Eating Ghee Really Make You Fat : सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होतात, ज्यामध्ये फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो, असा दावा केला जातो. अशा दाव्यांमुळे अनेकदा गैरसमज पसरतात आणि फॅट्स आरोग्यासाठी धोकादायक आहे, असे वाटते. पण खरंच फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वेदिका प्रमानी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

खरं तर आपल्या शरीरात कर्बोदके, प्रोटिन फॅट्स असे पोषक घटक असतात, जे शरीराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यांसाठी उपयुक्त ठरतात. शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात फॅट्सचे सेवन केल्यास पौष्टिक कमतरता जाणवू शकते. कारण- सर्व फॅट्सयुक्त पदार्थांमध्ये जास्त ऊर्जा आणि कॅलरी असते. त्याशिवाय पौष्टिक घटक हे फॅट्सच्या प्रकारावर अवलंबून असतात.

फॅट्सचे प्रकार

ट्रान्स-फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL)ची पातळी वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होतात. लोणी, तूप, तसेच नारळ आणि पाम तेल (मिठाई आणि बिस्किटांमध्ये वापरले जाते) यांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. त्याशिवाय दूध, मलई, चीज, केक व चॉकलेटमध्येही सॅच्युरेटेड फॅट्स असतात.

अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे सेवन मग ते मोनोअनसॅच्युरेटेड असो किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड आरोग्यासाठी चांगले आहे. अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल, सूर्यफुलाचे तेल, तैलीय मासे, बिया आणि नट्समध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते.

अभ्यास काय सांगतो?

२०१८ ला हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एक अभ्यास केला. या अभ्यासासाठी त्यांनी २० वर्षांपेक्षा जास्त काळ १,२०,००० पुरुष आणि स्त्रियांना निरीक्षणाखाली ठेवले. जेव्हा या लोकांनी त्यांच्या आहारात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे सेवन वाढवले तेव्हा त्यांची वजन वाढण्याची शक्यता जास्त होती; पण अनसॅच्युरेटेड फॅट्सच्या सेवनाचा यात कोणताही उल्लेख नव्हता.
खूप जास्त ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स खाल्ल्याने चार वर्षांच्या कालावधीत सरासरी १-१/३ पाउंड म्हणजेच ०.६०४७९ किलो वजन वाढते, असे या अभ्यासातून दिसून आले.

प्रत्येक प्रकारच्या फॅटचा शरीरावर वेगवेगळा परिणाम दिसून येतो. सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचा इन्सुलिन रेझिस्टन्सवर परिणाम होतो; ज्यामुळे शरीरातील पेशी ग्लुकोज योग्य प्रकारे शोषू शकत नाहीत. अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, नट्स आणि ऑलिव्ह ऑइलपासून मिळणाऱ्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडने वजन वाढत नाही. सॅल्मन, अक्रोड व सूर्यफूल बियांमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळते आणि ते इन्सुलिन रेझिस्टन्सला प्रोत्साहन देते; ज्यामुळे फॅट्सचा साठा संतुलित राहतो.

कर्बोदकांबरोबर फॅट्सचे सेवन करता का?

जेव्हा तुमच्या आहारात फॅट्ससह कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, तेव्हा अति कॅलरीमुळे शरीरात फॅट्सचा साठा वाढतो. जेव्हा लोक फॅट्सचे सेवन कमी करतात तेव्हा त्यांना पोषक घटकांच्या कमरतेमुळे कर्बोदकांचे सेवन करण्याची इच्छा होते. पण, आपण आपल्या कर्बोदकांचे सेवन कमी केले पाहिजे. साखर, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, तसेच फळांच्या रसाचे सेवन टाळले पाहिजे.
कर्बोदके, प्रोटीन्स, फॅट्स आणि अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांसह संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी पिणेसुद्धा आवश्यक आहे.

Story img Loader