Ram Kapoor On Weight Loss : टेलिव्हिजनच्या जगात सर्वात लाडक्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे राम कपूर. टेलिव्हिजनमध्ये नेहमी फिटनेसला खूप प्राधान्य दिले जाते; पण आपल्या अभिनयाच्या जोरावर राम कपूरने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक अनोखी जागा निर्माण केली आहे. याशिवाय त्याच्या बिनधास्त व्यक्तिमत्वाचीसुद्धा तितकीच प्रशंसा केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी राम कपूर अतिशय लठ्ठ होता, पण आता त्याने वजन कमी केले आहे. सिद्धार्थ कन्ननच्या यूट्यूब चॅनेलवर राम कपूरने त्याचा अनुभव सांगितला, “माझं पोट आकर्षक नव्हतं, ते सुटलेलं होतं, माझे वजन १४० किलो होते आणि तुम्ही सुपरहिट शो करत आहात आणि लोक तुमच्यावर प्रेम करतात, तेव्हा कोणी माझी खिल्ली कशी उडवू शकते? त्यामुळे जाड लोक माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे, ‘सर, माझी बायको तुमच्यामुळे माझ्यावर प्रेम करते, तिला माझे वजन कमी करायचे नाही.” बायका येऊन म्हणायच्या, ‘आता मला माझा लठ्ठ नवरा आवडतो, कारण मला तू आवडतोस.”

शरीराच्या प्रतिमेवर आधारित टीका एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानावर कशा परिणाम करतात?

कॅडबॅम्स हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ, नेहा पाराशर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “शारीरिक रचनेवर आधारित प्रशंसा सकारात्मक प्रमाणीकरणाने तात्पुरता आत्मसन्मान वाढवू शकते. जेव्हा लोक एखाद्याच्या दिसण्यावरून टीका करतात – मग ते वजन, उंची किंवा इतर शारीरिक गुणधर्म असो – यामुळे अपुरेपणा, लाज आणि अगदी स्वत:ची घृणासुद्धा येऊ शकते.”

याशिवाय त्या पुढे सांगतात, जास्त वजन किंवा शरीराचा लठ्ठपणा स्वीकारणेसुद्धा व्यक्तीला निरोगी जीवनशैलीमध्ये बदल करण्यापासून परावृत्त करू शकतात, कारण लोक त्यांना तसेच स्वीकारतील का याची भीती असते. त्यासाठी समतोल राखणे महत्त्वाचे आहे. स्वत:चे मूल्य इतरांच्या मतांवर अवलंबून नसून स्वतःच्या आंतरिक मूल्यांवर आणि आरोग्याच्या प्राधान्यांवर अवलंबून असणे आवश्यक आहे.

एखाद्याचे शरीर जसे आहे तसे स्वीकारणे आणि निरोगी जीवनशैलीतील बदलांसाठी प्रयत्न करून संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. याविषयी पाराशर सांगतात, “शरीर सकारात्मकता आणि शरीर तटस्थता हे दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत, जे मदत करू शकतात.” सकारात्मकता लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करून आपण जे आहोत ते स्वीकारण्यास प्रोत्साहित करते, तर शरीराची तटस्थता शरीर कसे दिसते यापेक्षा ते काय करू शकते यावर लक्ष केंद्रित करते. दोन्ही दृष्टिकोन स्वत:विषयी विचार करण्यास भाग पाडतात, यामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित चांगले निर्णय घेण्याची इच्छा होते.

तज्ज्ञांच्या मते खालील गोष्टींचे अनुकरण करा

वजन केंद्रित नाही तर आरोग्य केंद्रित उद्दिष्टे ठरवा : स्टॅमिना सुधारणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि मानसिक स्पष्टता वाढवणे इत्यादी उद्दिष्टांना प्राधान्य द्या.

नीट जेवण करा : ठराविक पदार्थांवर निर्बंध घालण्यापेक्षा भूक भागवणारे आणि व्हिटामिन्स, प्रोटिन्सची पूर्तता करणारे आहार घ्या.

मार्गदर्शन घ्या : पोषणतज्ज्ञ किंवा थेरपिस्टचा सल्ला घेतल्याने वैयक्तिक उद्दिष्टे विकसित करण्यास मदत होऊ शकते.

छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवा : चांगली झोप घ्या. यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि मूड सुधारेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram kapoor shared experience on acceptance and weight loss transformation read what health expert told about practical strategies to achieve goal ndj