Influenza flu & Heart attack : तरुणांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आली आहेत. अयोग्य जीवनशैली, पोषक आहार न घेणे, सतत तणाव व हृदयाशी संबंधित समस्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण व्हायरल फ्लूनमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो, असे तुम्ही कधी ऐकले आहे का?
न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत.

डॉ. सुधीर कुमार या व्हिडीओमध्ये सांगतात, “फ्लू झाल्यानंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. अलीकडे यावर अभ्यास करण्यात आला. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लू झाल्यानंतर १ ते ७ दिवसामध्ये हृदयविकाराचा झटका सहा पटीने वाढतो.”

पाहा व्हिडीओ

बंगळुरू येथील जनरल मेडिसिन फिजिशियन डॉ.पल्लेती सिवा कार्तिक रेड्डी (Dr Palleti Siva Karthik Reddy) दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की व्हायरल फ्लू, वेदना आणि ताप यांच्या पलीकडे कसा वाढतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारण श्वसन संसर्गामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.”

हेही वाचा : Cardio Exercises & Weight Training : कार्डिओ व्यायाम वेट ट्रेनिंगपूर्वी करावा की नंतर? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

डॉ. रेड्डी पुढे सांगतात, “ व्हायरल फ्लू(इन्फ्लूएंझा) तुमच्या शरीरात एक दाहक प्रतिक्रिया (inflammatory response) निर्माण करते. या प्रतिक्रियेमुळे तुमच्या धमन्यांमध्ये सूज येऊ शकते ज्यामुळे धमन्यांमध्ये असलेल्या प्लेक अस्थिर होऊ शकतात आणि तुटू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो”

या फ्लूमुळे तुमच्या शरीरातील रक्त सुद्धा गोठू शकते, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. या रक्ताच्या गुठळ्या हृदयात रक्त प्रवाह रोखत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

फ्लूमुळे येणारा ताप, हृदयाचे ठोक्यांमध्ये अनियमितपणा आणि फ्लू दरम्यान तुमच्या शरीरावर येणारा एकूण ताण यामुळे तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. आधीच खूप जास्त कामाचा स्ट्रेस असलेल्या लोकांना किंवा हृदयविकारासंबंधित आजार असलेल्या लोकांना हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

डॉ. रेड्डी सांगतात, “काही प्रकरणांमध्ये, फ्लू थेट हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ निर्माण होऊ शकते आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते.”

सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

फ्लूनंतर कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, पण डॉ रेड्डी यांच्या मते, काही लोकांना याचा जास्त धोका असतो.

आपले जसे वय वाढते तशी आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे वयोवृद्ध लोकांना फ्लू लवकर होतो आणि वयानुसार त्यांच्या हृदयाच्या समस्या सुद्धा वाढतात

हेही वाचा : इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

ज्या लोकांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. उच्च रक्तदाब किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोका आहे, त्यांना फ्लूनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, कर्करोगाचा उपचार घेत असलेल्या किंवा एचआयव्ही/एड्स सारखे आजार असलेल्या लोकांना फ्लूसह हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी खालील उपाय करू शकता.

लसीकरण करा – फ्लूपासून वाचण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय आहे.

स्वच्छता राखा – आपले हात वारंवार धुवा, आजारी व्यक्तींबरोबरचा संपर्क टाळा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक नीट झाका.

वैद्यकीय उपचार घ्या – जर तुम्हाला फ्लू झाला असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांना भेटा. औषधांसह लवकर उपचार केल्याने तुम्ही आजारातून लवकर बरे व्हाल ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

वारंवार हृदयाची आरोग्य तपासणी करा – जर तुम्हाला आधीपासून हृदयाच्या समस्या असेल तर आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेवर औषधे घेणे, निरोगी जीवनशैली स्वीकारणे, कार्डिओलॉजिस्टकडे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

जीवनशैली सुधारा – जर तुम्हाला फ्लू झाला असेल तर भरपूर विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या आणि तुमच्या हृदयावर ताण पडेल अशा कठीण गोष्टी करणे टाळा.