Heart Attack : सध्या पुरुषांसह स्त्रियांमध्येही हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. त्यातवयोवृद्ध व्यक्तींपेक्षा कमी वयात म्हणजे तरुणांमध्ये विशेषत: तरुणींमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
काही संशोधकांनी चार शहरांमध्ये हार्ट अटॅकशी संबंधित तेथील २८,००० हून अधिक रुग्णांचा अभ्यास केला तेव्हा वृद्ध व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण कमी असून, ३५ ते ५४ वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. याविषयी नवी दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूट – ओखला येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. निशिथ चंद्रा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. निशिथ चंद्रा सांगतात, “मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन सक्रिय असतो. त्यामुळे महिलांना हार्ट अटॅकचा धोका नसतो; पण हार्ट स्पेशॅलिस्ट म्हणून आम्हाला हार्ट अटॅकच्या कोणत्याही लक्षणांकडे जसे की महिलांचे छातीत दुखणे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.”

डॉ. चंद्रा पुढे सांगतात, “तरुण महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे चुकीची लाइफस्टाईल. खूप महिला कमी वयात धूम्रपान करतात; ज्यामुळे हा धोका अधिक वाढलेला दिसून येतो.”

हेही वाचा : Sleepwalking : झोपेत चालणे नेमका काय प्रकार आहे, वाचा या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय 

धूम्रपान

तंबाखूमध्ये हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) असते; जे चांगले कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी करते. त्याशिवाय तंबाखूच्या सेवनामुळे जळजळ होणे, रक्त गोठणे, रक्तवाहिन्या खराब होणे, इत्यादी कारणांमुळे हा धोका आणखी वाढतो. धूम्रपानामुळे पुरुष आणि महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका दोन ते चार पटींनी वाढला आहे. विशेषत: ज्या महिला धूम्रपान करतात त्यांना पुरुषांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका २५ टक्क्यांनी जास्त असतो.

तुम्हाला माहीत आहे का की, ई-सिगारेट (Vaping)च्या सेवनानेसुद्धा हार्ट अटॅकचा धोका ३४ टक्क्यांनी वाढू शकतो? ई-सिगारेटवर कदाचित बंदी घातली जाऊ शकते; पण तरीसुद्धा गुप्तपणे याची देवाणघेवाण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तंबाखूमध्ये निकोटिन नावाचा विषारी पदार्थ असतो आणि या घटकामुळे तंबाखूचे अनेकांना व्यसन लागते. अनेक तरुण मुले याकडे आकर्षित होतात; ज्यांचे यामध्ये अजिबात नियंत्रण नसते. पुढे हे व्यसन इतक्या गंभीर टोकावर जाते की, ज्याचा दुष्परिणाम आरोग्यावर दिसून येतो. विशेष म्हणजे ई-सिगारेटमध्ये सर्वसामान्य तंबाखूपेक्षा निकोटिनची पातळी दोन पट जास्त असते. याच निकोटिनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

ई-सिगारेटचे दैनंदिन सेवन करणे थेट हार्ट अटॅकला निमंत्रण देण्यासारखे आहे. तरुण महिलांमध्येही ई-सिगारेटचे सेवन दिसून येते; ज्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. निकोटिनच्या दुष्परिणामामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो.

हेही वाचा : तुम्ही खूप पटकन भावूक होता का? असं का होतं अन् यावर उपाय काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

खूप जास्त प्रमाणात तणाव

तरुण महिलांना कामाच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात तणावाचा सामना करावा लागतो. आजच्या स्पर्धात्मक जगात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. अशा वेळी घरची जबाबदारी, कौटुंबिक वेळ आणि कामाच्या ठिकाणी तणाव दिसून येतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
महिलांमध्ये स्ट्रेस लेव्हल वाढवणारी एड्रेनालाइन आणि कॉर्टीसोल यामुळे रक्तवाहिन्या ‘ब्लॉक’ होऊ शकतात; ज्यामुळे अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो. अनेकदा महिला अतिप्रमाणात धूम्रपान करतात. त्यामुळेही ताण वाढतो.

गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर

अनेकदा महिला गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. या गोळ्यांचाही आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येतो. जर तुम्ही हायपरटेन्सिव्ह असाल, तर गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असणारे हार्मोन्स रक्तदाब कसे वाढवतात, हे एका अभ्यासातून समोर आले आहे. महिला अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा रक्तदाब तपासत नाहीत. अनेकदा कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता, महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात; ज्याचा दुष्परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो.

हेही वाचा : Diabetes and X-rays : एक्स-रेद्वारे मधुमेहाचा धोका ओळखता येतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतायत ….

चुकीच्या लाइफस्टाईल

चुकीच्या लाइफस्टाईलमुळेही थेट आरोग्यावर दुष्परिणाम होतो. लठ्ठपणा, सतत बसून काम करणे, अयोग्य आहार, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्य बिघडते आणि हे घटक मधुमेहासाठीही कारणीभूत असतात. त्यामुळे मधुमेहींना हृदयविकाराचा धोका चार पटींनी जास्त दिसून येतो.
एका अभ्यासात असे दिसून आले की, ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ११.२ टक्के आहे. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि ज्यामुळे सुरळीत रक्तपुरवठा होऊ शकत नाही.

करू नका नियमित वैद्यकीय तपासणीकडे दुर्लक्ष

नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणताही आजार लवकर ओळखता येतो. अनेकदा वेळेपूर्वी योग्य उपचार सुरू करता येतात.हार्ट अटॅक हा नेहमी पुरुषांसाठी चिंतेचा विषय मानला जातो; पण महिलांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्यामुळे महिलांनीही हार्ट अटॅकच्या लक्षणांपासून सावध राहणे तितकेच गरजेचे आहे. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Really heart attack risk going up in young women at early age due to smoking vaping and unregulated birth control pill read what expert said ndj
Show comments