Is Eating Yogurt After Lunch Good : दही हा भारतीय घरांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ आहे. दह्यामध्ये प्रो-बायोटिक्स, कॅल्शियम आणि आवश्यक पोषक घटक असतात, जे पचनास फायदेशीर असतात. तसेच दह्याच्या सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारते.

दह्याचे नियमित सेवन पचनक्रिया सुधारण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर आहे. पण, दह्याच्या सेवनाचे परिणाम हे वैयक्तिक आरोग्य स्थितीवरून बदलू शकतात. काही लोकांना त्याचे फायदे मिळू शकतात; तर काही लोकांना अनपेक्षित परिणाम दिसू शकतो. उन्हाळ्यात सहसा अनेक जण जेवण केल्यानंतर दह्याचे सेवन करतात. पण, आज आपण दही जेवणानंतर दररोज खाल्याने नेमके काय घडते, याविषयी जाणून घेणार आहोत.

दुपारच्या जेवणानंतर दही खाल्ल्याने आतड्यांवर काय परिणाम होतो?

आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “दुपारच्या जेवणानंतर नियमितपणे दही खाल्ल्याने आतड्यांतील जीवाणूंमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतो कारण- त्यात लॅक्टोबॅसिलस व बायफिडोबॅक्टेरियम स्ट्रेन यांसारखे प्रो-बायोटिक घटक असतात. हे घटक आतड्यातील जीवाणूंची संख्या वाढवतात आणि एन्टरोबॅक्टेरियासी व स्टॅफिलोकोकस यांसारखे हानिकारक जीवाणू नष्ट करतात.

त्या सांगतात की, दह्यातील लॅक्टिक अॅसिड जीवाणू आतड्याची कार्यक्षमता मजबूत करतात, छातीतील जळजळ कमी करतात आणि शरीरात शॉर्ट-चेन फॅटी अॅसिडचे उत्पादन वाढवतात, जे मोठ्या आतड्यांचे आरोग्य सुधारतात. त्या पुढे सांगतात, “दह्याच्या दैनंदिन सेवनामुळे प्रो-बायोटिक प्रभाव टिकून राहतो. लॅक्टोबॅसिलस गॅसेरी (Lactobacillus gasseri) व बिफिडोबॅक्टेरियम लॅक्टिस (Bifidobacterium lactis) हे दोन्ही प्रो-बायोटिक्स पचन आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करतात.”

दह्याचे प्रो-बायोटिक्स पोषक घटकांचे शोषण सुधारतात. शरीराची सूज कमी करतात आणि आतड्यांसंबंधित आरोग्याचा धोका कमी करतात. मल्होत्रा ​​सांगतात की, वैयक्तिक आरोग्य स्थिती आणि आहाराच्या सवयी यांमुळे प्रत्येकाला एकसारखा परिणाम दिसून येत नाही. “फायबरयुक्त आहारासह दह्याचे सेवन केल्याने प्री-बायोटिक व प्रो-बायोटिक अशा दोन्ही प्रकारे फायदे मिळू शकतात”.

दह्याच्या सेवनाने शरीराची उष्णता कमी होते का?

अनेकांना असे वाटते की, दही शरीर थंड करण्यास मदत करते. पण मल्होत्रा ​​स्पष्ट सांगतात, “पौष्टिकदृष्ट्या दह्यामध्ये जास्त पाणी असते आणि त्यातील प्रो-बायोटिक्स हायड्रेटिंग प्रभाव निर्माण करू शकतात, ज्यामुळे दही आपल्याला थंड वाटते.” त्या पुढे, “दह्यामुळे शरीराचे तापमान कमी होते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही,” असे सांगतात.

दुपारच्या जेवणानंतर दही खाल्ल्याने पचनाशी संबंधित आणि प्रो-बायोटिक फायदे होतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पोषक घटकांचे शोषण होण्यास मदत होते. मल्होत्रा सांगतात, “दह्याच्या सेवनाने थंडावा वाढवता येत नसला तरी पचनाचे फायदे वाढवण्यास मदत होते. दह्यातील हायड्रेटिंग गुणधर्म आणि पचनसंस्था यांवर त्याचा प्रभाव दिसत असल्याने दह्यातील थंडपणा आपल्याला जाणवू शकतो.”

दुपारच्या जेवणानंतर दररोज दही खाल्ल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतो का?

दह्यामध्ये प्रो-बायोटिक्स आणि आवश्यक पोषक घटक असले तरी मल्होत्रा ​​सांगतात की, ते सर्वांसाठी फायदेशीर नाही. जर तुम्हाला लॅक्टोजची अॅलर्जी असेल, तर दररोज दही खाल्ल्याने पोटफुगी आणि अतिसार यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

अति प्रमाणात दह्याचे सेवन केल्याने पचनक्रियेला त्रास होऊ शकतो आणि वजन वाढू शकते. मल्होत्रा सांगतात, “याशिवाय दह्यातून अति प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने लोह आणि झिंकचे शोषण कमी होऊ शकते.” दह्याचे फायदे घेण्यासाठी त्या संयम राखण्याचा सल्ला देतात.
“ दुपारच्या जेवणाच्या दिनचर्येत दह्याचा समावेश करा; पण तुमचे शरीर त्यावर कसे प्रतिसाद देते, याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार सेवन करा” असेही त्या पुढे सांगतात.