मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक अतिशय वेगळीच केस युनायटेड किंगडममध्ये घडली आहे. एका सोळा वर्षांच्या मुलीने व्हर्चुअल रिऍलिटी हेडसेट घातलेला होता आणि ती मेटावर्समध्ये होती. त्यावेळेस काही अनोळखी लोकांनी या मुलीच्या व्हॅर्चुअल जगातील अवतारावर सामुहिक बलात्कार केला. मुलीच्या या दाव्यानुसार आता पोलीस तपासणी सुरु आहे. यात या मुलीला अर्थातच कुठलीही शारीरिक इजा झालेली नाही पण प्रत्यक्ष जगात बलात्कार झालेल्या स्त्रीला जो मानसिक धक्का बसतो तशाच मानसिक त्रासातून ही मुलगी जाते आहे.

मानसिक हिंसा, हाही बलात्कारच

आता याला कुणी वेडगळपणा म्हणू शकते, कुणी मूर्खपणा किंवा इतर काहीही. व्हर्चुअल जगातल्या अवतारावर झालेला बलात्कार म्हणून याकडे नक्की कसं बघितलं पाहिजे याविषयी मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होणार आहे. पण ट्रोलिंगमध्ये आपण हे अनेकदा पाहिलेलं आहे की नुसत्या शब्दांनी एखाद्या स्त्रीचा सोशल मीडियावर कसा बलात्कार केला जातो. ट्रोलिंग करणारा बलात्कार कसा करू, कशी इजा पोहोचवू याची वर्णन लिहितो तेव्हा तो बलात्काराचं करत असतो. दरवेळी शारीरिक हिंसाच त्यात असायला हवी असं नाहीये. मानसिक हिंसा करत एखाद्या स्त्रीचं खच्चीकरण करणं हाही बलात्कारच आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे या सोळा वर्षांच्या मुलीने मेटावर्समध्ये जो अनुभव घेतला आहे त्याचे तिच्या मनावर झालेले ओरखडे इतक्या चटकन भरुन येणारे नाहीत. त्यामुळे या बातमीकडे ‘काय हा वेडगळपणा’ असं न बघता थोडं संवेदनशील पद्धतीने बघता येईल का, याचा विचार केला पाहिजे. ऑनलाईन बुलिंग आणि ट्रोलिंगमधून १६ वर्षांच्या तरुण मुलाने केलेली आत्महत्या अजूनही ताजीच आहे. त्यामुळे ऑनलाईन जगात शब्दांच्या आणि कृतीच्या माध्यमातून माणसं जो त्रास एकमेकांना देतात त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

आणखी वाचा-Mental Health Special : सोशल मीडियाचं व्यसन लागू शकतं ही कल्पना कंपन्या देतात का?

डिसइन्हिबिशन इफेक्ट

प्रत्यक्ष जगात ज्या प्रमाणे मुलींची छेड काढणारे, त्यांचा उपभोग घेण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे असतात, तसेच ते ऑनलाईन जगातही असतात. ऑनलाईन जग हे प्रत्यक्ष जगापेक्षा वेगळं नाहीये. त्यामुळे स्वतःचा चेहरा लपवून एखादीवर बलात्कार करायला ऑनलाईन जगात मागेपुढे न बघणारेही आहेत. सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे डिसइन्हिबिशन इफेक्ट तयार होतो. नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील प्रो. मार्क ग्रिफिथ्स या ‘डिसइन्हिबिशन इफेक्ट’बद्दल सांगतात, “अशा माणसांचा समज असतो की आपण कुणाशीही कसेही वागलो, बोललो तरी चालतं. प्रत्यक्षात वागणार नाहीत असं ही माणसे वागायला सुरुवात करतात. कारण आपल्या वर्तनाबद्दल त्यांच्या मनात कसलीही लाज लज्जा उरत नाही. एखादी गोष्ट करावी अगर नाही याबद्दल आपलं मन आपल्याला जे काही सांगत असतं ते या लोकांना ऐकू येईनास होतं. माणसं एकटी असतात तेव्हा वेगळी असतात आणि समूहात वेगळी होतात.”

आणखी वाचा-Mental Health Special: आवाजाची नक्कल करुन फसवणूक होते?

अनेक घटनांमधून हे पुन्हा पुन्हा पुढे येतंय की व्हर्चुअल जग आपल्याला वाटतं तितकं आपल्या मुलांसाठी सुरक्षित नाहीये. जसं प्रत्यक्ष जगही नाहीये. जसं आपण मुलांना प्रत्यक्ष जगात सुरक्षित राहायला शिकवतो तसंच ऑनलाईन जगातही सुरक्षित राहायचं कसं हेही शिकवायला हवं आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape in the virtual world what is its psychological distress hldc mrj
Show comments