुम्हाला रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे माहितीयेत का? दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटल येथील मिनिमल अॅक्सेस, जीआय व बॅरिअॅट्रिक सर्जरीचे संचालक डॉ. सुखविंदर सिंग सग्गू सांगतात, “रात्री शारीरिक क्रिया मंदावतात.
त्यामुळे रात्री उशिरा जेवण करण्यापेक्षा सूर्योदय आणि सूर्यास्त यादरम्यान जेवण करावे. कारण- यादरम्यान अन्नाचे चांगल्या रीतीने पचान होते. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते.

डॉ. सग्गू पुढे सांगतात, “दिवसातून तुमचे पहिले अन्न उठल्यानंतर सुमारे दीड तासाने आणि तुमचे शेवटचे अन्न झोपण्यापूर्वी २-३ तास आधी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये थोडा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. एकंदरीत अशा प्रकारे आहार घ्यावा.”

तज्ञांच्या मते, अशा तऱ्हेने आहार घेतल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजेच उच्च एचडीएल (चांगले) आणि हानिकारक एलडीएल यांच्यावर नियंत्रण राहते.

त्याशिवाय जेवण लवकर केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि आजारांचा धोका कमी होतो, अशी माहिती डॉ. सग्गू पुढे सांगतात.

हेही वाचा : Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूट येथील उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोदा कुमारी यांनी सांगितलेल्या टिप्स खालीलप्रमाणे :

आहारात हलके व पौष्टिक पदार्थ घ्या; ज्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. या पदार्थांचे अतिसेवनसुद्धा करू नये.

प्रत्येक गोष्टीचे योग्य ते प्रमाण ठरवून, त्यानुसार सेवन करा.

तुम्हाला किती भूक लागली आहे, याचा नेहमी विचार करा आणि त्यानुसार स्नॅक्स खा; जेणेकरून तुमचे पोट भरेल.

भरपूर पाणी प्या. कारण- कधी कधी डिहायड्रेशनमुळेही भूक लागली आहे, असे वाटू शकते.

शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची आवश्यकता आहे, याकडे लक्ष द्या. तुम्ही चांगले पौष्टिक स्नॅक्स निवडून, दिवसभर निरोगी आहार घेऊ शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakul preet singh diet understand the benefits of having an early dinner as rakul does read her fitness secret ndj