Is snoring a risk factor for diabetes : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. वयानुसार आणि जीवनशैलीतील बदलत्या सवयींमुळे अनेकदा झोपेवर याचा परिणाम दिसून येतो. अशात झोपेचे आजार होण्याची शक्यतासुद्धा वाढते. यात सर्वात सामान्य आजार म्हणजे ‘स्लीप अॅप्निया’ होय. हा आजार असलेल्या व्यक्तीला झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना अडथळा येतो. याची अनेक लक्षणे आहेत, पण सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे घोरणे होय. जोरजोराने घोरणे, रात्री नीट झोपल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशी थकवा जाणवणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, जर आपण यावर नीट उपचार केले नाही तर गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. स्लीप ॲप्निया म्हणजेच घोरणे, याचा मधुमेहाशी काही संबंध आहे का? द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
याविषयी स्पर्श हॉस्पिटलच्या डायबेटोलॉजिस्ट डॉ. समिथ शेट्टी सांगतात, “घोरणे आणि मधुमेहामध्ये काही सामान्य धोकादायक लक्षणे आढळून येतात, त्यापैकी एक म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे अनेक लोकांना घोरण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय मधुमेहासाठीसुद्धा लठ्ठपणा कारणीभूत ठरतो. लठ्ठपणामुळे इन्सुलिनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. विशेष म्हणजे घोरण्यामुळे ग्लुकोजची चयापचय क्रिया बदलते, ज्यामुळे इन्सुलिनला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास अडचणी येतात; ज्यामुळे टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
गुरुग्राम येथील पारस हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय वर्मा सांगतात, “नीट झोप न झाल्यामुळे इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जे हार्मोन्स भूक नियंत्रित ठेवतात, त्यांच्यावरसुद्धा अपुऱ्या झोपेचा परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, अपुऱ्या झोपेमुळे टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. झोपेशी संबंधित अनेक समस्या टाईप २ मधुमेह होण्याची लक्षणे सांगतात.
पल्मोनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असे सांगितले आहे की, मधुमेह मेलिटस आणि स्लीप ॲप्निया हे सामान्य आजार आहे, जे सहसा एकत्र आढळून येतात. मधुमेह मेलिटसमध्ये व्यक्तीच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही (टाईप वन) किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.(टाईप टू). हे दोन मधुमेहाचे प्रकार आढळून येतात.
ग्रेटर नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे अतिरिक्त संचालक डॉ. दिनेश कुमार सांगतात, “चारपैकी एका मधुमेहाच्या रुग्णाला स्लीप ॲप्निया होऊ शकतो.”
“याशिवाय स्लीप ॲप्नियामुळे फक्त मधुमेहच नाही तर दीर्घकालीन आजार होऊ शकतात. उच्च रक्तदाबाची समस्या, हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. जर तुम्ही यावर उपचार केले नाही, तर रात्रभर झोपूनसुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू शकतो किंवा झोपेत श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही जोरजोराने घोरण्याची शक्यता असते”, असे डॉ. संजय वर्मा सांगतात.
स्लीप ॲप्नियामुळे अशक्तपणा जाणवणे, कोणत्याही गोष्टीमध्ये आवड निर्माण न होणे, सतत मूड बदलणे किंवा चिडचिड होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. डायबेटोलॉजिस्ट डॉ. समिथ शेट्टी सांगतात, “जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमच्या अवयवांना विश्रांतीची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही रात्री घोरता तेव्हा शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. जे लोक घोरतात त्यांचे फुफ्फुस आणि हृदयावर ताण पडतो, त्यामुळे विश्रांतीच्या वेळीसुद्धा त्यांना काम करावे लागते, ज्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो आणि आपल्याला थकवा जाणवतो.”
स्लीप ॲप्निया मधुमेहासह इतर आरोग्याच्या समस्यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत. नियमित व्यायाम करा, योगासने करा, तज्ज्ञांनी दिलेली औषधे घ्या आणि लवकरात लवकर यावर उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. वर्मा यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत –
- दुपारी आणि सायंकाळी कॉफी घेऊ नका. याचा तुमच्या शरीरावर आठ तासांसाठी परिणाम होऊ शकतो.
- रात्रीच्या वेळी मद्यपान करू नका, यामुळे रात्री झोपताना तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्हाला वारंवार जाग येऊ शकते.
- रात्री भरपूर जेवण करू नका आणि उशिरासुद्धा जेवण करू नका. उशिरा जेवण केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी रात्री वाढू शकते आणि अपचन होऊ शकते.
- दुपारी ३ नंतर थोडी विश्रांती घ्या. जेव्हा झोपण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही.
- निकोटीनपासून दूर राहा. हे कॉफीप्रमाणेच शरीरावर परिणाम करतात.